दिवाळी ! तेव्हाची नि आत्ताची..
आमच्या त्या काळी वसुबारसपासून दिवाळीची सुरुवात व्हायची व दुस-या दिवशी धनत्रयोदशी. पहाटे कडक थंडीत उठून उटणे वगैरे लावून पहिली आंघोळ म्हणजे अभ्यंग स्नान झाल्यावर नवे कपडे घालून फराळाचे खाऊन मिरवताना ‘लय भारी' वाटायचं. अगदी मज्जाच मज्जा! शाळेला नि अभ्यासाला सुट्टी असल्याने मुलं तर डबल खुश.
लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदा म्हणजेच बळीपाडवा. शेवटचा दिवस भाऊबीजेचा! ते चार दिवस म्हणजे जणु आनंदसोहळाच! ती दिवाळी आजही जश्शीच्या तशी आठवते नि मन भूतकाळात हरवून जातं.
‘दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा !' बालपणापासून कानावर पडलेलं हे वाक्य आजही मनाला तेवढाच आनंद देतं. पण खरं सांगू का? या आनंदापेक्षा कितीतरी जास्त आनंद देणारा सण पुढे येणार असतो. तो म्हणजे दिवाळी! दस-यानंतर पंधरा वीस दिवसानी दिवाळी येणार असली तरी त्याची तयारी, त्यासाठीची आर्थिक तरतूद आणि प्लॅन्स कितीतरी आधीपासूनच तयार असतात.
लहानपणी दिवाळी येणार म्हटल्यावर बच्चे कंपनीची सुरुवात व्हायची ती फुटक्या कपबशा शोधण्याची. कारण त्या कुटून त्यापासून रांगोळी बनवायची. बांबूच्या काठ्या जमवून आकाश कंदिलाचा सांगाडा तयार करुन ठेवायचा. पुरुष मंडळीची मांडव घालून आंगण तयार करण्याची घाई असे. घराची साफसफाई, रंगरंगोटी करतानाच फराळ नि इतर वाणसामानाची यादी, कपडेलत्ते अशा अनेक गोष्टींची चर्चा होऊन ‘बजेट' आखले जायचे. स्त्रियांना तर क्षणाची फुरसत नसायची. केवढी लगबग, केवढी धावपळ आणि ते सारे निभावून नेण्याची खात्री. हे सारे होता होता दहा पंधरा दिवस पटकन निघून जायचे. ‘फायनल डिसीजन' अर्थात महिलांचाच. काय करायचं, काय नाही याचा सर्वाधिकार त्यांचाच. मग सुरु व्हायची फराळाची तयारी. चकली, लाडू, चिवडा, करंजी, अनारसे यांच्या तळणाचा सुगंध आला की, ख-या अर्थाने दिवाळी आली म्हणायचं. एकिकडे मुलींची मेहंदी आणि रांगोळीची धावपळ तर दुसरीकडे मुलांची किल्ला आणि आकाशकंदील बनवण्याची धडपड. मागच्या वर्षी घासूनपुसून ठेवलेल्या पणत्यांत थोडी नवीन भर पडायची. फटाके खरेदी मात्र अगदी ‘इलेवन्थ अवरला' ! कारण आधी आणले तर दिवाळीत वाजवायला शिल्लक राहतील याची खात्री कोण देणार ?
वसुबारसपासून दिवाळीची सुरुवात. दुस-या दिवशी धनत्रयोदशी. पण खरी दिवाळी सुरु व्हायची ती पहाटे कडक थंडीत उठून उटणे वगैरे लावून पहिली आंघोळ म्हणजे अभ्यंग स्नान झालं की. नवे कपडे घालून फराळाचे खाऊन मिरवताना ‘लय भारी' वाटायचं. अगदी मज्जाच मज्जा! शाळेला नि अभ्यासाला सुट्टी असल्याने मुलं तर डबल खुश. त्यानंतर लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदा म्हणजेच बळीपाडवा. शेवटचा दिवस भाऊबीजेचा ! बहीण भावाचं नातं लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचं जिव्हाळ्याचं. ते चार दिवस म्हणजे जणु आनंदसोहळाच! ती दिवाळी आजही जश्शीच्या तशी आठवते नि मन भूतकाळात हरवून जातं.
दिवाळी फराळाबरोबर आणखी एक फराळ म्हणजे ‘साहित्यिक फराळ' ऊर्फ दिवाळी अंक ! अनेक नामवंत प्रकाशकांचे खास दिवाळी अंक निघायचे. कथा, कविता, कादंबरी, लेख... अगदी पाकशास्त्र, सौंदर्य शास्त्र, विज्ञान, सामाजिक, धार्मिक, विनोदी, आर्थिक पर्यटन, बाल साहित्य वगैरे विषयांवरील असायचे. भरगच्च आणि वाचनीय मजकूर, कमीतकमी जाहिराती आणि खिशाला परवडणा-या किमती असल्याने विकत घेतले जात नि जपून ठेवले जात. यामध्ये कथाश्री, अक्षर, माहेर, ललित, हंस, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, आवाज, किर्लोस्कर, मौज, मेनका, ललना, धनुर्धारी, बालवाडी, स्त्री, मोहिनी वगैरे... पुन्हा पुन्हा आस्वाद घ्यावा अशी साहित्यिक मेजवानीच जणू !
कालौघात अनेक गोष्टी बदलतात, पिढ्या बदलतात, आवडनिवड बदलते, आचारविचार बदलतात, सुधारणा होतात , राहणीमान बदलतं, उत्पन्नाचे मार्ग बदलतात, सण साजरे करण्याच्या कल्पना बदलतात, सामाजिक बदल होतात आणि या सर्व बदलांचा परिणाम अर्थातच कृतीतून जाणवतो. हाती चार पैसे आले की ते संपवण्याचे हजारो मार्ग समोर दिसतात. सधनता ही जशी उन्नतीकडे नेते तशी कधी कधी अधोगतीकडेही नेते. अशावेळी सारासार विवेक बुद्धीचा वापर केला तर त्याचा त्रास होत नाही. कधीतरी शांतपणे विचार केला तर भूतकाळ आणि वर्तमानकाळ यातील फरक लक्षात येतो.
आता या दिवाळीचंच घ्या ना. दिवाळी आली म्हणून खास कपडे खरेदी करावे असं होतच नाही. कारण रोजच काही ना काही कारणाने प्रचंड प्रमाणात कपडे खरेदी होते. आवश्यक असो वा नसो; पण खरेदी होतच असते. आर्थिक सुबत्ता असणा-यांना दागदागिने खरेदीसाठी मुहूर्त किंवा निमित्ताची जरुरी नसते. सहजसाध्य आणि ‘रेडिमेड' चा जमाना असल्याने हवं तेव्हा हवं ते मिळतं.. तेही घरात बसूनही. एकेकाळी दिवाळी फराळाचे पदार्थ हे केवळ दिवाळीत खायला मिळायचे. त्यामुळे त्याला निराळी चव असायची. आता तेच रोज मिळाल्याने त्याचं अप्रूप वाटत नाही. स्वतः मेहनत घेऊन केलेलं आणि रेडिमेड आणलेलं; यात कितीतरी फरक आहे...मग तो आकाशकंदील असो नाहीतर चकलीचे पाकीट असो! बाजारात जाऊन खरेदी करण्याची मजा ‘ऑनलाईन ' खरेदीत कधीच मिळणार नाही. हवं ते हवं तेव्हा नुसती फोनवरुन ऑर्डर दिली की, वस्तू दारात हजर. फटाक्यांचे प्रकार नि किमती पाहिल्या की, आश्चर्याने बोटं तोंडात जातात ती मागील पिढीतल्या लोकांची. अहो, किती ते प्रकार...अक्षरशः डोळ्याचे पाहणे फिटते. पण त्याचबरोबर कानाचा आजारही उद्भवतो. त्यात आता एक नवीनच प्रकार सुरू झालाय. स्पर्धा-चढाओढ दिवसेदिवस वाढतच चाललीय. दुसऱ्यापेक्षा माझ्याकडे काहीतरी वेगळं नि भारी आहे हे दाखवण्याचा अट्टाहास !
आजकाल बाजारात अनेक दिवाळी अंक येतात. त्यात लेखन असतं, पण जाहिराती एवढ्या असतात की, लेखन शोधावं लागतं. प्रसिद्ध साहित्यिक, लेखक, कवी यांचं लेखन वाचायला मिळणं म्हणजे परमभाग्य! पण नवोदित लेखक कवींची संख्या एवढी वाढली आहे की, त्यांचं साहित्य आणि जाहिरातींनी भरलेला गुळगुळीत आकर्षक मुखपृष्ठ असलेला दिवाळी अंक घेऊन कधी कधी भ्रमनिरास होतो. हॉलमधील टीपॉयवर चारपाच अंक ठेऊन आपण किती वाचकप्रेमी आहोत हे दाखवणारे ही काही कमी नाहीत. त्या अंकांमधून काही एकमेकांना चिकटलेली पाने पाहून ते अंक किती वाचले किंवा हाताळले गेलेत हे कळतं. किंमत हा विषय तर अगदीच नगण्य ! कारण पूर्वी अंकाची किंमत परवडत नसली तरी कुठेतरी काटकसर करुन घेतले जात आणि जपून ठेवले जात...पुन्हा पुन्हा वाचण्यासाठी. आता दर्जेदार लेखन नसलं आणि किंमत जास्त असली तरी अंक विकले जातात. पण लवकरच ते रद्दीत जातात. असो ! ‘कालाय तस्मै नमः'
या विषयावर एवढं अधिकारवाणीने लिहिण्याचं पहिलं कारण म्हणजे आज वयाची सत्तरी उलटल्याने अनुभव दांडगा आहे. दुसरं म्हणजे स्वतःच्या वडिलांनंतर मीसुद्धा वयाच्या साठी पर्यंत व्यवसाय केला असल्याने बदलती जीवनशैली आणि दुकानातील कालानुरूप केलेले बदल हे यामागचं कारण आहे. माझं दुकान ‘सिझनल ॲटम्स' साठी प्रसिद्ध होतं. त्यामुळे तेव्हाचा आणि आताचा फरक जाणवतो. तिसरं म्हणजे ‘पेपर एजन्सी' असल्याने अंक विकले तसेच वाचलेसुद्धा. त्यात होत गेलेले बदल लगेच लक्षात येतात.
तर अशी ही दिवाळी.... तेव्हाची नि आताची !
- विलास समेळ