पायी नर्मदा परिक्रमा

जानेवारी १७ जानेवारी २०२३ ते२८  एप्रिल  २०२३  माझे यजमान श्री. रविंद्र सूर्याजी गवस ह्यांनी चार महिने पायी चालत नर्मदा परिक्रमा केली. अर्थात आपण  निमित्त! कर्ता करविता परमेश्वर! नर्मदा मैय्याने ह्यांच्याकडून परिक्रमा करून घेतली.

नर्मदा मैय्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. ही तपोस्थल भूमी आहे. नर्मदा मैय्याच्या तटावर सर्व देवदेवता, ऋषीमुनी, राक्षस, गंधर्व, कुबेर ह्यांनी लिंग स्थापन करून तपश्चर्या केलेली आहे. त्यांच्याच नावाने मैय्या किनारी तीर्थक्षेत्र आहे. जसे की वेदा संगम, ब्राह्मण गाव, कुबेरभंडारी, इंद्रावत मैय्याचा उगम अमरकंठक!

 १७ जानेवारी २०२३ सानपाडा, नवी मुंबई येथून कुर्ला स्टेशनला आम्ही सहकुटुंब व आमच्या शेजारील कुटुंब ह्यांना कुर्ला स्टेशनपर्यंत सोडण्यास पोहोचलो. तेथून रात्री साडेदहा वाजताची बनारस ट्रेन होती. त्या ट्रेनचा प्रवास रात्री साडेदहाला सुरू झाला आणि दुसऱ्या दिवशी अर्थात १८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी श्री.रवींद्र गवस खांडवा या ठिकाणी उतरले. उतरल्यावर चहा पाणी, फ्रेश झाल्यानंतर ओंकारेश्वरला जाण्यासाठी बसेस होत्या. १४० रुपये देऊन ओंकारेश्वर या पवित्र भूमीत जाऊन पोहोचले. तेथून दहा मिनिटे चालत  गेल्यानंतर ओंकारेश्वर येथे शेगावचे गजानन महाराज यांचा ट्रस्ट आहे तेथे जाऊन रजिस्ट्रेशन केलं. अर्थात भाव पूर्ण नाव नोंदणी केली. तिथे ज्यांनी आधी परिक्रमा पूर्ण केलेली आहे त्यांच्याकडे  श्री रवींद्र गवस गेले व सर्व  चौकशी केली. राहण्यासंदर्भात, परिक्रमा सगळी माहिती करून घेतली व पुढे ते ममलेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेले. अशा पद्धतीने ममलेश्वर  मंदिराच्या खाली गो घाटावर नवीन नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भक्तांचा संकल्प करून घेतला जातो; त्या ठिकाणी श्री. गवस गेले व त्यांनी तिकडे पूजा विधी संकल्प माहिती करून घेतली. समोरच्या तीरावर ओंकारेश्वर मंदिर आहे. ओंकारेश्वर यांचे दर्शन करून या असे पुजाऱ्याने सुचवले त्यानुसार यांनी ओंकारेश्वर देवाचे दर्शन घेतले व पुन्हा गजानन महाराज आश्रमात आले व १९जानेवारी २०२३ रोजी सकाळी ओंकारेश्वर येथे जाऊन संकल्प करून नर्मदा मैयाच्या परिक्रमेस सुरुवात केली.

नर्मदे हर
रम्य, सुंदर, प्रसन्न अशा भक्तिमय वातावरणात नर्मदा मैयाच्या पायी परिक्रमेला सुरुवात केली. मैय्याचे सुंदर  रूप डोळ्यात सामावून तिच्यापुढे नतमस्तक होऊन परिक्रमा सुरू वयाच्या पन्नासाव्या वर्षी परिक्रमा सुरू केली. ह्यांना खूप धन्य झाल्यासारखे वाटले. या परिक्रमेत अध्यात्म भक्तीभाव विज्ञान भूगोल भौगोलिक सर्व लोकजीवन सर्व जवळून अनुभवता आले. माणुसकी, शिक्षण, अन्नदान खूप जवळून पाहता आले. खरंतर ते एकटेच परिक्रमेला निघाले होते. कोणी ओळखीचे नव्हते फारशी काही माहिती नव्हती. परंतु श्रद्धा, भक्ती,  कष्ट करण्याची तयारी, नवीन काहीतरी जाणून घेण्याची वृत्ती आणि अर्थात देवाचा असलेला आशीर्वाद या सर्वांमुळे अनेक लोक भेटत गेली जोडत गेली आणि परिक्रमा सुसह्य व्यवस्थित पार पडली.

१९ जानेवारी ओंकारेश्वर येथून इथून परिक्रमेला सुरुवात केली. तिथून चालत तिथे प्रथमतः हे भरकटले गेले, रस्ता चुकला, काही समजत नव्हते. जंगलात पूर्ण भरकटले रस्ता सापडत नव्हता. खूप असं टेन्शन आलं होतं. परंतु असलेली जिद्द, मैयाचे नाव घेतले आणि पुढे एका वाटसरूने रस्ता सांगितला आणि शोधत शोधत त्याप्रमाणेच मोरटक्का या ठिकाणी जाऊन पोहोचले. तिथे आश्रमातील लोकांनी खूप सेवा अर्पण केली. आळंदीचे दोन परिक्रमावासी भेटले. १९ जानेवारी ओंकारेश्वर ते मोरटक्का असे एकूण दहा किलोमीटर पायी चालणे झाले. दुसऱ्या दिवशी २०जानेवारीला टोकसर येथे गोमुखाटाचे दर्शन घेतले तेथून रावेत खेडी येथे पोहोचले. तेथे मैंय्याकिनारी थोरल्या बाजीरावांची समाधी आहे, तिचे मनोभावे दर्शन घेतले व पुढे प्रस्थान केले. याच दिवशी भटान येथे सियाराम बापूंच्या आश्रमात मुक्काम केला. त्या दिवशी मोनी अमावस्या होती. सियाराम बापूंचे दर्शन घेतले. मनोभावे नमस्कार केला व मैया किनारी तुपाचे दिवे सोडले. खूप सुंदर असे दृश्य दिसत होते. पूर्ण पाण्यामध्ये दिवे तरंगत जात होते. लख्ख असा प्रकाश दिसत होता. मनोहरी व भक्तीमय असे ते दृश्य होते की डोळ्यात साठवून मनात रुजत होते. दुसऱ्या दिवशी घाट लेपा घाट की जे भारतीठाकूर यांचे शैक्षणिक पुनर्वसन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे, त्यानंतर वेदासंगम ब्रह्मदेवाचे तपोभूमी ब्रह्मदेवाची तपभूमी माकड खेडा मांडव ऋषींच्या आश्रमामध्ये मुक्काम! शालिवाहन कठोरा चिखली. चिखली तेथून ब्राह्मणगाव ब्रह्मदेवाचे तीर्थस्थान येथे मुक्काम पायी परिक्रमा ही खूप खडतर होती, कष्टमय होती.

परंतु मनात असलेल्या श्रद्धेमुळे भक्ती-श्रद्धेचा संगम यामुळे सहज प्रवास होत होता. वेगवेगळ्या अध्यात्मक अनुभूती येत होत्या. तलवाडा कपिल देवाचे दर्शन घेऊन बडवाणी येथे पोहोचले. आनंदाची बाब म्हणजे बडवाणीला पोहोचले, त्यादिवशी नर्मदा जयंती होती राजघाटला मोठा उत्सव होता. त्या उत्सवामध्ये सहभागी होता आले. मैय्याच्या पूजेचा भंडारा घेवून शूळपाणी जंगलात प्रवेश केला. जंगलात घाबरत घाबरत का होईना, पण बोरखडी येथे  पोहोचले. तेथील गावकऱ्यांकडे आश्रमाची केल्यानंतर त्यांनी रस्ता दाखवला व तेथून पुढे लुटारू मामांच्या आश्रमात पोहोचले. रात्रीचे जेवण करून गप्पाटप्पा मारून तेथे मुक्काम केला. पूर्वीचे आणि आताचे जंगलात खूप फरक झाला आहे हे गप्पा मारताना लक्षात आले. लुटारूमामा जरी नाव प्रसिद्ध असले तरी शूळ पाणी जंगलात पूर्वी लूटमार केली जात असे, अशावेळी संरक्षण म्हणून या मामांची मदत होत असे म्हणून त्यांचे नाव वेगळे असले तरी लुटारू मामा म्हणूनच ते प्रसिद्ध आहे. ते भक्तांना संरक्षित करतात. लुटारू मामा मने लुटतात. पैसा अडका नाही. सकाळी उठून सकाळी उठून चहापाणी झाल्यानंतर  डोंगरकडे कपारी मामाने सांगितलेल्या रस्त्यावरून कच्च्या रस्त्यावरून छोट्याशा पायवाटेवरून बॅकवॉटरवरून लखनगिरी आश्रमात पोहोचले. हळूहळू चालण्याचा वेग हा दिवसा एका दिवसाचा वीस किलोमीटर झाला कडक ऊन, कच्चा रस्ता सर्व पार करून प्रवास होत होता. मैंय्याची विविध रूपे अधूनमधून पाहायला मिळत होती. सांगायचे म्हणजे मैयाच्या किनाऱ्याहूनच परिक्रमा करावी लागते. मैय्याला ओलांडून जायचे नाही.  एका हातात मैयाचे पाणी कमंडलू किंवा बॉटलमध्ये, पाठीवर स्वतःची पिशवी घेऊन चालत प्रवास करावा लागत होता. अगदी लहान लहान मुलंसुद्धा थांबून स्वतः चहा बनवून देत असत. भगिनी वर्गसुद्धा थांबून मुद्दामहून सेवा म्हणून नाष्टा, जेवण देत असत. या भागामध्ये मुलींना खूप आदराने वागवले जाते हे जाणवले. गोधन, झाडं भरपूर प्रमाणात असल्याचे लक्षात आले होते. लखनगिरी सामलेट बादल प्रवास केला. सकाळी पाच वाजता उठून प्रातर्विधी आवरून पूजापाठ करून साडे सहा सात वाजता परिक्रमेला सुरुवात करत असत. महिला वर्ग तर साडेतीन वाजता उठून सगळ्या प्रातःविधी, पूजा पाठ करून सात वाजता परिक्रमेला सुरुवात करत असत. ज्याप्रमाणे पंढरपूरला आपण माऊली माऊली सर्वांना हाक मारतो त्याप्रमाणे येथे सगळेजण एकमेकांना भगिनींना मैया या नावाने संबोधित असत.

सर्वात कठीण मार्ग म्हणजे खप्परमाल ! खप्परमालचा प्रवास हा फारच कठीण होता .कायम स्मरणात राहणारा असा होता. कारण सर्व डोंगराळ भाग, कच्चा रस्ता, उंच डोंगर, खोल दरी या जरासुद्धा पाय निसटला तर डायरेक्ट दरी मध्ये कोसळण्याची शक्यता होती. हा कठीण प्रवास पार करून पुढे धडगावला पोहोचले. नवी मुंबई, महाराष्ट्र, मध्य प्रदेश असा हा प्रवास करत राहील धडगाव, मोलगी, मातासार करत गोरा कॉलनीला पोहोचले. तेथे शूळपाणी ईश्वराचे मंदिर आहे  आणि जुने मंदिर ८० फूट पाण्यामध्ये आहे. नवीन मंदिर गोरा कॉलनीमध्ये आहे. त्याचे दर्शन घेतले. तिथे खूपच खडतर अशी परिस्थिती आहे. अंगावर नीट कपडा नाही, रस्ते नाही, शिक्षणाच्या सुविधा नाहीत फक्त बाजरा मका, तूर, वरी पिकते. तेच त्यांचे पूर्ण जेवण! पाण्यासाठी तिथे खूप वणवण लोकांना करावी लागते. प्रवास सुरू केला. दुसऱ्या दिवशी इंद्रावरण इंद्रेश्वर तीर्थाचे दर्शन घेतले. साडेतीन हजार किलोमीटर परिक्रमा ही पायी केली. ओंकारेश्वर सुरुवात केली आणि मैंय्याला वळसा ओंकारेश्वर दक्षिण रेवा संगम रेवा संगम आदिवासी क्षेत्र आहे. साडेतीन हजार किलोमीटर ही परिक्रमा परिक्रमा महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरात अशा ठिकाणातून होते. रेवा संगम मधून संगमवरून बोटीने आपण उत्तर तटावर जातो. समुद्र पार करतो. जवळजवळ चार तासाचा प्रवास आहे. खवळलेला समुद्र असेल तर फारच धोकादायक परिस्थिती असते. उत्तरतट  मिठीतलाई अमरकंठक तेराशे किलोमीटर असून ग्रामीण शहरी भागातून मैया वाहते मिठीतलाईवरून बुरुज येथे प्रस्थान केले. भरूच हे भृगु ऋषी तपोभूमी असून त्यांच्या नावावरूनच भरूच हे नाव पडलेले आहे. तेथे निळकंठेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन पुढे कुबेर भंडारी, अनुसया माता दर्शन होत पुढे प्रवास चालू राहतो व गरुडेश्वर येथे पोहोचले. हापेश्वर पूर्ण जंगली भागातून प्रवास सुरू होतो.

हापेश्वर कोटेश्वर मांडव मांडवगड हा सर्वात कठीण प्रवास आहे. पूर्णगड चढणे आणि उतरणे एक मोठे दिव्य असून तेथे अनेक प्राचीन स्थळे पहावयास मिळतात. जसेकी पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर महेश्वरी घाट, रेवा कुंड मांडवगडचा किल्ला, प्राचीन महल, राम मंदिर महादेवाचे मंदिर निळकंठ महादेवाचे मंदिर प्राचीन स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना पहावयास मिळतो. तिथून पुढे धामणोद मंडलेश्वराचे दर्शन घेऊन गुप्तेश्वर महादेव परकाया प्रवेश शंकराचार्य मंदिराचे दर्शन घ्ोतले. विशेष सांगायचे म्हणजे या परिक्रमेमध्ये फक्त अध्यात्म वृत्ती, भक्तगण हे तर होतेच; पण त्याचबरोबर डॉक्टर, उच्चपदस्थ अधिकारी, कलेक्टर हेसुद्धा सहभागी होते आणि लोकांना सेवा देत होते. काही जणांनी तर मोठ्या पदावरच्या नोकरी सोडून ते फक्त सेवाभाव, मदत कार्य म्हणून तेथे छोटेसे झोपडी बांधून लोकांना सेवा देत होते. ते खऱ्या अर्थाने मानव सेवा ही ईश्वरसेवा म्हणून जोपासत होते याची अनुभूती या ठिकाणी घेता आली.

  नेमावर अर्थात नर्मदा मैयाचे नाभिस्थान! या प्रवासादरम्यान जयंती माता हे खूप खडतर जंगल लागते. वाघ, सिंह प्राणी राहतात हा ४० किलोमीटरचा प्रवास समूहानेच केला जातो. कारण इथे जीवाला धोका असतो. पूर्ण जंगल आहे. आजूबाजूला काही सोयी सुविधा तिथे उपलब्ध नाहीत. या जंगलातून पुढे गेल्यानंतर धर्मेश्वर हे ठिकाण लागते की जेथे युधिष्ठिर राजाने महादेवाचे लिंग स्थापन केलेले आहे की ज्याला धर्मेशवर असे नाव आहे. हा प्रवास पूर्ण धरण क्षेत्राशी निगडित आहे. येथे पुर्नवसित गावे आहेत. येथे आदिवासी लोकांची सेवा केली जाते. विशेष म्हणजे या परिक्रमेमध्ये  किती गरीब असू दे; परंतु परिक्रमावासियाना थांबून आपल्या यथाशक्तीप्रमाणे त्यांना जेवण, अल्पोपहार सेवा म्हणून दिली जाते. मनाची श्रीमंती, भक्तीभाव या ठिकाणी अनुभवास मिळते. पुढे निळकंठ, टेंबे स्वामीं स्वामी, रंग अवधूत दर्शन संगम होतो. तेथून पुढे बुधनीला प्रस्थान केले.

 ना.शिवराज चव्हाण मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्या गावातून प्रवास सुरू झाला. हा प्रवास करत करत जबलपूर गौरी घाट, जोगीटिकरियाला पोहोचले. तेथे मैया बाल स्वरूपात पाहायला मिळते ते अगदी अमरकंटकपर्यंत! अमरकंटक ज्या ठिकाणाहून खरंतर मैयाचा उगम होतो. तेथे कन्या पूजन केले. अमरकंटक ते दिंडोरी दिंडोरी शंभर किलोमीटर पायी चालत प्रवास केला. या प्रवासात कबीर चबुतरा, सोनपुडा दर्शन करून पुढे कर मंडला ! करमंडलला पोचतो की ज्या ठिकाणी गजानन महाराजांचे पादुका स्थान आहे. पुढे गोरखपूर नाथांचे मंदिर तेथे दर्शन करून गडसरायला पोहोचले. तिथून रामपुरीला!

 रामपुरी कचरा टोला करत चावी गावला पोहोचले. बिलगाव रामनगर तिथून सूरजकुंड महाराजपुर ते नरसिंगपूर (पाण्याचा पूर्ण अभाव त्यामुळे परिक्रमावासी कडुनिंबाची पाने खातात ) सहस्त्रधारा धागा, बुधेरी घाट पाटण कणसूर, राम कुंडला पोहोचले. हरदा हरदा  करत ओंकारेश्वरला पोहोचले. ओंकारेश्वरला पोहोचल्यानंतर नर्मदा मैया परिक्रमा पूर्ण झाल्याचा संकल्पपूर्तीबद्दल पुन्हा एक पूजा; कन्या पूजन करण्यात आले. नर्मदा परिक्रमेच्या वेळी सोबत घेतलेले मैयाचे जल ओंकारेश्वरला अर्पण केले जाते आणि मंधाता परिक्रमा पूर्ण केली जाते. तेथेच ऋणमुक्तेश्वराचे मंदिर आहे. परिक्रमेतले ऋण म्हणून चणाडाळ अर्पण केली जाते. अशाप्रकारे ही परिक्रमा पूर्ण. मग ओंकारेश्वर ते खांडवा खांडवा ते कुर्ला आणि कुर्ला ते नवी मुंबई घरी प्रवास झाला.

 १७ जानेवारी २०२३  ते २८ एप्रिल २०२३ पायी परिक्रमा पूर्ण झाली. पण ही परिक्रमा कायम मनात रुंजी घालते.... त्यानंतरही डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ पायी चालत, गाडीने एक महिन्यात परिक्रमा केली. पुन्हा १० फेब्रुवारी २०२४ रोजी  श्री.व सौ.रविंद्र गवस आम्ही उभयतांनी एकत्र नर्मदा मैय्याचे दर्शन घेतले.
   नर्मदे हर!
   -सौ.ऋतुजा रविंद्र गवस 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

दिवाळी सण मोठा, नाही भेटवस्तुंना तोटा !