विरळ होत चाललेले नातेसंबंध
दिवस उजाडतानाचा अगदी पाच मिनिटांचा फोन किंवा छानशा स्वरचित चार ओळी एखाद्या व्यक्तीचा तो हक्काचा दिवस आपण किती प्रसन्न करू शकतो किंवा त्याच्या दिवसाची सुरुवात किती आनंददायी करू शकतो नुसती कल्पना करा. पण आपण हे करत नाही. कैक वेळा आपला इगो आड येतो. त्याने/तिने कुठे केला होता मला फोन मग मी का करू? अरे पण हाच फरक आहे ना तुमच्यात आणि त्याच्यात! गोष्टी सोडून देणे हे शिकायला हवे; नाही त्या सोडायलाच हव्यात; तरच आपण आनंदी राहू शकू; आनंदी जीवन जगू शकू.
नातेवाईक आणि बदलते नातेसंबंध किंवा विरळ होत चाललेले नाते संबंध. तसं बघायला गेल तर बदल हा निसर्गाचा नियम आहे. बदल हा हवाच किंवा काही ठिकाणी तो आवश्यकच असतो. पण तो बदल सकारात्मक की नकारात्मक यावर तो अवलंबून असतो. अर्थातच नात्यांमधील बदल सकारात्मक असेल तर तो नवीन ऊर्जा देतो आणि ऋणानुबंधांच्या गाठी अधिक दृढ करण्यास मदत करतो.
आता व्यक्ती तितक्या प्रकृती हे तर आपल्या साऱ्यांना माहीतच आहे. पण जेव्हा आपले सख्खे रक्ताचे नातेवाईक सुद्धा तऱ्हेवाईक, विक्षिप्तपणे वागू लागतात तेव्हा मनाला खूप यातना होतात. बर ते मुळात असे होते का? तर नाही. मग हा बदल त्यांच्यात अचानक कसा काय झाला ? इतका कोरडेपणा पाठीला पाठ लावून आलेल्या भावंडात येतो तेव्हा खरच कळत नाही आपलं नक्की काय आणि कुठे चुकतय? मग अशावेळी आपल्याला मित्रमंडळी जवळची वाटू लागतात किंवा माझ्यापेक्षा त्याला अथवा तिला मित्रमंडळी इतर आते मामे चुलत नातेवाईक जास्त जवळचे वाटतात म्हणूनही ते एकमेकांपासून दुरावतात किंवा अंतर ठेवून वागायला लागतात. मला सांगा अशा वेळी गोष्टी बोलल्याशिवाय एकमेकांशी चर्चा केल्याशिवाय त्या सुटतील का? पण इथेही इगो आड येतो पहिलं कोण बोलणार ? पुढाकार कोण घेणार? ही झाली एक बाजू .
आता दुसरीकडे असही चित्र असत की खरच रक्ताच्या नात्यापेक्षा शेजारी,कामाच्या ठिकाणचे सहकारी, मित्रमंडळी यांच्याशी एक नवीन नातेसंबंध तयार होतात. आणि हा बंध निव्वळ नोकरी किंवा उपजीविकेसाठी घर, गाव सोडून बाहेर राहायला लागल्यावर तयार करावा लागतो किंवा आपल्या स्वभावाने वर्तनाने आपोआप निर्माण होतो. पण म्हणून आपण आपल्या नातेवाईकांना विसरतो किंवा विसरलोय त्यांच्यापासून लांब गेलोय असं होत नाही.
ह्याचबरोबर अजून एक असंही उदाहरण देता येईल आपण जेव्हा बाहेर आठ दहा पंधरा दिवसांच्या सहलीला जातो. तेव्हा सतत आठ पंधरा दिवस तीच मंडळी बरोबर असल्याने थोडाफार त्यांचा स्वभाव कळायला लागतो आणि त्यातीलच अगदी सगळ्यांचाच नाही..पण एखाद दोन जणांचा तो कळला, पटला, रुचला तर तिथेही एक बंध तयार होतोच की! अगदी आपला बालवाडी पासूनचा चड्डी बड्डी फ्रेंड असल्यासारखा एखाद्याशी अगदी घट्टं पक्कं नातं तयार होतं MRF टायर सारख किंवा LIC सारख जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी.
शेवटाकडे जाताना अजून एक मुद्दा आत्ताच्या जनरेशनचा घेऊया. ३५ वर्षांपूर्वी आम्ही दोघांनी एकच मूल ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मुलगा अथवा मुलगी जे काय होईल ते एकच ह्या निर्णयावर आम्ही ठाम राहिलो. पण म्हणून आमच्या मुलीचं तितकंसं कुठेच अडलं नाही किंवा तसा त्रासही झाला नाही. काका, मामा, मावशी, आत्या सर्व नाती बांधून ठेवली आहेत या माझ्या मुलीच्या पिढीनेही.
आता त्यांच्यात मायेचा ओलावा किती, रिस्पेक्ट किती हा कळीचा मुद्दा होईल कदाचित. कारण नाण्याला जशा दोन बाजू असतात ना तशा त्या इथेही दोन्हीकडून आहेतच. कारण आत्ताची जनरेशन प्रॅक्टिकल आहे. तंत्रज्ञानाला वाहून गेलीय, यांत्रिकीकरणामुळे कोरडी झालीय हे जरी खरे असले तरी यात आपणही म्हणजे आमची पिढी किंवा आमच्या आधीची पिढीही आहेच की.
याला अनुसरून एक छोटंसं उदाहरण देते. पूर्वी जेव्हा मोबाईल सोडा हो; टेलिफोनही नव्हते. तेव्हा वाढदिवस किंवा एसएससी बोर्डाची परीक्षा, लग्न किंवा बाळ जन्म यासाठी पत्ररूपाने किंवा (तारेने ) शुभेच्छा दिल्या जायच्या. त्यातील काही पत्रं इतकी बोलकी असायची किती व्यक्ती आपल्यासमोर बोलतीये असं वाटायचं. त्यानंतर आले टेलिफोन एसटीडी किंवा ट्रंककॉल करावे लागायचे त्यावेळी. आणि मग आले भ्रमणध्वनी.
इथेच यायला लागला नात्यातला कोरडेपणा. कारण कैकवेळा वाढदिवस, प्रमोशन, नवीन नोकरी लग्न, प्रेग्नेंसी, डिलिव्हरी यासाठीच्या अभिनंदनाचे छापील तयार मेसेज एकमेकांना फॉरवर्ड होऊ लागले. चार ओळी स्वतःच्या लिहिणे सोडा साधा फोन करून शुभेच्छा देणे, अभिनंदन करणे यात वेळ वाया जाऊ लागला. पण एक दिवस उजाडतानाचा अगदी पाच मिनिटांचा फोन किंवा छानशा स्वरचित चार ओळी एखाद्या व्यक्तीचा तो हक्काचा दिवस आपण किती प्रसन्न करू शकतो किंवा त्याच्या दिवसाची सुरुवात किती आनंददायी करू शकतो नुसती कल्पना करा हो. पण आपण हे करत नाही. कैक वेळा आपला इगो आड येतो. त्याने/तिने कुठे केला होता मला फोन मग मी का करू ? अरे पण हाच फरक आहे ना तुमच्यात आणि त्याच्यात! गोष्टी सोडून देणे हे शिकायला हवे नाही त्या सोडायलाच हव्यात; तरच आपण आनंदी राहू शकू; आनंदी जीवन जगू शकू.
असो! मंडळी या तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले हे १०० % खरे आहे. आपण मात्र एकमेकांपासून दूर गेलोय, जातोय. आजकाल लहान वयात मुलांच्या हातात पैसा खुळखतोय. अर्थात ते प्रचंड कष्टाने शिक्षण घेतात पदवी प्राप्त होऊन चांगल्या पदावर कार्यरत होतात. पटापट यशाच्या कमानी चढतात आणि मग गले लठ्ठ पगाराबरोबर अहंकार घमेंड मोठ्या पोस्टबरोबर मोठेपणा हा त्यांना त्यांच्याच माणसांपासून दूर नेतो. संत नामदेव महाराजांच्या दोन ओळी इथे किती चपखल बसतात बघा बर!
अहंकाराचा वारा न लागो राजसा
माझी या विष्णुदासा भाविकांसी
आणि म्हणूनच वेळ, स्वभाव आणि विश्वास या गोष्टी नाती टिकवण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. नवरा बायकोच्या नात्यात विश्वासाला अत्यंत महत्त्व आहे. आई-वडील आणि मुलांच्या नात्यात वागणुकीला स्वभावाला महत्त्व आहे. तर इतर नात्यांच्या बाबतीत त्या-त्या अनुषंगाने वेगवेगळ्या गोष्टींना महत्त्व आहे आणि म्हणूनच आत्ताच्या जमान्यात तंत्रज्ञानाला महत्त्व आहेच; फक्त त्याच्याबरोबर आपली नाती कशी टिकवायची त्यांची सांगड कशी घालायची ही एक कसोटीच आहे.
आणि म्हणूनच अगदी प्रत्येकाने आपल्या स्वतःपासूनच सुरुवात करून आपल्या स्वभावात आचार-विचारात वागण्या-बोलण्यात थोडा जरी बदल केला ना तरी सगळी नाती सुदृढ,सशक्त,नितळ होतील बरोबर ना ? सरते शेवटी ....... नात्यांची पॉलिसी सुरू ठेवण्यासाठी संवादाचे हप्ते अखंड भरावे लागतात. - सौ.नुपूर विश्वजीत अष्टपुत्रे