डोळस झालेली न्यायदेवता

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी न्यायदेवतेच्या मूर्तीच्या स्वरुपात केलेले बदल आणखीही काही संदेश देशात देऊ पहात आहेत. स्वराज्य निर्मिती आणि त्यानंतर पेशवे काळापासून न्यायासन हे सर्वोच्च आहे असं त्या त्या वेळचे राज्यकर्ते सांगत आले आणि त्यांचं आचरणही तसच होतं. पण गेली काही वर्षं मात्र ही न्यायसंस्था सत्ताधाऱ्यांच्या हातात गेली आहे असं विरोधक सातत्यानं म्हणत आहेत. पण वास्तवात मात्र तसं नाही हे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी स्वयंप्रेरणेतून केलेल्या बदलातून दाखवून दिलं आहे.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी न्यायदेवतेच्या मूर्तीच्या स्वरुपात नुकतेच काहीबदल केले आणि ती मूर्ती चर्चेला आली. खरंतर ती मूर्ती चर्चेत आली म्हणण्यापेक्षा बदल करणारी व्यक्ती चर्चेत आली म्हणणं योग्य ठरेल. समाजमाध्यमांमधून अनेक विचारवंतांनी त्याबाबत आपापली मतं व्यक्त केली. बदलाच्या बाजूनं काही मतं होती आणि काही अर्थात त्याच्या विरोधात.

लेडी ऑफ जस्टीस म्हणून न्यायदेवतेची मूर्ती ओळखली जाते. ह्या न्यायदेवतेचा उल्लेख इजिप्तमध्ये देवी माट ह्या नावानं आढळतो; तर ग्रीसची देवी थेमिस आणि डाईस हीही लेडी ऑफ जस्टीस म्हणून ओळखली जाते. जगभरातले कायदे ज्या मूळ रोमन लॉ वरुन तयार झाले त्या रोमन मान्यतेनुसार जस्टीशिया देवीला न्यायाचं प्रतीक मानलं जातं. (काही जण ह्या देवीला जस्टिटिया आणि जस्टिलिया असंही म्हणतात.) ह्याच जस्टीशियाशी साधर्म्य असलेली आपल्या न्यायदेवतेची मूर्ती होती.

ह्या न्यायदेवतेची प्रमुख तीन वैशिष्ठ्य म्हणजे हातात असलेली तराजू आणि दुसऱ्या हातात असलेली तलवार आणि अर्थात डोळ्यांवर असलेली काळी पट्टी. हा तराजू इजिपत्शियन संस्कृतीतून थेट आला आहे. तिथे न्यायाच्या संतुलनाचं प्रतीक म्हणून तो आजही वापरला जातो. दुसऱ्या हातातली तलवार हे शक्तीचं प्रतीक. न्याय दिल्यानंतर गुन्हेगाराला शिक्षा होणं हे अपरीहार्य आहे. न्यायदानातून दिला गेलेला निर्णय जर स्वीकारला जात नसेल, त्याची अंमलबजावणी होत नसेल तर बळाचा वापर अपरीहार्य आहे हे ती तलवार दर्शवते.

तिसरं प्रतीक म्हणजे अर्थातच मूर्तीच्या डोळ्यांवरील पट्टी. ती अर्थात समानतेचं प्रतीक म्हणून वापरली गेली. न्याय हा धर्म, जात, पंथ, सामाजिक आर्थिक स्थिती ह्याच्या पलीकडे जावून नैतिकतेच्या पातळीवर आणि समानता पाळून केवळ गुन्ह्याच्या स्वरूपावरून होईल ही ग्वाही ही पट्टी देत असे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी न्यायदेवतेच्या हातातील तराजू तसाच ठेऊन अन्य दोन प्रतिकं बदलली. न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी काढून टाकली आणि प्रथमच ही न्यायदेवता डोळस केली. त्याचबरोबर हातातली तलवार जावून त्याजागी संविधान ठेवण्यात आलं. मुळात असलेली लेडी ऑफ जस्टीसची मूर्ती ही भारतीय नाही. तिच्या अंगावरील ग्रीक झगा जावून ही न्यायदेवता नखशिखांत साडीत उभी राहिली. त्याचप्रमाणे तिच्या डोक्यावरील मुकूटही भारतीय बनावटीचा आहे. त्यामुळे आता ती रूपावरून पूर्णतः भारतीय झाली असं म्हणता येईल.

हे सगळे बदल बरंच काही सांगून तर जातातच; पण त्यामुळे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी त्यांच्या कृतीतून देशाला काही संदेशही दिले आहेत. गेल्या काही वर्षांपासून ब्रिटिशकालीन कायदे बदलण्यास प्रारंभ झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘भारतीय दंड संहिता जावून त्याजागी आता भारतीय न्याय संहिता आली आहे. भारतीय कायदे हे डोळ्यांवरील पट्टी काढल्यामुळे न्यायदेवता आता डोळस तर झाली आहेच पण ती आता डोळसपणे सर्वांकडे समान नजरेनं पहात आहे असा अर्थ सुचवण्यात आला आहे. त्याच बरोबर न्यायाची अम्मलबजावणी आता तलवारीच्या म्हणजे बळच्या वापरानं नाही तर तीही संविधानानुसारच होईल हे उघड आहे. लेडी ऑफ जस्टीसच्या रूपात झालेल्या बदलावर काही विचारवंतांनी आक्षेप घेत हे बदल कशासाठी, असा प्रश्न निर्माण केला आहे.

जस्टिशिया देवीचं मूळ चित्र काढलं तो चित्रकार राफाएल हा लिओनार्दो दा विंचीचा समकालीन. त्यानं काढलेल्या मूळ चित्रात जस्टिशिया देवीचे डोळे म्हणे आधीपासूनच उघडे आहेत. आता इतक्या वर्षांनी भारतीय सरन्यायाधीशानं ते उघडण्याचा तथाकथित अट्टाहास कशाला, असा प्रश्न काही विचारवंतांनी विचारला. न्यायसंस्थेच्या कामकाजात आजही काही लॅटिन संज्ञा वापरल्या जातात. हेबीयस कॉर्प्स, ॲमिकस क्युरे, सुओमोटो ह्या सगळ्या संज्ञा मूळ लॅटिन भाषेतल्या. त्या तशाच वापरात मग केवळ मूर्तीचं बाह्य रूप बदलण्याचा अट्टाहास कशासाठी असं त्या विचारवंतांचं म्हणणं आहे. खरंही आहे ते. पण आज जर मूर्तीचं विदेशी स्वरूप जावून देशी रूप आलं असेल तर ह्या शब्दांनाही पर्यायी शब्द येतीलही. मेयर हा शब्द अनेक वर्ष तसाच वापरात होता. कालांतरानं त्याला महापौर हा शब्द मराठीत दिला गेला. नोकरशाही हा शब्द न चिं केळकरांनी सुचवेपर्यंत ब्युरोक्रसी हाच शब्द केसरीतून लोकमान्य वापरत असत. त्यामुळे बदल हा होतोच आणि तो होण्यासाठी वेळही द्यावा लागतो. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केलेले हे बदल आणखीही काही संदेश देशात देऊ पहात आहेत. स्वराज्य निर्मिती आणि त्यानंतर पेशवे काळापासून न्यायासन हे सर्वोच्च आहे असं त्यात्यावेळचे राज्यकर्ते सांगत आले आणि त्यांचं आचरणही तसंच होतं. पण गेली काही वर्षं मात्र ही न्यायसंस्था सत्ताधाऱ्यांच्या हातात गेली आहे असं विरोधक सातत्यानं म्हणत आहेत. पण वास्तवात मात्र तसं नाही हे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी स्वयंप्रेरणेतून केलेल्या बदलातून दाखवून दिलं आहे.

आणखी एक सरन्यायाधीश सांगू पहात आहेत. संविधान बदलण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे असं विरोधक सातत्यानं सांगून जनमानसात एक अस्थिरता निर्माण करू पहात आहेत. पण न्यायदेवतेच्या हातातही संविधान दिल्यानं देशात संविधानच सर्वोच्च आहे असा संदेशही देशभर आपोआपच गेला आहे. वेळ येईल आणि गरज पडेल तेव्हा न्यायसंस्था स्वतःच्या अधिकारात काही बदल करेल, मग ते बदल बाह्य रूपातले असोत वा कायद्यातले असोत, हे ह्यातून स्पष्ट संकेत मिळतात. म्हणूनच गरज असेल तेव्हा हीच न्यायासंस्था पहाटेपर्यंत काम करून कठोर निर्णय घेते आणि हीच न्यायसंस्था प्रतीक असलेल्या मूर्तीत स्वदेशी बदलही घडवून आणते. - अमित पंडित 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल