‘युद्धानंतर...' च्या विनाशाची विदारक बखर
आदित्य दवणे हे गेले जवळजवळ दशकभर कवी, लेखक, वक्ते म्हणून साहित्य जगताला परिचित आहेत. अनेक नियतकालिकातून त्यांचे साहित्य प्रसिद्ध होत असते. त्यांचा ‘युद्धानंतर..' हा पहिलाच काव्यसंग्रह नुकताच प्रसिद्ध झाला आहे. पहिल्याच वाचनात ‘जळलेल्या प्रेताच्या चितेवर पसरलेल्या विद्रुप राखेप्रमाणे युद्धानंतर.. झालेल्या विस्फोटक परिणामांची प्रलयंकारी प्रत्यय आणून देणारी काव्यमालिका म्हणजे हा काव्यसंग्रह,' याची जाणीव होते. यातील बऱ्याचशा कविता आपल्या मनात अस्वस्थतेचे बीज पेरून जातात.
आदित्य दवणे जास्त संवेदनशील आहेत युद्धानंतर होणाऱ्या लहान मुलांच्या मानसिकतेविषयी, त्यांच्या शारीरिक मानसिक खच्चीकरणाविषयी. पहिल्याच अनुवाद (पान २१) या कवितेची सुरुवातच ते अशी करतात...‘जिथे मुले खेळायची ती बागच त्यांची दफनभूमी झालीये' बातम्या वाचताना आणि बातमीचा अनुवाद केल्यानंतर तिची कविता होते याचा विदारक प्रत्यय कवीला येतो. लहान मुलांच्या विचार प्रक्रियेमध्ये होणारा ‘धोकादायक आणि धक्कादायक बदल' कॅसेट (पान २४/२५) या कवितेत अतिशय परिणामकारकरित्या शब्दात टिपला आहे. न हसणाऱ्या मुलांना ‘धडाम आवाज झाला म्हणजे आपला देव हसतो' असं शिकवलं जातं. अर्थात मुलं त्याचं पालन करत धडाम आवाज झाला की हसायला लागतात. काळीज कुरतडणारा विरोधाभास! आणि शेवटी कवीच्या कारुण्यपूर्ण ओळी येतात, ‘मुलं शहाणी आहेत पालकांचं ऐकतात'. कामगार ही अशीच एक कविता. (पान २८) काळजाचा ठाव घेणारी. कब्रस्थानात डंपरने मृतदेह लोटण्याचे काम करणाऱ्या कामगारांची. ‘त्या विराण वाळवंटी गावात आज माणसांच्या वस्त्या कमी आणि मातीने झाकले खड्डे वारेमाप आहेत..' असं गावाचं वर्णन कवी करतो. शेवटच्या ओळी अंगावर काटा आणणाऱ्या.. ‘दिवस मावळतीला झुकताना ते (कामगार) घ्ोतात दिवसाचा मोबदला आणि पोटभरीचे काही शिजवून ते निजतात उद्याही मिळेल काम अशीआशा उराशी बाळगून' (पान २८) ‘चित्रकलेचे तास' (पान ३३) या कवितेत, मृत माणसे, रणगाडे, रायफल घेऊन फिरणारे सैनिक यांची चित्रे मुलांनी काढलेली असतात. एका मुलाकडील संपूर्ण लाल रंगाने रंगवलेला कागद पाहून मुख्याध्यापक मुलाला विचारतात, ‘हे काय आहे?' ‘ही आमच्या घरामधली सफेद फरशी आहे!' मुलाचं, आपली मनोभूमी हादरवून टाकणारं उत्तर! शेवटी कवीची टिपणीः ‘शाळेतील मुलांचे चित्रकलेचे तास थांबले' त्यानंतर...! वाचक मूक ! कँडल मार्च्र पान ३५) या कवितेत ‘एका दुःखद घटनेसाठी जगभर निघालेले चांगल्या माणसांचे कँडल मार्च पाहून, बहुदा मागणी वाढेल मेणाची येत्या काही दिवसात!' अशी रास्त आणि विचारमग्न करणारी धास्ती कवी व्यक्त करतो. अप्रत्यक्षरित्या, दुःखद घटनांचे पीक वाढेलअशी सूचक भविष्यवाणी करतो, तेव्हा काळजीचा भुंगा आपलाही मेंदूचा भुगा करायला सुरुवात करतो.
स्त्री मनाची घालमेल व्यक्त करणारी ती (पान ३८) ही अशीच एक कविता, शिकायची तीव्र इच्छा असूनही चार भिंतीत बसून राहिलेल्या तिची! ती मुलं (पान ४०),फलक; (पान ४८), प्रोटोकॉल (पान ५२) पीस ट्रीट पान ५५), शुद्ध (पान ८६) या अशाच काही बेचैनीच्या प्रदेशात घेऊन जाणाऱ्या कविता! शेवटी अंतर्मनाच्या खोल तळाशी धगधगत असलेल्या युद्धखोर उर्मींचा परिपाक म्हणजे बाह्य जगातील युध्द. म्हणून शेवटी कवी स्वतःलाच खणतखणत आपल्या आतच वाढणाऱ्या नाझीकडे अगतिकतेने पाहत, ‘माझ्यातले युद्ध मला कुठे घेऊन जात आहे?' (होलोकॉस्ट पान११४) असा अतिशय कारुण्यपूर्ण आणि विचारप्रवर्तक प्रश्न स्वतःलाच विचारतो, आणि इथेच हा कवितासंग्रह संपतो.
‘राजहंस'सारखे प्रतिष्ठित प्रकाशन, निरजाताईसारख्या जाणकार कवयित्रीचे संपादन आणि प्रस्तावना यामुळे पुस्तकाचे साहित्यिक मूल्य आधीच दर्जेदार झालेले आहे. या योगालाही भाग्य लागतं. निरजाताईंची प्रस्तावना मर्मग्राही. सिद्धहस्त चित्रकार श्री. चंद्रमोहन कुलकर्णी यांचे मुखपृष्ठ आणि मांडणी नेहमीप्रमाणे वेधक आणि विषयाला धरून. वर उल्लेख केल्याप्रमाणे कवीचा हा पहिलाच काव्यसंग्रह. पहिलेपणाचे काही ठसे याही पुस्तकात आढळतात. पण जाहीरपणे ते ठसे अधोरेखित करणं नैतिकतेला धरुन होणार नाही. कवी स्वतः ‘डोळस' आहे आणि मुख्य म्हणजे उच्च साहित्यांक असलेल्या मंडळींमध्ये त्याची उठबस आहे. त्यामुळे त्याचे यापुढील साहित्य अधिक सकस होईल अशी आशा व्यक्त करतो आणि मनापासून शुभेच्छा देत थांबतो.
युद्धानंतर... : कवितासंग्रह
कवी : आदित्य दवणे
प्रकाशकः राजहंस प्रकाशन
संपादन आणि प्रस्तावना : नीरजा
किंमत : रु १८०/-
-अशोक गुप्ते