चला, सुखाच्या करंज्या, खुसखुशीत करू या!
सुखाच्या दिवाळीत समाधानाचे दिवे लावण्यासाठी घरात तेल नसेल तरी चालेल; मात्र चिकाटीच्या वाती हाताच्या निरांजनात प्रकाशित करून, अंधार भेदणारा काजवा बनता आले पाहिजे. नाही आपल्या नशिबी करंजी; मात्र सतरंजीवर बसून कांजी नसलेल्या, असलेल्या टोप्या घालून का असेना, एकच शंकरपाळे खूपदा चघळता आले पाहिजे, तरच तुम्हास दुःखाचे उमाळे वघळता येऊ शकतात.
आनंदाचे डोही आनंद तरंग निर्माण करण्यासाठी फार काय सुखाच्या तोरणमाळा दुकानात उपलब्ध नसतात. आनंद कदाचित विकत आणलेले फटाके देऊ शकत नसतील, मात्र तेच फटाके फुकटात, कोणी दुसरं फोडत असता आपण सुख म्हणजे नक्की काय असतं, ते टाळ्या वाजवून अनुभवू, उधळू शकतो, तो अत्यानंद प्राप्त करू शकतो. जीवनाच्या तव्यावर भाजणे म्हणजे चटके खाणे नव्हे, तर सजणे आणि उजळणेदेखील असते. कधी काळी आपल्या जीवनाच्या उन्ह सावलीच्या सूरपारंब्यात आपण घेतलेला झोका हा मोका देत, आनंदाचा बोलका मुकाही देवून जातो. आपण फक्त झोका घ्यावा, मग झोक्याच्या टप्प्यात कधी मधाचे मोहोळ हाती लागेल नाहीतर त्या पोळ्यातले मधही बोटाने ओठांना चाटायला मिळू शकते. उगाच रडू बाई रडू करत,कढत बसण्यापेक्षा उडत, फडफडत भरारी घेत उन्मेष रंग तरंग सर्वांगावर घेणे, सुगंधित उटणे लावण्यासारखे असते. काही तरंग कदाचित तुषार सिंचन सारखे अत्तराचा सुगंध बनून, पहिल्या पावसाचा मातीचा मृदगंध होऊ शकतात. सर्वच तुषार थेंबात काही आपणास इंद्रधनुष्य छटा नाही निर्माण करता येणार, पण जो तरंग असेल तो रंग निर्माण करणारा पांडुरंग असेल, मात्र जीवन बेरंग करणारा डोहातील भुजंग नसेल, हेही खरेच!
काही का असेना, कसे का असेना हेवा असावा, मात्र त्या हेव्यातील, मेव्यासाठी दावा नसावा. जेवढं सुखाचे गाठोडे मोठे, तेवढे त्या गाठोड्यास जास्तीचे सुईचे टाके अधिक टोचले असतील हे जाणले पाहिजे, अन् आपले चोचले ठरवले पाहिजेत. चिंचेचे पान आणि केळीचे पान यात सुखाच्या हिंदोळ्यावर झुलणारे कोणते पान असेल तर मला वाटते, ते चिंचेचे पान होय, कारण बिचारे इटकुले पिटकुले! ना केळीच्या पानासारखे वादळ वाऱ्यात टराटरा फाटने ना तुटणे, मात्र आयुष्यभर आनंद झरा धनाचा, मनाचा, कणाकणाचा होत राहणे, दाता आणि घेता या दोघांच्याही चेहऱ्यावर दिसावयास तृप्ती वसावी. सुख हे विमानात कमी आणि इमानात जास्त असते, म्हणून संत तुकोबा इमानाने वैकुंठास गेले असावेत, असे मला वाटतं. सुखाच्या दिवाळीत समाधानाचे दिवे लावण्यासाठी घरात तेल नसेल तरी चालेल; मात्र चिकाटीच्या वाती हाताच्या निरांजनात प्रकाशित करून, अंधार भेदणारा काजवा बनता आले पाहिजे. नाही आपल्या नशिबी करंजी; मात्र सतरंजीवर बसून कांजी नसलेल्या, असलेल्या टोप्या घालून का असेना, एकच शंकरपाळे खूपदा चघळता आले पाहिजे, तरच तुम्हास दुःखाचे उमाळे वघळता येऊ शकतात.
भुकेला भाकर फार गरजेची असते, नंतर लागते ते, साखर, नोकर, चाकर, जे कदाचीत भिकेला लावते. मनाचा आरसा, मानाचा असावा, वजनाने मणामणाचा नसला तरी भागते. भांगेत सौभाग्य कुंकू चिमटीने भरण्यास माय माऊली यांना तुटलेला, फुटलेला काचेचा तुकडाही चालतो,भले त्यात मुखडा नसेल दिसत. कवी कुळात म्हटलं जातं की, गरिबाच्या लग्नाला बायको गोरी काय अन् काळी काय? महागाई ने पिचलेल्याला दिवाळी काय अन् दसरा काय?
तुम्हाला जे वाटतं तेच मलाही वाटते, जिलेबीच्या दोन, तीन चकत्या खाल्यानंतर कुठे जिलेबीची चव कळते हो! खरा जिलेबी खाण्याचा आनंद पहिल्या दोन तीन वेढयात असतो, बाकी खाणे उदरं भरणं होऊन वेड्यागत रक्तातील साखर मोजणे अन् माजणे ठरते. दिवाळी साजरी करण्यास कपड्यांचा सोस हवा की दिवाळीत लक्ष्मी पूजनाला चोपड्यांचा घोस सजावा, हे आपणास आपलाच भटजी नाहीतर आपण शेटजी बनून लेखाजोखा सुखाचा मांडला आला पाहिजे, त्यात भाव सांडला न जाता, मांडला गेला पाहिजे. सुख खूप काही असते असे नाही, तोच तो शिरा असतो, जो वाटीतून तळहातावर ठेवला की प्रसाद बनतो, तेच नारळ असते जे आपण श्रीफळ म्हणून पुजतो, किंवा मोदकासाठी फोडतो नाहीतर तांबड्या पांढऱ्या, रश्श्यासाठी खोवतो, तेच भांडे असते कधी त्यास तांब्या तर कधी कलश म्हटलं जाते, तोच तांब्या, खेड्यात आंघोळ नंतर तळहाती घेतला तर गृहस्थ मंदिरात चालला असे ठरते आणि तोच तांब्या, बोटात पकडून जाणारा माणूस परसाकडे जाऊन आला हेही समजते. चला तर मग हवी तशी दिवाळी साजरी, गोजरी करू या,सख्या बहिणीचा मुऱ्हाळी झालो तरी कपाळी औक्षण आपोआप लागते, मात्र नात्यांचा गुंता, न विसरता विचरता आला पाहिजे मग दारावरील साधे तोरण आंब्यांच्या पानांचे देखील, आयुष्यातील अनेक आकाश कंदील झुलवत, फुलवत,डूलवत प्रकाशित करत राहते, ठेवते. - प्रा.रवींद्र ऊ.पाटील