ती आणि तिचे गुणधर्म...
करंजीच्या आतमध्ये जर सारण थोडं कमी भरलं तर ती खुडूखुडू वाजते. पण तेच जर जास्त भरलं तर ती हालतदेखील नाही. तसाच आपला गुणधर्म आहे. मनासारखं झालं की आपण खुश. जर मनासारखं नाही झालं तर इकडे हाय तिकडे हाय. तसंच घरातली स्त्री ही रजगुणाचादेखील तिच्या संसारात उत्तमरीत्या वापर करत असते. म्हणजेच प्रत्येक गोष्ट बचतीने करत असते. घरातील व्यवहार चिकाटीने करत असते. तिच्याकडे जर कधी पैसे मागितले तर नाहीत असे होत नाही. म्हणजेच तिची चिकाटी किती असते संसारात, ते बघा ! करंजीचंदेखील तेच आहे. जसं तिचे पीठ संपता संपत नाही. तसेच स्त्रीकडील लक्ष्मी ही कधीच संपत नसते.
मुळी देह त्रिगुणाचा सत्व रज तमाचा. मानवी देह बनतानाच तीन गुणांनी बनलेला आहे सत्व रज आणि तम. हे प्रत्येकामध्ये ठासून भरलेले असतात. कोणामध्ये रजोगुण जास्त असतो तर कोणामध्ये तमगुण. सत्वगुण हा फारसा पहायला मिळत नाही, पण तोदेखील प्रत्येकामध्ये ठासून भरलेला असतो. ते दाखवण्याची प्रत्येकाची वेगळी वेगळी असते.
संतांनी म्हटले आहे, आपला देह सत्व-रज-तम या गुणांनी भरलेला आहे. फक्त प्रत्येकजण तो गुण कसा वापरतो यावर अवलंबून असते. आता याचेच उदाहरण द्यायचे म्हणजे आत्ता येणारा सण म्हणजे दीपावली. या दीपावलीमध्ये प्रत्येकाची लगबग सुरू असते. प्रत्येकाची म्हणण्यापेक्षा तिची, म्हणजेच घरातल्या स्त्रीची लगबग सुरू असते, ती दिवाळीचे पदार्थ बनवण्याची. मग त्याच्यामध्ये विशेष पदार्थ आले म्हणजे लाडू, चकली आणि करंजी हे पदार्थ आलेच आले. हा! या प्रत्येक पदार्थाचा देखील एक गुण असतो. लाडू म्हणजे सत्वगुण, चकली म्हणजे तमोगुण तर करंजी म्हणजे रजोगुण. प्रत्येकाचे वेगवेगळे गुण पाहणे, ऐकणे, अनुभवणे यामध्ये वेगळीच मज्जा असते. ती मज्जा दिवाळी आली की पाहायला मिळते.
आई सांगते की नेहमी कोणताही पदार्थ बनवताना आधी गोडाने सुरुवात करायची. तेव्हा आम्ही आईला नेहमी प्रश्न विचारायची की आई गोडानेच का सुरुवात करायची? आई म्हणते, गोड पदार्थ म्हणजे सत्वगुण. आता सत्वगुणांमध्ये येथे ती पहिले साखर म्हणजेच माया, दूध म्हणजे आईचं प्रेम, तूप म्हणजे वासल्य. या सर्वांना एकत्र बांधून ठेवते ते म्हणजे ती आईची माया. मग यामध्ये जायफळ, सुंठ, सुकामेवा किंवा बरेच जिन्नस येतात. पण लाडू कोणत्याही प्रकारचा असो, बुंदीचा, बेसनचा किंवा रव्याचा. त्याचा गुणधर्म सर्वांना आनंद देणं, तोंड गोड करणं हाच असतो. तसेच घरातल्या स्त्रीचा देखील तोच उद्देश असतो की, घरातील प्रत्येक सदस्य असाच लाडूसारखा घट्ट नाते धरून असावा. सणासुदीला प्रत्येक जण आनंदी आणि एकत्र राहू म्हणून सर्वप्रथम ती जो पदार्थ बनवते तो असा बनवते की त्याना सर्व एकजुटीने बांधून ठेवते. म्हणूनच लाडवाचे उदाहरण हे उत्तमरीत्या सत्वगुणाला शोभून दिसते आणि तीच्या अंगी हा सत्वगुण भरभरून भरलेला असतो.
फराळामधील जो दुसरा पदार्थ येतो तो म्हणजे चकली म्हणजेच तमोगुण. तम म्हणजे सतत रागात असणे, तसेच प्रत्येक गोष्टीवर चिडणे. तर हा तमोगुण असतो चकलीमध्ये. कारण चकली ही थोडीशी तिखट, खुसखुशीत आणि काटेदार असते. तसेच आपल्याला आपल्या जीवनात समाजामध्ये वावरत असताना तमोगुणाचा देखील वापर करावा लागतो. सतत सत्वगुण वापरून चालत नाही. सत्वगुणाचा सतत वापर केला तर नक्कीच कोणीही आपला फायदा घेऊ शकतो. मग त्यासाठी थोडासा जसा आपण फोडणी देतो तसा आपल्यामध्ये रागदेखील असणे आवश्यक असते. कदाचित म्हणून दिवाळीच्या फराळामध्ये चकली हा सर्वांचा आवडता पदार्थ असतो. चकली ही खायला मज्जा येते, खुसखुशीत लागते आणि ती जशी स्वतःभोवती वेटोळे घालते तसंच तमोगुण म्हणजेच राग, द्वेष, मद, मत्सर हेदेखील आपल्या भोवती वाटोळे घालून बसलेले असतात. पण ती स्त्री कितीही राग आला, कितीही लोभ आला, तरी सर्वप्रथम विचार करते तो आपल्या कुटुंबाचा. म्हणून ती तमोगुणचा वापर मोजकाच करत असते. त्यामुळे का होईना कुटुंबामध्ये एकनिष्ठा असते आणि शांतता असते. त्यामुळेच चकली हे तम गुणासाठी उत्तम उदाहरण आहे. तिसरा पदार्थ आला तो म्हणजे करंजी. जी करताना प्रत्येक स्त्री शेवटीच ठेवत असते, कारण ती इतका तिचा रजोगुण दाखवत असते, की कितीही पीठ कमी मळलेले असेल तरी ते पीठ संपता संपत नसतं. तसंच आपल्या मनुष्याचं आहे. आपल्यात असणारा लोभ हा कधीच संपत नसतो. प्रत्येक गोष्ट हवीहवीशी असते. जी दुसऱ्याला मिळाली, ती मलादेखील पाहिजे असते. त्यासाठी त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे करंजी. जी फार ठराविक लोकांना आवडते. तिचं वरचं कवच थोडं खुसखुशीत असतं आणि आतलं सारण हे वेगवेगळ्या जिन्नसांनी बनलेलं असतं. करंजीच्या आतमध्ये जर सारण थोडं कमी भरलं तर ती खुडूखुडू वाजते. पण तेच जर जास्त भरलं तर ती हालतदेखील नाही. तसाच आपला गुणधर्म आहे. मनासारखं झालं की आपण खुश. जर मनासारखं नाही झालं तर इकडे हाय तिकडे हाय. तसंच घरातली स्त्री ही रजगुणाचा देखील तिच्या संसारात उत्तमरीत्या वापर करत असते. म्हणजेच प्रत्येक गोष्ट बचतीने करत असते. घरातील व्यवहार चिकाटीने करत असते. तिच्याकडे जर कधी पैसे मागितले तर नाहीत असे होत नाही. कुठून का होईना ती अचानक उद्भवलेल्या प्रसंगांमध्ये देते. म्हणजेच तिची चिकाटी किती असते संसारात, ते बघा ! तसंच करंजीचा देखील आहे जसं तिचे पीठ संपता संपत नाही. तसेच स्त्रीकडील लक्ष्मी ही कधीच संपत नसते. त्यासाठी करंजी हेदेखील उत्तम उदाहरण आहे रज गुणासाठी.
दिवाळी निमित्तमात्र, पण प्रत्येक स्त्रीमध्ये प्रत्येक मनुष्य देहामध्ये हे तीन गुण असतात. आपण जसा आहार करतो तसे आपण घडत असतो. जसे सत्वगुणी आहार करणाऱ्यांमध्ये सत्व गुणाची वाढ होते; तसेच रज आणि तम गुणी आहार करणारे तसेच बनतात. या गुणांचा वापर प्रत्येकजण कसा करतो त्यावर त्याचे कर्म असतात. खरंतर आपण म्हणतो दिवाळी, पण घरातील मोठी माणसं म्हणता दीपावली. दिवाळी या शब्दाचा अर्थ असा येतो की दिवाळं निघाले आणि दीपावली म्हणजे दिव्यांची सजावट. सगळीकडे दिवे लावणे आणि लख्ख प्रकाश करणे. तसेच घरातली ती स्त्री जेव्हा साज शृंगार करते तेव्हा घराला नवीन चैतन्य येते आणि घरातली स्त्री जेव्हा खुश असते तेव्हा अख्खं घर खुश असतं. त्यामुळेच ती जरी कधी आजारी पडलीच तरी सणासुदीला कंबर कसून उभी असते आणि अगदी आनंदाने पायातील पैंजणाचा छमछम करत, तसेच हातातील बांगड्यांचा आवाज करत, कपाळावरील टिकलीचा मंद प्रकाश संपूर्ण घराला तेजोमय करत असते, म्हणून तर म्हणतात स्त्री ही घरातील लक्ष्मी असते. जर लक्ष्मी खुश असेल तर अख्खं घर खुश असतं. त्यामुळेच ती आणि तिचे गुणधर्म जर उत्तम असतील, तर नक्कीच पुढील घडणारी पिढी ही उत्तमच असणार. जशी घरामध्ये ती तांदळातील खडे निवडून काढते तशीच ती कोणाच्यावर आलेला प्रसंग अलगद बाजूला काढत असते किंवा त्याला कठीण प्रसंगातून बाहेर काढत असते. घरातील साफसफाई करताना ती तम गुण वापरत असते. लहान मुलाला घास भरवत असताना सत्वगुण वापरत असते आणि त्याला चांगलं मार्गदर्शन करण्यासाठी रज गुण वापरत असते. म्हणून घरात ती आणि तिच्या गुणधर्माला महत्त्वाचे स्थान आहे आणि ते स्थान तिच्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. - सौ. निवेदिता सचिन बनकर-नेवसे