मुशाफिरी
पुणेरी लोकांना कंजुष, तुसडे, दुपारी १ ते ४ आराम करणारे, विनोदी-विक्षिप्त प्रकारच्या पाट्या लिहिणारे समजण्याचा प्रघात आहे. केवळ समाजावरुन, जातीवरुन, भूभागावरुन ढोबळ मानाने एखाद्याची पारख केल्यास ती चुकीची ठरण्याची व आपापसात उगाचच कलुषित वातावरण निर्माण होण्याची शवयता वाढते. नावे, आडनावे, जातीविशेष पाहुन कुणाला जोखू नका...त्याची गुणवत्ता, संस्कार, प्रामाणिकपणा, समाजाप्रतिची बांधिलकी, सामीलकी पाहा. माणसे जोडण्यास, सामाजिक सौहार्द राखण्यास ते अधिक उपयुवत ठरेल.
आपला देश, आपले राज्य, आपली भाषा, आपला धर्म, आपले देव, आपली माणसे, आपली जातीविशेष, आपला जिल्हा, आपला तालुका, आपला परिसर, आपली गल्ली एवढेच काय आपली चाळ वगैरेंबाबत प्रत्येकाला अभिमान असतो, काहींची तर याबाबतची अस्मिता तीव्र वगैरे टाईपची असते. त्यामुळे हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती, बौध्द, जैन, शीख वगैरे विविध धर्मीय लोक एकाच वेळी सारे भारतीय माझे बांधव आहेत असे क्रमिक पुस्तकांतील प्रतिज्ञेपुरते म्हणतात खरे! पण अनेकदा ते काही खरे नसते. अनेकदा हे लोक परधर्मीयांना पाण्यात पाहात असतात आणि त्यांच्याबद्दल अनुदार उद्गार उठता बसता काढतात. काहींच्या जातिवाचक, धर्मवाचक, प्रदेशवाचक व्हाट्सअप समुहांचा तपशील पाहिल्यास मी काय म्हणतोय ते अधिक ठळकपणे समजण्यास मदत होईल. इतरांच्या देवाधर्माला शिविगाळ केल्याशिवाय अनेकांचा दिवसही उजाडत नाही आणि मावळतही नाही असेही पाहता येईल.
मराठी माणसांत कोकणस्थ विरुध्द देशस्थ, मराठे विरुध्द अन्य, ओबीसी विरुध्द बाकीचे, ब्राह्मण विरुध्द उर्वरीत, पुणे विरुध्द मुंबई, विदर्भ विरुध्द अन्य, मुळचे स्थानिक विरुध्द अन्य जिल्ह्यांतून आलेले, मुळचे मराठी विरुध्द मराठी मुला-मुलींशी लग्न केलेले, स्थानिक मूलनिवासी विरुध्द अन्य राज्यांतून महाराष्ट्रात येऊन दादागिरी करणारे (गेल्या वर्षी मुलुंडला ॲड. तृप्ती देवरुखकर यांना भाड्याने जागा देण्यााविरुध्द गुजराती लोकांशी झालेला वाद आठवा!) असे अनेक अस्मितादर्शक गट, तट सक्रिय असतात. तशात मुंबई म्हणजे ‘सब भूमी गोपालकी' थाटात इकडून तिकडून आलेल्यांनी मुंबईवर अतिक्रमणे करत वर मराठी माणसांवर रुबाब दाखवणारे आणखी वेगळेच! जसे भेंडीबाजार, गोवंडी, बांद्रा, बैंगनवाडी, कुर्ला, मानखुर्द, ट्रॉम्बे अशा विविध भागात राहुन मिजासखोरीने वागणारे काही अल्पसंख्य, त्यांच्यात बेमालूमपणे घुसलेले काही बांगलादेशी मुसलमान घुसखोर तसेच मुलुंड, घाटकोपर, बोरीवली येथील काही गुजराती-जैन वस्त्यांतून राहणारे काही बिगरमराठी लोक, मराठी मांसाहारी नागरिकांना शाकाहारी सोसायटीमध्ये पलॅट घेण्यास अटकाव करणारे व मुळचे मुंबईकर नसलेले काही परप्रांतीय लोक असे अनेक गट, तट, समुह, टोळकी आपल्या अवतीभवती आहेत. कोकणातले, विदर्भातले, मराठवाड्यातले, पश्चिम महाराष्ट्रातले जे समुह आहेत, त्यांच्यातही आपापसात फार मोठे सौहार्दपूर्ण संबंध आहेत अशातलाही भाग नाही. खेड्यातल्या मराठी माणसाला महानगरातला मराठी माणूस का कोण जाणे.. जवळचा समजत नाही. पण आजच्या लेखनाचा तो विषय नव्हे!
पुणेरी लोक, पुणेरी पाट्या, पुणेरी देवळे, पुणेरी लोकांचे १ ते ४ आराम करणे, पुणेरी लोकांचा तुसडेपणा, त्यांची कंजुषी वगैरे वगैरेबाबत बरेच काही लिहीले, बोलले, छापले, दाखवले गेले आहे. यावर मराठी चित्रपटसुध्दा येऊन गेला आहे. विख्यात विनोदी लेखक अशोक नायगावकर एका कार्यक्रमात पुणेरी मित्राबद्दल बोलताना म्हणाले होते की त्यांचा तो मित्र त्यांना गेली पंधरा वर्षांहुन अधिक काळ ‘पुढच्या वेळी आलास तर घरी जेवायलाच ये' असे म्हणत असल्याचे सांगतो. मित्राने एकदा त्यांना रिवशात घालून तो राहात असलेल्या इमारतीजवळ नेले व खालूनच हात वर दाखवून सांगितले की ‘तो तिसऱ्या मजल्यावरचा कॉर्नरचा पलॅट दिसतो ना तोच माझा...' आणि घरी न नेता त्याच रिवशाने त्यांना खालच्या खालूनच परत आणले वगैरे! आता नायगावकर हे साहित्यिक असल्याने हे खरेच घडले आहे की त्यांची ती विनोदासाठी केलेली निर्मिती आहे असे समजायला जागा नाही. नायगावकरांप्रमाणे मराठीतील अनेक नामांकित साहित्यिकांनीही पुणेरी लोकांबद्दल लिहुन ठेवले आहे. माझ्यापुरते म्हणाल तर माझा अनुभव वेगळा आहे. माझा जन्मच मुळी मुंबईच्या जे जे हॉस्पिटलचा असल्याने मी जातिवंत व जन्मजात मुंबईकर आहे. पण मुंबईचा आहे म्हणून अन्य कोणत्या शहरातल्या लोकांना हिणवावे, त्यांना तुच्छ, दुय्यम लेखावे असे मला कधीही वाटले नाही. प्रत्येक गाव, तालुका, शहर, जिल्हा, महानगर आपले आपले वैशिष्ट्य बाळगून असते. बरं ते मग त्या भागातील प्रत्येकात पाहायला मिळेलच अशातलाही भाग नाही. त्या वैशिष्ट्याचे सामान्यीकरण, जनरलायझेशन करुन जमत नाही. नागपुरची संत्री, कोल्हापूरचा ठेचा/मिसळ, खान्देशातले वांग्याचे भरीत, नाशिकचा चिवडा, पुण्याची बाकरवडी, पेशवाई थाट-शनिवारवाडा वगैरे त्या त्या काळापुरते होते. ते तिकडच्या प्रत्येकात दिसून येईलच असा काही भाग नसतो. माझा पुणेरी लोकांबद्दलचा अनुभव एकदम वेगळा आहे. माझ्या जन्माआधी काही वर्षे माझे आईवडील पुण्यात दापोडी-खडकी भागात राहिले होते. तिथे मुंबई-पुणे हमरस्त्यावर माझ्या वडिलांच्या मित्राचे स्व. भीमाशंकर महाशेट्टी यांचे ‘जय भवानी हिंदु हॉटेल' नावाचे उपहारगृह होते. काही वर्षे तेथे राहिल्यावर माझे आई-वडील पुन्हा मुंबईला आले. मात्र आमचे त्या परिवाराकडे पुण्याला व त्यांचे आमच्याकडे येणेजाणे राहिले. महाशेट्टी यांच्या पत्नी स्व. सुशिला या गोव्याच्या होत्या. त्यांचे प्रदीर्घकाळ पुण्यात वास्तव्य होते. त्या परिवाराचा मला खूप चांगला स्नेह लाभला. त्यांनी माझे व माझ्या दोन्ही बहिणींचे खूप लाड केले. मुंबईला येताना आमच्यासाठी ते कपडे, बराच खाऊ घेऊन येत. आम्ही पुण्याला गेलो तर पुणे फिरवीत, सिनेमे दाखवीत असत. ज्याला ‘टिपीकल पुणेरी' समजले जाते असा कसलाच अनुभव मला त्यांच्या वर्तनातून कधीही दिसला नाही. त्या दोघांचेही देहावसान झाले. पण त्यांची आठवण मला नेहमीच व्याकुळ करते.
दुसरे पुणेरी उदाहरण मी नोकरीला लागल्यानंतरचे आहे. नेरुळ, नवी मुंबईत त्यावेळी असलेल्या ‘लंडन पिल्सनर' कंपनीत मी १९८५ साली रुजु झालो. त्यावेळी तिथे पर्सोनेल ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजर होते श्री. श्रीरंग सुनंद साने. ते पुण्याचे. आठवडाभर काम केल्यावर अनेकदा ते पुण्याला घरी जात असत. श्री. साने यांनी आमची कंपनी मधल्या काळात सोडली. त्यानंतर पुन्हा १९८९ च्या सुमारास ते पुन्हा कंपनीत दाखल झाले. त्यानंतर मग काही काळाने ते ‘टाटा मोटर्स' मध्ये गेले. तेथून सेवानिवृत्त झाले. २०२३ साली श्री. साने यांनी मला फोन करुन तत्कालिन ‘लंडन पिल्सनर'च्या मित्रांना आपण पार्टी देणार आहोत असे सांगून तशी व्यवस्था करण्यास सांगितले व बेलापूर येथील एका हॉटेलात ती पार्टी पार पडली. पुणेरी लोक कंजुष समजण्याचा प्रघात, त्यातही पुणेकरांवर टिका होताना त्याचा रोख ब्राह्मण लोकांवर असतो. श्री. साने यांचे हे वर्तन त्या साऱ्याला छेद देणारे! जी कंपनी आपण सोडुन तीस वर्षांहुन अधिक काळ लोटला आहे, तेथील मित्रांना पार्टीसाठी बोलवायचे व त्यासाठी स्वतः पुण्याहुन नवी मुंबईत यायचे कष्ट कोण कशाला घ्ोईल? श्री सुनंद साने या पुणेकराबद्दल मला अभिमान आहे.
आणखी अशी दोन पुणेकरांची, तीही ब्राह्मणांची उदाहरणे मला येथे द्यावीशी वाटतात. नवी मुंबईत नेरूळला दीर्घकाळ राहणाऱ्या सौ. कौमुदी गोडबोले या साहित्यिक महिला गेली तीन वर्षे पुणेकर बनल्या आहेत. माझे व्याही गज आनन म्हात्रे यांच्यासमवेत त्यांच्या पुण्यातल्या घरी जाण्याचा योग आला. त्यांची सून, नाती यांचे वर्तन आश्वासक होते. अनेक ठिकाणी ‘तुझे मित्र, तुझे नातेवाईक तू बघ' अशी मानसिकता ठेवून घरातले बाकीचे वावरतात व आपल्या रुममध्ये दारे लावून बसतात असे वातावरण असणारे हे युग आहे. तिथे आम्हाला गोडबोले यांच्या घरचे वातावरण आतिथ्यशील, अतिथीस्नेही वाटले व ते मनापासून होते, ओढूनताणून आणलेले नव्हते हे विशेष. सौ.उज्जला नीळकंठ मालाडकर या लेखिका माझ्या स्नेही. त्याही पुण्यात राहतात. त्यांच्या पतीच्या पुस्तकाचे प्रकाशन एप्रिल २०२४ मध्ये पुण्यात ठेवले होते. त्यावेळी जायला न जमल्याने मी व गज आनन म्हात्रे आम्ही सौ. गोडबोले यांना भेटल्यानंतर मालाडकर परिवाराकडे गेलो. तिथेही आमचे यथोचित आगत-स्वागत तर झालेच; पण भोजनासाठी आग्रह करुन थेट जेवायलाच बसवले गेले. वर आम्हाला वस्त्रप्रावरणे देऊन गौरवले गेले व या साऱ्या प्रसंगी त्यांचा मुलगा, सून आम्हाला हवे नको ते जातीने बघत होते हे विशेष! माझी ब्रेल लिपीतील पुस्तके बनवणाऱ्या सौ. प्रतिभा प्रणव सेनगुप्ता याही मंडणगड, रत्नागिरी येथील अंधशाळेला सुट्टी लागल्यावर त्यांच्या पुण्यातील घरी जातात. सौ. सेनगुप्ता यांच्या स्नेहमयी आदरातिथ्याचा मी आणि माझ्यासोबत त्या अंधशाळेत गेलेल्या अनेकांनी वेळोवेळी लाभ घेतला आहे. या शाळेला किंवा कोणत्याही सांस्कृतिक, आध्यात्मिक, शैक्षणिक कार्याला पुण्यातील किंवा अन्य ठिकाणच्या ब्राह्मण समाजातील सदस्यांनी दिलेल्या भेटी, मदत, देणग्या यांचे प्रमाण नेहमीच लक्षणीय असते. दै.लोकसत्तेने ‘सर्वकार्येषू सर्वदा' साठी केलेले मदतीचे आवाहन व त्याला प्रतिसाद देणाऱ्यांची आडनावे वाचल्यास मी काय सांगतो ते ध्यानात येईल.
सांगायचे तात्पर्य हेच की केवळ समाजावरुन, जातीवरुन, भूभागावरुन ढोबळ मानाने एखाद्याची पारख केल्यास ती चुकीची ठरण्याचीच व आपापसात उगाचच कलुषित वातावरण निर्माण होण्याची शवयता वाढते. नावे, आडनावे, जातीविशेष पाहुन कुणाला जोखू नका...त्याची गुणवत्ता, संस्कार, प्रामाणिकपणा, समाजाप्रतिची बांधिलकी, सामीलकी पाहा. माणसे जोडण्यास, सामाजिक सौहार्द राखण्यास ते अधिक उपयुवत ठरेल. - राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई