दिवाळी बदलतेय...की आपण?

अलीकडच्या काळात दिवाळीच्या आठवडाभर आधीपासून एकेक पदार्थ तयार करून कुटुंबीयासोबतच शेजारी, नातेवाईक व मित्रमंडळींना आग्रहाने देण्याची परंपरा इतिहास जमा होऊ लागली आहे. विभक्त कुटुंबांची तसेच पति-पत्नी दोघ्ोही नोकरी करणाऱ्या कुटुंबांची संख्या वाढत चाललेने दिवाळीच्या फराळाच्या एकेक पदार्थासाठी स्वयंपाकघराचे युद्ध घर न करता, चटपट एक दोन पदार्थ घरी बनवून इतर फराळ रेडिमेड खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढू लागला आहे.

कोेट्यवधी दिव्यांनी
उजळून आसमंत
अंधार भेदणारी
आली पहा दिवाळी

भारतीयांना सणाचे महत्त्व वेगळे सांगायला नको. दिवाळीचे महत्त्व आगळे वेगळेच. वर्षभर तिची सगळेच वाट पाहतात असा हा सण दिवाळी. म्हटलं की गोड, तिखट, मिठाई, आकाश कंदील, नवीन कपडे, दिव्याची रोषणाई, फटाके असा मोठा जल्लोष असतो. यामध्ये आणखीन एक गोष्ट असते त्याच्याशिवाय ही दिवाळी पूर्ण होऊ शकत नाही. ती गोष्ट म्हणजे दिवाळी अंक. दिवाळी अंक प्रथेचे जनकत्व काशिनाथ रघुनाथ यांच्याकडे जाते.

संत साहित्यातील दिवाळी
आपल्याकडे अनेक शतकांची परंपरा आहे आणि संत साहित्याचा उल्लेख ओघाने आलेला दिसतो. आनंदाने प्रकाशाचा सण म्हणून दिवाळीकडे पाहिले जाते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात...
मी अविवेकाची काजळी ।
फेडोनीविवेक दीप उजळी
ते योगीया पाहे दिवाळी
निरंतर

”माणसाच्या जीवनामध्ये अविवेक हाच त्याच्या दुःखाला कारणीभूत असतो या अविवेकाची माणसाच्या मनपटलावरती काजळी जमा झालेली आहे. ती काजळी सोडून मी तिथे विवेकाचा नंदादीप पेटवतो. त्यामुळे अखंड दिवाळीचा आनंद मिळतो,” असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तिथीप्रमाणे वर्षांतून पाच दिवस येणारी दिवाळी निश्चितच आनंद देणारी आहे. मात्र, तुकाराम महाराज म्हणतात, ज्या दिवशी साधू-संत आपल्या घरी येतील तोच दिवस दिवाळीचा दिवस समजावा. दिवाळी हा नुसता सण नाही, तर दीपोत्सव आहे. दीपोत्सव हा केवळ उत्सव नाही तर उत्सवांचे स्नेहसंमेलन आहे. वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज असे हे सहा उत्सव विभिन्न सांस्कृतिक विचारधारा घेऊन या उत्सवात संमिलीत झालेले आहेत.

वसुबारस या दिवशी आपण गाय आणि वासरू यांची पूजा करतो. त्यांना गोडाचा घास खाऊ घालून त्या गोधनाची केलेली कृतज्ञ पूर्वक पूजा. धनत्रयोदशीला तिन्ही सांजेला केल्या जाणाऱ्या धनाच्या पूजेचे खूप महत्त्व आहे. त्याच दिवशी एक कणकेचा दिवा तयार करून त्या दिव्याची ज्योत दक्षिण दिशेला केली जाते. दक्षिण दिशाही ‘यमाची दिशा' म्हणून संबोधले जाते. नरक चतुर्दशी हा मुख्य दिवाळीचा पहिला दिवस या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचे. या दिवसाच्या महत्त्वाकरिता एक पौराणिक कथा सांगितली जाते ती अशी की, श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदी शाळेतल्या १६ सहस्त्र कन्यांची मुक्तता केली.

दुष्टांचा नाश आणि मुक्तीचा आनंद हे या दिवसामागचा आनंद साजरा करण्याचे कारण आहे. अश्विन वद्य अमावस्येला संध्याकाळी घरोघरी, दुकानात, कार्यालयात स्त्रीधन, लक्ष्मी, हिशोबाच्या वह्या यांची पूजा केली जाते. या पूजनाबरोबरच त्याच दिवशी आरोग्य लक्ष्मी (केरसुणी) यांचीदेखील पूजा केली जाते. या दिवशी फटाके उडवण्याचा खरा आनंद लुटला जातो. पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त. या दिवशी अनेक नवे प्रकल्प सुरू केले जातात. कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज असे म्हणतात. बहीण-भावाच्या उत्कट प्रेमाचा हा दिवस. हा झाला उत्सवाचा भाग. खरा आनंद दिवाळी सणाचा लहान मुलांनी केलेले किल्ले, त्यावर चित्र मांडणे, जणुकाही त्यांच्यातला शिवमावळा जागा होण्याचे एक प्रतीक आहे. ही परंपरा अबाधित राहावी. या सणाला आता जागतिक स्वरूप येत चालले आहे.

जगभरातले भारतीय आपआपल्या शहरात दिवाळी साजरी करतात. अमेरिका येथे न्यू जर्सी भागात भारतासारखी दुकाने सजवली जातात. दिवाळी हा प्रामुख्याने हिंदू तसेच दक्षिण अशिया व आग्नेय आशियातील अन्यधर्मीय समाजामध्ये काही प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव. ‘बंपर ऑफर! दिवाळी सेल!' असे शब्द आपल्या कानी पडत असतात. दिवाळीत सगळ्यात जास्त आर्थिक उलाढाल होते. त्यामुळे हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यातही दिवाळी फराळाचा आनंद काही वेगळाच असतो. लाडू, चकली, चिवडा, करंजी हे पदार्थ सगळीकडेच केले जातात. आपल्याला आपल्या आजी किंवा पणजीच्या काळातले दिवाळीचे पदार्थ तितकेसे काही माहीत नाही. पण त्यातील काही मागे पडलेल्या पदार्थ म्हणजे चनापापडी, शेंगोळ्या, कडबोळी, बोरं, खापोऱ्या सांजोऱ्या इत्यादी. आधुनिक जगात सगळेच व्यस्त आहेत. त्यामुळे दिवाळीचा पराळ करण्यासाठीही महिलांना मुद्दाम वेळ काढावा लागतो. पण त्यातही बाजारात भाजणी विकतची, चिरोटा, अनारसा, फराळातला लाडू, करंजी आणि इतरही पारंपरिक दिवाळीचा फराळ साग्रसंगीत स्वरूपात बाजारात उपलब्ध आहे.

दिन दिन दिवाळी
गाई म्हशी ओवाळी
गाई म्हशी कोणाच्या
लक्ष्मणाच्या
लक्ष्मण कोणाचा?
आई बापाचा
देव माय खोबऱ्याने वाटी
वाघाच्या पाठीत हाणीन काठी

हे शब्द आठवले की, आपल्याला आजी-आजोबांच्या काळातील दिवाळी आठवते. काही आजी-आजोबांनी म्हणजे पूर्वीच्या पिढीने आताचे बदल अंगीकारले आहे, तर काही अजूनही त्याच काळामध्ये रमतात. पूर्वी घरात एकत्र कुटुंब पद्धती होती. काका, भाऊ, चुलत-भाऊ-बहीण असा मोठा परिवार होता. एकत्र मजेत दिवाळी साजरी करायचे. आता परिस्थितीत बदल होतोय. लोकांची वेळ महत्त्वाची झाली आहे. आपुलकीच्या भावनेने ओथंबलेले शुभेच्छांची जागा कोरड्या ‘एसएमएस'ने घेतली आहे. नात आता फोनवरती बोलत नाही, तर व्हॉट्‌सॲप मेसेज करते. पण आता ते या विश्वास रमलेले आहे हे बघून काही आजी-आजोबांनी हे स्वीकारलेले आहे. दिवाळी अंकाची जागा ही आता टीव्हीवरच्या कार्यक्रमाने घेतलेली आहे. आजकाल प्लास्टिकचे कंदील आणि रांगोळीचे स्टिकर लावले जातात. त्याचप्रमाणे अलीकडच्या काळात दिवाळीच्या आठवडाभर आधीपासून एकेक पदार्थ तयार करून कुटुंबीयासोबतच शेजारी, नातेवाईक व मित्रमंडळींना आग्रहाने देण्याची परंपरा इतिहास जमा होऊ लागली आहे. विभक्त कुटुंबांची तसेच पति-पत्नी दोघेही नोकरी करणाऱ्या कुटुंबांची संख्या वाढत चाललेने दिवाळीच्या फराळाच्या एकेक पदार्थासाठी स्वयंपाकघराचे युद्ध घर न करता, चटपट एक दोन पदार्थ घरी बनवून इतर फराळ रेडिमेड खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. मात्र विकतचा फराळ मोजकाच असल्याने पूर्वीसारखे मोठे डबे भरून ठेवता येत नाहीत. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून शेजारी, नातेवाईक व मित्रमंडळींना पारंपरिक फराळाऐवजी मिठाई देण्याचा पर्याय पुढे आला होता. परंतु हल्लीच्या कोलेस्टेराल आणि कॅलरीबाबत जागरूक जमान्यात तुपसाखरात घोळलेली मिठाई दिवाळी संपली तरी शीतकपाटात पडून राहण्याचे चित्र दिसत आहे. म्हणून मिठाईकडेही पाठ फिरवून लोक आता सुक्या मेव्याचा पर्याय अवलंबत आहेत. लवकर संपवण्याची सक्ती नसलेने, आरोग्यास उत्तम असलेने आणि अगदी पाव किलोच्या आकर्षक पॅकमध्ये ही मिश्र सुका मेवा उपलब्ध होत असलेने, सर्वसामान्यांनीही आपला मोर्चा तिकडे वळवला आहे. शेवटी काळापरत्वे बदलही स्वीकारणे हितवाह शेवटी म्हटलं जात ”कालाय तस्मेय नमः”. अस्तु.

दिवाळीमध्ये वनवासी समाजाने बनवलेले कंदील किंवा दिव्यांग व्यक्तिने बनवलेल्या वस्तू किंवा ग्रामीण भागातील गृहिणींनी बनवलेल्या वस्तूंची प्रदर्शनेही भरवली जातात. लोकांचा प्रतिसादही चांगला असतो. शाळेत मुलं किल्ला, पणत्या, भेटकार्ड बनवतात. तशा कार्यशाळाही असतात. काही उदासीनता वगैरे नाही आणि जर असतीलच तर ज्येष्ठ पिढीने दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करावे आणि वास्तवात जगत सकारात्मक विचार, संस्कार रुजविण्याचा प्रयत्न केला, तर ज्येष्ठ पिढीच्या मार्गदर्शनाने हजारो संस्काररुपी दिवे पेटू शकतील, असा विश्वास वाटतो आणि हीच खरी दिवाळी.

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे
आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश,
 मिळो सर्वांना प्रगतीच्या
पाऊलवाटेचा प्रकाश
 असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास
 -सौ. आरती धर्माधिकारी 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

दीपोत्सव आनंदाचा...