रात्रभर समुद्रावर....

मी कोकणातला असूनदेखील दापोलीचं सृष्टी सौंदर्य पाहिलं नव्हतं. दापोलीबद्दल खूप काही ऐकलं होतं, वाचलं होतं. खरंतर श्री. ना. पेंडसे यांच्या ‘गारंबीचा बापू' या कादंबरीमुळे दापोलीच्या अभिजात सौंदर्याची प्रचिती आली होती. विशेषतः आंजर्ले, हर्णे, मुरूड, पालगड, केळशी, मुर्डी इ. ठिकाणांबद्दल खूप काही ऐकलं होतं. शिवाय कोकण कृषि विद्यापीठ, हर्णे येथील ऐतिहासिक मच्छीमारी बंदर, आंजर्ले येथील कड्यावरचा गणपती, पूज्य साने गुरूजीचं पालगड हे गाव, कवी केशवसुतांची काव्य प्रतिभा बहरली ते निसर्गरम्य वळणे गाव, डॉ. आंबेडकर यांचं काळकाईकोंड येथील राहते घर... अशी प्रमुख यादी माझ्या मनात होतीच. कधीतरी सवडीनं हे पाहू असं ठरवलं होतं; आणि गेल्यावर्षी मे महिन्यातच हा योग आला.

मी, पत्नी, मुलगा आणि जवळचे नातेवाईक असे सहा-सात जण आम्ही मे महिन्याच्या सुट्टीचं निमित्त साधून निसर्गरम्य दापोलीत दाखल झालो आणि स्वच्छ, सुंदर समुद्र किनारा पाहून थक्कच झालो ! खरंतर मुंबईत सतत माझ्या डोळ्यासमोर समुद्र असताना मग या समुद्राचं आणखी वेगळे पण ते काय? हा माझा प्रश्न. पण इथला समुद्र किनारा खरोखरच मनाला भुरळ घालणारा आहे. विस्तिर्ण पसरलेला तो विशाल...शांत सागर मनाला खिळवून ठेवू लागला. मग समुद्र किना-यावरून चालत चालत हर्णेचं ऐतिहासिक बंदर, मच्छीमारांच्या समुद्रात जाणा-या बैलगाड्या, मासे घेऊन येणा-या बैलगाड्या पाहणं म्हणजे एक सोहळाच असतो. असं म्हणतात की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पुनित झालेलं रत्नागिरी जिल्ह्यातलं हर्णे हे अत्यंत महत्वाचं बंदर साहजिकच, इथली रेलचेल, मासेमारी, मासेविक्री किना-यावरील धावपळ पाहून आम्ही सारे थक्क झालो.

कोकण कृर्षी विद्यापीठ आणि तेथील शेतीविषयक नवनवे उपक्रम याचबरोबर अन्य प्रेक्षणिय स्थळांची धावती भेट झाल्यावर सारेजण कर्दे येथील समुद्रावर आलो.. एव्हाना सूर्य अस्ताला गेला होता. उन्हाची काहीली थांबून भन्नाट वारा सुरू झाला होता आणि आम्हा प्रत्येकाला तो वारा हवाहवासा वाटू लागला. कर्दे गावातील एक ओळखीचे ग्रामस्थ श्री. कर्देकर यांच्याकडे आमची रहाण्याची जेवणाची सोय होती. पण आम्हाला त्या वाळूवरून उठावंसंच वाटत नव्हतं. कर्देकरांचं घर अगदी समुद्राला लागून चार-पाच मिनिटांच्या अंतरावर ते गरम गरम पदार्थ बनवून आम्ही बसलो त्या ठिकाणी घेऊन येत होते, आणि आम्ही सारे त्याचा फन्ना उडवत होतो. मी कर्देकरांना म्हटलं, ‘अहो, इथून उठावसंच वाटत नाही... वाटतं रात्रभर इथंच थांबावं...' कर्देकर म्हणाले, ‘अहो, सायब, एक काम करूया रात्री आपण पुरूष मंडळी इथच झोपूया ... बघा तर आमचा समुद्र...' मी म्हटलं, ‘काय म्हणताय काय खरंच.. ! रात्रभर समुद्रावरच रहायचं... इथं या वाळूवरच झोपायचं ... कसली भिती वगैरे?' कर्देकर चटकन म्हणाले, ‘अहो सायब, भिती-बीती काय नाय... आणि मी हाय ना... काही काळजी करू नका...।'

झालं. रात्री जेवण झाल्यावर आम्ही चौघे पुरूष आणि कर्देकर असे पाच जण समुद्रावर आलो. हातात चटया आणि उशा, माझ्या उजव्या बाजूला समुद्राच्या दिशेनं कर्देकर...! भलं मोठं आकाश आणि चांदण्या न्याहाळत आम्ही गप्पा मारत होतो. रात्रीचे ११.०० वाजून गेले होते. गप्पा चालूच होत्या...मध्येच कर्देकर म्हणाले, ‘पूर्वी ह्या डोंगराच्या दिशेनं खाली वाघ यायचा. ...कोल्ही, कुत्री भटकतात.' आमच्यापैकी काहीना वाघाची, कोल्ह्या कुत्र्याची वा मोकाट जनावराची भिती वाटत होती. कर्देकरांनी उगाचच हे सांगितलं असं वाटू लागलं. गप्पा मारता मारता कर्देकर केव्हाचे घोरू लागले. नातलग झोपले. माझा मुलगा चूळबूळ करत होता शेवटी तोही झोपला.

मी मात्र जागा होतो. उजवीकडे रोरावणारा समुद्र...त्याच्या लाटांचा स्पष्ट मावळतीला गेलेला चंद्रमा... लुकलुकणारे तारे...मोकळा किनारा आणि समुद्र सपाटीपासून वेगाने वाहणारे वारे...! एअर कुलरचा शिडकावा मारावा तसा शरीराला स्पर्श करणारा खारा वारा.! हे असं मोकळं आभाळ... आणि या नितांत चांदण्याच्या मनोहर छताखाली कितीतरी वर्षांनी मी असा स्वच्छंदी पहुडलो होतो. असा निवांत कधी मिळालाच नव्हता. पण झोप काही येत नव्हती. इतक्यात दोन कुत्रे भुंकत जवळ आले. कर्देकरांनी झोपेतच त्यांना दटावलं. ते शांत झाले. त्यातला एक कर्देकरांच्या पायथ्याशी राखण करत बसला.

थोड्या वेळानं माझ्या पायाला वाळूतून कोणतरी गुदगुल्या करू लागलं. चटकन पाय वाळूवरून वर चटईवर दुमडून घेतला. शंका नको म्हणून उठून बॅटरीनं पाहिलं. वाळूत फिरणारे समुद्र प्राणी होते. मग पाय वाळूत टाकला नाही. रात्र वाढत होती. शांतता वाढत होती आणि लाटांचा आवाज अधिक रोरावत होता. मध्येच शंका आली समुद्राला भरती आली तर...! मन साशंक झालं खरं; पण कर्देकर अनुभवी असल्यानं काही वाटलं नाही. शिवाय काही ग्रामस्थ उशीरा चटया घेऊन कुठेकुठे आसपास वाळूवर झोपत होतेच. याचा अर्थ इथल्या लोकांना समुद्राचा अंदाज आहे. दिवसभराच्या थकव्यानं माझाही कधीतरी डोळा लागला.

जाग आल्यावर पाहतो तर वारा गायब...! अरे बापरे, एवढा भन्नाट वारा गेला कुठे? आकाशातला चंद्र मावळलेला आणि तुरळक ता-यात समुद्रावर अंधारवारा पूर्ण शांत झाल्यानं दाटलेला...! मध्यरात्री समुद्राचं हे वेगळं रूप पाहिलं. इतरांचीही चुळबूळ सुरू झाली. त्या चूळबूळीत पुन्हा डोळा लागला. पहाटे जाग आली तेव्हा साडेपाच वाजून गेले होते. दिवस मोठा असल्याने चांगलच उजाडलं होतं. पुन्हा गार हवा सुरू झाली होती. बरं वाटलं. डुलकी मारून असंच पडून रहावसं वाटलं. कर्देकर मात्र उठले. उशी आणि चटई घेऊन घराच्या दिशेनं चालू लागले. आमच्या चहापाण्याची व्यवस्था करतो म्हणून सांगून गेले नि मग आम्ही हळूहळू जागे होऊ लागलो. उठून चटईवर बसलो आणि भल्या पहाटेचा शांत... धीरोदात्त समुद्र पुन्हा न्याहाळू लागलो. अख्खी रात्र कशी वाटली यावर आम्ही एकमेकांशी चर्चा करत राहिलो; तेव्हा जाणवलं... एक वेगळा अनुभव गारूड झालेला प्रत्येकाच्या मनावर... रात्रभर समुद्रावर... ।। - अशोक लोटणकर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

पायी नर्मदा परिक्रमा