एक अनोखी साहसी समुद्रसफर

तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी क्रीडा पुरस्कार विजेता आणि राज्य सरकारचा शिवछत्रपती पुरस्कार विजेता सागरी जलतरणपटू शुभम धनंजय वनमाळी याच्या अनोख्या जलतरण समुद्र सफरीचे वर्णन...

सन २०१३ च्या उन्हाळी सुट्टीमध्ये आमचा गावी जाण्याचा कार्यक्रम ठरला. माझे गाव कासा, तालुका डहाणू. गावापासून जवळपास २५ किलोमीटर दूर समुद्रकिनारा. या गावी माझे आईवडील नोकरी निमित्त जवळपास ६० वर्षांपूर्वी स्थायिक झाले होते आणि मुळगाव तसे फार काही दूर नव्हते, याच तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेल्या वरोर येथे असल्यामुळे अथांग समुद्र आणि त्याच्याशी संबंधित गोष्टींबद्दल आपुलकी नकळतच आमच्या नसानसांत भिनलेली. शुभम आणि सिद्धी या दोघांच्या  हट्टापायी या सुट्टीमधील एक संध्याकाळ डहाणू येथील पारनाक्यासमोरील बीचवर घालवायचे ठरले. शुभम आणि सिद्धी हे दोघेही उत्तम जलतरणपटू, त्या दोघांनी राज्य पातळीवर आपले कर्तृत्व सिद्ध केलेलं. ठरल्याप्रमाणे एका सायंकाळी मी, शुभमची आई दिपिका, शुभम, सिद्धी आणि माझी आई पारनाका येथील पोंदा हायस्कूलच्या समोरील बीचवर पोहोचलो. शुभम आणि सिद्धीने पाण्यामध्ये खेळण्याचा हट्ट धरला आणि आम्हाला असंही बजावलं, आम्ही पाण्यामध्ये पोहणार नाही! फक्त खेळणार! आम्ही त्यांना नकार देऊ शकलो नाही. दोघेही त्या फेसाळणाऱ्या लाटांवर उड्या मारत स्वच्छंदपणे बागडत होते. आई वाळूवरती येरझाऱ्या घालत होती आणि दोघांवर मधूनमधून कटाक्ष टाकत होती. आम्ही दोघे  एका ठिकाणी वाळूवर बसून निसर्गाच्या विविध छटांचा आनंद लुटत होतो, या समुद्राची अथांगता आमच्या डोळ्यांमध्ये साठवून घेत होतो. काही वर्षांनंतर याच ठिकाणी शुभम एक अनोखा विक्रम आपल्या नावावर करणार आहे याची जाणीवही मनाला शिवली नव्हती.

शुभम आणि सिद्धी यांचा जलतरण तलावातील आपला सराव सुरू होता. शुभम लांब पल्ल्याच्या फ्री स्टाईल जलतरण प्रकारात आणि सिद्धी ब्रेस्ट स्ट्रोक या जलतरण प्रकारात विविध स्तरावर दोघेही पदके मिळवीत होते. परंतु का कुणास ठाऊक? शुभम हळूहळू सागरी जलतरणाकडे आकर्षित होत होता आणि एक दिवस मला इंग्लिश खाडी पोहायची आहे, असा धक्कादायक प्रस्ताव आमच्याकडे मांडला. त्याची लांब पल्ल्याच्या जलतरण क्रीडा प्रकारात रुची पाहता आम्ही सुद्धा त्यास सपोर्ट करण्याचे ठरवले. २०१४ ते २०१९ दरम्यान धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया, गेटवे ऑफ इंडिया ते धरमतर, इंग्लिश खाडी, जिब्राल्टरची सामुद्रधुनी, कॅटलीना खाडी, मॅनहॅटन मॅरेथॉन स्विम, परहेन्शियन आयलंड स्विम, राऊंड ट्रिप एंजल आयलंड स्विम, राजभवन ते गेटवे ऑफ इंडिया इत्यादी जलतरण मोहीमा नुसत्याच पार पाडल्या नाहीत तर विविध आशियाई आणि जागतिक विक्रमसुद्धा प्रस्थापित केले. त्याचबरोबर आयर्लंड येथील मानाच्या अशा १० किलोमीटरच्या दोन स्पर्धांमध्ये सुवर्णपदके पटकावली.

एवढ्या मोहीमा आणि विक्रम प्रस्थापित केल्यानंतर शुभम आपले नविन प्रशिक्षक सौ. रूपाली रेपाळे आणि श्री. अनिरुद्ध महाडिक यांच्याशी चर्चा करून काहीतरी नवीन मोहीम आखावी जी एकदम नाविन्यपूर्ण असेल असा प्रस्ताव माझ्यापुढे मांडला. शुभम रॉस एडग्लेच्या १७९६ मैल अंतराच्या अराऊंड ग्रेट ब्रिटन स्विममुळे खुपचं प्रभावित होता. अशा पद्धतीची मोहीम आखण्याचं धाडससुद्धा भारतामध्ये किंवा भारताबाहेर कोणा भारतीय जलतरणपटूने केलं नाही. काहीशी अशाच पद्धतीची मोहीम आखुन ती पूर्ण करण्याचा त्याचा मानस होता. त्यानुसार ४५० किलोमीटर अंतराचे गोवा ते मुंबई स्विम करण्याची आखणी करण्याचं सर्वानुमते ठरलं. नंतर यामध्ये भारतीय सागरी जलतरण विश्वातील एक प्रख्यात व्यक्ती श्री. सुबोध सुळे यांचा सल्ला घेण्याचं ठरवलं. मी, दिपिका, शुभम, रूपाली, अनिरुद्ध आणि सुबोध सर एकत्र बसून पुढील नियोजन आणि आखणी केली. नियोजन करताना एक मोठी समस्या होती ती म्हणजे विविध आस्थापनांच्या परवानग्या आणि त्याही दोन राज्यांच्या. त्यावर सुबोध सरांनी तोडगा सुचवला तो म्हणजे गेटवे ऑफ इंडिया ते डहाणू बीच अशी जलतरण मोहीम आखण्याचा. सर्वांसाठी हा मार्ग नवखा होता परंतु मार्ग कठीण असला तरी अशक्य नव्हता. ठरविल्याप्रमाणे आम्ही सर्व कामाला लागलो. रूपाली आणि अनिरुद्ध यांनी कुलाबा येथील नावाडी व मार्गदर्शक श्री. दिलीप कोळी यांच्याशी चर्चा करून तारीख ठरवली. त्यानुसार सुबोध सरांनी कार्यक्रम आखला.  दिपिका, रूपाली आणि अनिरुद्ध यांनी आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळवल्या. या मोहीमेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे भरतीच्या वेळी साधारणतः चार तास पोहणे आणि ओहोटीच्या वेळी आठ तास बोटीवर थांबणे. म्हणजेच दिवशी दोन सत्रांमध्ये आठ तास पोहणे. उर्वारित वेळी बोटीवर आराम करणे. हिच तर खरी परीक्षा होती. पाण्यावर हेलकावे घेत असलेल्या वीस फूट लांब आणि आठ फूट रुंद अशा छोट्याशा बोटीवर कसला आराम? याची कल्पना करूनच मला घाम फुटला. शुभमला आजवरच्या मोहीमांमधे एकाच दमात १२ ते १५ तास पोहण्याचा अनुभव होता; परंतु चार तास पोहून हेलकावे घेत असलेल्या बोटीवर आठ तास आराम त्यानंतर पुन्हा चार तास पोहणे असे सलग चार दिवस विविध संकटांना तोंड देत मोहीम फत्ते करणं म्हणजे एखाद्या जलतरणपटूची मानसिक आणि शारीरिक क्षमतेची खुप मोठी कसोटी होती. परंतु शुभमच्या आत्मविश्वासासमोर मी, सिद्धी आणि त्याची आई दिपिका आम्ही सर्वांनी गुडघे टेकले आणि तयारीला लागलो.

ठरल्याप्रमाणे १७ डिसेंबर रोजी ११ वाजून ११ मिनिटांनी शुभमच्या शरीरावर पेट्रोलियम जेली लावून थोडंसं स्ट्रेचिंग करून गेटवे ऑफ इंडिया येथून मोहीमेची सुरूवात झाली. मोहीमेची सुरूवात करण्यासाठी विविध संस्थांचे प्रतिनिधी, राज्य जलतरण असोसिएशनचे पदाधिकारी, आप्तेष्ट, नातेवाईक आणि मित्रमंडळी खुप मोठ्या संख्येने उपस्थित होती. बोटीवर राज्य जलतरण असोसिएशनने नेमलेले निरीक्षक श्री. दत्ता तरे यांच्यासह मी, दिपिका, रूपाली, अनिरुद्ध, सुबोध सर, दिलीप कोळी, त्यांचा मुलगा दक्ष आणि त्यांची टीम दोन वेगवेगळ्या बोटीवर विभागून शुभमला चिअर अप करीत होतो. यापैकी एक पायलट बोट होती, त्यामध्ये मी, दिपिका, रूपाली, अनिरुद्ध, सुबोध सर, दत्ता तरे, चालक दिलीप कोळी आणि विश्रांतीच्या वेळी शुभम असणार होतो. तसेच शुभमचं खाणं (ज्युस, चॉकलेट, फळं, एनर्जी ड्रिंक इत्यादी), फर्स्ट एड किट, शुभमचे आणि आमचे कपडे, आंघोळीसाठी पाणी, आइसबाथ साठी बर्फ, पाण्यामधून बोटीवर येण्यासाठी शिडी, आमच्यापुरतं बिछाना इत्यादी वस्तू पायलट बोटीवर असणार होत्या. दुसऱ्या बोटीवर दिलीप कोळींचा मुलगा दक्ष, स्वयंपाकी आणि त्यांचे चार सहकारी असा ताफा होता. ही बोट पुढे जाऊन  काही अडचणी आहेत का, याचा सुगावा घेण्यासाठी, स्वयंपाक बनवण्यासाठी वापरण्यात येणार होती. या बोटीवर एक तात्पुरत्या स्वरूपाचे शौचालयसुद्धा बांधण्यात आले होते. या दिवशीचे पहिले सत्र तीन तासांचे होते. या सत्रामध्ये नियोजित वेळापत्रकानुसार प्रवाहाच्या बदलामुळे कुलाब्याजवळील प्रॉन्ज रिफ लाईट हाऊसला वळसा घालून नरीमन पॉइंट नजिक समुद्रामधे किनाऱ्यापासून पाच किलोमीटर अंतरावर साधारणतः ८ किलोमीटर पोहल्यानंतर शुभमला थांबवून बोटीवर घेण्यात आले. त्याला आइसबाथ देण्यात आली. जेवण दिले आणि रूपालीने वामकुक्षी करण्यास सांगितले. दुसरे सत्र सायंकाळी ६.३० वाजता सुरू झाले. डिसेंबर चा महिना असल्यामुळे वातावरण थोडं फार थंड होतं. परंतु रात्रीच्या वेळेस वारे किनाऱ्यावरून समुद्राकडे वाहत असतात त्यामुळे भरतीच्या वेळेस वारा उलट दिशेने असल्यामुळे उंच उंच लाटा उसळत होत्या. शुभमने आपल्या ताकतीवर आणि प्रवाहाच्या मदतीने ४ तासांमध्ये २९ किलोमीटर अंतर पोहून पार केले होते. या सत्रामध्ये शुभम उंच उंच लाटावर आरुढ होऊन पोहत होता आणि आम्ही सर्व त्याला प्रोत्साहन देण्याबरोबरच मुंबईचे रात्रीचे विहंगम दृश्य समुद्रातून न्याहाळत होतो. आहाहा! काय नयनरम्य दृश्य होते ते! हा प्रवास नरिमन पॉईंट, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, राजभवन, वरळी सी फेस, वरळी सी लिंक, बांद्रा बँड स्टँड करत करत खारच्या जवळ समुद्रामध्ये संपला. रात्रीचे साडेदहा वाजले होते. शुभम पुन्हा आइसबाथ घेऊन, जेवण करून जवळपास रात्री बारा वाजता झोपी गेला. आम्हीसुद्धा पहूडलो. लाटांवर हेलकावे घेणाऱ्या बोटीवर झोपण्याची सवय नसल्यामुळे झोप कसली लागते. मी आणि दीपिका एवढ्या रात्रीच्या शुभम कसा पोहत असेल याची चर्चा करत खूप उशिरा झोपी गेलो.

१८ डिसेंबर (दुसरा दिवस)-सकाळी उठून शुभमने नाष्टा करून ७.३० वाजता पुढील ध्येयाकडे वाटचाल सुरू केली. सकाळी अथांग समुद्र शांत होता. वाराही पोहण्यासाठी पोषक होता. शुभम शांतपणे प्रत्येक स्ट्रोकचा विशिष्ठ लयीमधे चपक चपक असा आवाज करत पोहत होता. साडेअकरा वाजता चार तासांमध्ये २१.५ किलोमीटर अंतराची नोंद झाली. आम्ही  जवळपास भाईंदर नजिकच्या उत्तन जवळ पोहोचलो होतो. शुभमच या सत्रामधील स्विमिंग पुर्ण झाले होते. आइसबाथ, जेवण आणि सायंकाळच्या सत्रासाठी आराम. सायंकाळी साडेसात वाजता पुढील सत्र सुरू झाले. रात्रीचा काळाकुट्ट अंधार, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वारा सुटला होता त्यामुळे उसळणाऱ्या भयंकर लाटा यामध्ये फक्त हेलकावे खात असलेल्या दोन बोटीवरील मिणमिणत्या दिव्यांच्या प्रकाशाच्या सहाय्याने शुभमचं दोन्ही बोटींच्या मध्ये मार्गक्रमण चालू होते. अशामध्ये तिसऱ्या तासानंतर शुभमच्या किंचाळण्याचा जोरात आवाज झाला आम्हाला फक्त त्याच्या डोक्यावरील लाईट स्टिक दिसत होती आम्ही आवाज देऊन शुभमला बोटी जवळ बोलवण्याचा प्रयत्न करत होतो. लाटांच्या आवाजामुळे त्याला ऐकूही जात नव्हतं. एकदाचं त्याने हात दाखवून, ‘मी येतोय' असा सिग्नल दिला. बोटीजवळ आल्यानंतर कळले की, त्याच्या संपूर्ण शरीरावर असंख्य जेलीफिशने आक्रमण केले होते. परंतु ‘मी ठीक आहे,' असे म्हणत आपले स्वीम त्याने सुरूच ठेवले चार तास पूर्ण झाल्यानंतर त्याला बोटीवर घेण्यात आले. पहातो तर काय? संपूर्ण शरीरावर जेलीफिशने दंश केल्यामुळे व्रण उठले होते. एक जेलीफिश तर त्याच्या तोंडातसुद्धा गेला होता. शुभम माझ्या आणि अनिरुद्धच्या मदतीने कशीबशी आंघोळ करून तोंडामध्ये जेलीफिशने दंश केल्याची जखम असल्यामुळे फक्त मॅगी खाल्ली. मी सुबोध सरांच्या मदतीने संपूर्ण अंगावर चिंचेचे पाणी चोळलं त्यामुळे शुभमला थोडसं बरं वाटू लागलं. अंग पुसून झाल्यावर तो पुन्हा झोपी गेला. एका अचानक आलेल्या संकटाला सामोरे जावे लागणार होते. आम्ही आता अर्नाळा किल्ल्याच्या जवळ पोहचलो होतो. दिपिकाच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव होते. मी तिला इशाऱ्यानेच, ‘काळजी करू नकोस' असे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने तिचे काही समाधान झाले नसल्याचे चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. या कठीण परिस्थितीत शुभमने जवळपास २३.२ किलोमीटर अंतर पोहून पार केलं होतं.

१९ डिसेंबर - मला सकाळी ६ वाजता जाग आली. माझ्या बाजूला झोपलेला शुभम उठून बसला होता. तो सकाळच्या सत्राच्या स्विमबद्दल विचार करत बसला होता. मी तुझी तब्येत कशी आहे? अशी विचारणा केली. त्याने ‘थोडंसं अंग दुखतंय; पण काही हरकत नाही मी पुढे पोहणार आहे,' हे सर्व त्याच्या बाजूलाच झोपलेली दीपिका सर्व ऐकत होती. ती स्पष्टपणे म्हणाली, ‘आज शुभम पोहणार नाही' थोड्या वेळाने आम्ही सर्वजण एकत्र येऊन पुढील मार्गक्रमणाची रूपरेषा ठरवत होतो आणि शुभम त्याच्या आईला ‘काही काळजी करू नकोस' हे सांगण्याचा प्रयत्न करीत होता. मुलाच्या हट्टापुढे तिचा नाईलाज झाला. सकाळी नऊ वाजता शुभमने पाण्यामध्ये उडी घेऊन स्विमला सुरुवात केली. साहजिकच त्याचं अंग खूप दुखत होतं परंतु तो वेदना जाणवू देत नव्हता. समुद्र सकाळच्या सत्रामध्ये नेहमीप्रमाणे शांत होता. हे सत्र दुपारी एक वाजता केळवानजीक थांबवले. या सत्रामध्ये १८.२ किलोमीटर पोहण्याची नोंद झाली. आंघोळ करून थोडंसं जेवून घेतलं. जेवण कसलं! मॅगीच खाल्ली! कारण जेवण तोंडामध्ये घेताच येत नव्हतं. जेऊन शुभम त्याच्या मम्मीच्या बाजूला थोडासा पहूडला. जवळपास तीन तासांनी शुभमला जाग आली, त्यामुळे बाजूला झोपलेल्या दीपिकालासुद्धा जाग आली. ती ताडकन उठून बसली आणि ओरडली, ‘अरे शुभम तुला भरपूर ताप भरलाय!' मी सुद्धा हात लावून बघितलं, खरंच खूप ताप भरला होता. मी सर्वजणांना एकत्र बोलवून पुन्हा मीटिंग घेतला आणि संध्याकाळचे सत्र रद्द करण्याचे ठरवले. संपूर्ण सायंकाळच्या सत्रामध्ये आराम आणि प्रथमोपचार केल्यामुळे शुभमला तरतरी आली होती. हे सत्र रद्द झाल्यामुळे डहाणू बीचवर ठरल्याप्रमाणे पोहचू शकत नव्हतो आणि तसे कळवणे आम्हाला भाग होते. कारण सर्वजण आमची विचारपूस करत होते. रूपाली फेसबुक लाईव्हवर प्रत्येक घटनेचा लेखाजोखा व्हिडिओसकट मांडत होती. त्यामुळे सर्वांनाच कळले की, शुभमला जेलीफिश चावल्यामुळे ताप भरला आहे. मी कासा, वरोर, डहाणू येथील मित्रमंडळी, स्वयंसेवक आणि शासकीय आस्थापना यांना आम्ही एक दिवस उशिराने पोहोचत असल्याचे कळविले. त्यांच्या बोलण्यामधून संपूर्ण डहाणू आणि आजूबाजूच्या गावागावांमध्ये मोठमोठे बॅनर लावून शुभमचे स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज होते. तरीसुद्धा मला पाचशे ते हजार जनसमुदाय असणार अशी कल्पना होती.

२० डिसेंबर - शुभमचा ताप बऱ्यापैकी उतरला होता. अंगामध्ये थोडीशी कणकण होतीच. परंतु त्याने निग्रहाने थोडेफार का असेना पण स्विम करण्याबद्दल हट्ट धरला. आमच्याकडे जास्तीचं एक सत्र असल्यामुळे हे सत्र खूप हळुवारपणे घेण्याचे ठरले. रूपाली आणि अनिरुद्ध यांनी शुभमला तशा सूचना दिल्या. जवळपास सव्वा तासानंतर शुभमच्या पायाला सौम्य प्रमाणात एका जेलीफिशचा झटका लागला. त्यामुळे आम्ही शुभमला बोटीवर येण्याचे असे सुचवले. तोसुद्धा जास्त आढेवेढे न घेता बोटीवर आला. या सव्वा तासामध्ये तो फक्त चार किलोमीटरच पोहू शकला. २० डिसेंबर हा शुभमचा वाढदिवस असल्यामुळे  डहाणूला पोहचून खूप छान असा छोटेखानी कार्यक्रम करण्याचा आमचा मानस होता. परंतु जेलीफिषच्या आक्रमणामुळे या परिक्रमेची सांगता एक दिवस पुढे ढकलण्यात आली. मग काय अनिरुद्धने शवकल लढवून शुभमच्या खाऊच्या डब्यामध्ये असलेला प्लम केक काढला. सर्व बोट आपापल्या परीने आम्ही सजवली आणि शुभम बोटीवर आल्या आल्याच, ‘हॅपी बर्थडे टू यू डिअर शुभम!' असा पुकार केला. शुभमला असे स्वागत अनपेक्षित होते. तो आमची तयारी बघून चाट पडला. सायंकाळच्या सत्रात जास्तीत जास्त पोहण्याची तयारी शुभमने दाखवली. रात्रीचे सत्र थोडे उशिरा असल्यामुळे शुभम जेवून शांतपणे झोपी गेला आणि रात्री आठ वाजताच उठला. त्याला खूप बरं वाटत होतं. रात्री साडेदहा वाजता दुसरं सत्र सुरू झालं रात्रीचा अंगाला झोंबणारा वारा घोंगावत होता. नेहमीप्रमाणे लाटा उंच उंच उसळत होत्या. परंतु या सत्रामध्ये जास्तीत जास्त वेळ पाण्यात राहून आरामात पोहत जेवढे जमेल तेवढे अंतर कापण्याचा सल्ला स्विम डिरेक्टर श्री सुबोध सर यांनी दिला. त्याप्रमाणे शुभम हळूहळू पोहोत होता. बोटीवरील मंडळी त्याला चिअर अप करूत त्याचा उत्साह वाढवत होती. चौथ्या तासानंतर शुभमने प्रशिक्षक रूपाली आणि निरीक्षक दत्ता सर यांना मी अजून एक तास पोहू शकतो का? अशी विचारणा केली. शुभमचा उत्साह बघून त्याला कोणीही अडवले नाही. या पाच तासांमध्ये तो जवळपास २१.३ किलोमीटर पोहला होता. हे सत्र पहाटे साडेतीन वाजेपर्यंत सुरू होते. रात्रीच्या अंधारामुळे आम्ही कुठे पोहोचलो आहोत याचा अंदाज येत नव्हता. परंतु कुठेतरी वरोर वाढवण या माझ्या मूळ गावाजवळून आम्ही पुढे गेलो होतो. सकाळी मोहीमेची सांगता असल्यामुळे आम्ही लवकरच झोपी गेलो.
२१ डिसेंबर - सकाळी उठल्यावर आजूबाजूचा नजारा पाहून आम्ही सर्वजण थक्कच झालो. आमच्या दोन्ही बोटीला दहा-बारा बोटींचा घेराव होता. सर्वजण आमच्याकडे मुख्यतः शुभमकडे कुतूहलाने आणि कौतुकाने पहात होते. सर्वजण आमच्या बोटीचे आणि आमचे छायाचित्र काढत होते. त्यातील काही बोटीवरील मच्छिमार बांधव आमच्या बोटीवर येऊन शुभम बरोबर फोटो काढण्याची विनंती करीत होते. आम्ही आनंदाने त्यांना होकार दिला. आमचा आणि त्यांचा सर्वांचाच आनंद गगनात मावत नव्हता. कारण डहाणू तालुक्यातील एका भूमिपुत्राने केलेलं अचाट साहस पुर्णत्वास येत होते. त्या मच्छीमार बांधवांनी आपल्या बोटीवरील विविध प्रकारचे मासे आम्हाला भेटवस्तू म्हणून दिले. त्यांच्या आग्रहाला आम्ही कसे नकार देऊ शकत होतो?

पुढील शेवटचा टप्पा साधारणतः चार ते पाच किलोमीटरचा होता. आम्ही शुभमचे स्विम सकाळी साडेदहाच्या सुमारास चालू केले. आमच्या दोन्ही बोटीबरोबर त्या दहा-बारा बोटीतील काही बोटी आमच्याबरोबर पुढे पुढे सरकत होत्या. पाहतो तर काय अजून काही बोटी डहाणूकडून आमच्या दिशेने येत होत्या. त्या बोटींवरती संपूर्ण जल्लोषामध्ये आमच्या स्वागतासाठी जनसमुदाय येत होता. जवळपास दोन किलोमीटर अंतर असताना त्या बोटी आमच्याजवळ पोहोचल्या आणि त्यासुद्धा आमच्याबरोबर डहाणूच्या किनाऱ्याच्या दिशेने सरकू लागल्या. डहाणूच्या किनाऱ्यावर पहावे तिथे माणसेच माणसे दिसत होती. हळूहळू आम्ही एकदम किनाऱ्याजवळ आलो होतो. किनाऱ्यावर जमलेल्या जमसमुदायापैकी काही उत्साही शुभमचे चाहते धावतच कसलीही परवा न करता शुभमच्या दिशेने पळत होते. शुभम पाण्यामध्ये उठून उभा राहिल्या राहिल्या जनसमुदायाचा प्रचंड असा जल्लोष कानावर पडला. काही पत्रकार आणि पोलीसांच्या मते हा जनसमुदाय जवळपास आठ ते दहा हजाराचा असावा. शुभमच्या दिशेने झेपावलेले उत्साही चाहते आनंदाने नाचत होते. त्यातील काहींनी शुभमला आपल्या खांद्यावरच उचलून घेतले. आम्ही सांगण्याचा खूप प्रयत्न करत होतो की, त्याला हात लावू नका; कारण  जेलीफिशच्या दंशाच्या अंगावरील जखमा अजूनही ताज्या आहेत. परंतु ऐकण्याच्या मनःस्थितीत कोणीही नव्हते. तो क्षण आम्हा सर्वांना जगण्याचा होता, उत्साहाचा होता. कितीतरी वर्ष आम्ही नवी मुंबई ते डहाणू रस्ता अथवा रेल्वे अशा मार्गांनी केला होता. परंतु असे स्वप्नातही वाटले नव्हते की आम्ही बोटीने मुंबई ते डहाणू प्रवास अशा पद्धतीने करू. किनाऱ्यावर सर्वच ठिकाणी शुभमच्या नावाचे फलक झळकत होते. संपूर्ण किनाऱ्यावर शुभमच्या नावाचा जयघोष सुरू होता.  शुभमने एक नवा विक्रम प्रस्थापित केला होता. पंचक्रोशीतील विविध गावांमधील हजारो लोक शुभमच्या स्वागतासाठी हजर होते. सिद्धी आणि आई या दोघीही माझ्या इतर नातेवाईकांसोबत शुभमच्या स्वागतासाठी आल्या होत्या. मी आणि दिपिका एका कोपऱ्यात उभे राहून २०१३ च्या उन्हाळी सुट्टीतील डहाणू बीचवरील तो दिवस आठवत होतो. - धनंजय वनमाळी 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

डोळस झालेली न्यायदेवता