रांगोळीचा किमयागार : गुणवंत मांजरेकर
सुप्रसिद्ध रांगोळीकार गुणवंत मांजरेकर (९१) यांचे बुधवार दिनांक २३ ऑक्टोबर २०२४ रोजी परळ येथील राहत्या घरी निधन झाले. रांगोळीचे किमयागार म्हणून ते रांगोळीकारांमध्ये गणले जात होते. मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेल्या ‘हरित मुंबई - सुंदर मुंबई' या प्रदर्शनाच्यावेळी त्यांची भेट झाली होती. तेव्हा त्यांच्या चिमटीतील रांगोळीची जादू मी अनुभवली होती.
गुणवंत मांजरेकर यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे झाला. अस्सल स्पष्टवक्ता मालवणी माणूस वरून कडक स्वभाव असलेला; पण आतून हळूवार मृदू असलेला हा रांगोळीचा कसलेला कलाकार. मांजरेकर यांच्या लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले. त्यांचे वडील बडोदा राजघराण्यात चित्रकार होते. बालपण अत्यंत गरिबीत गेलेल्या मांजरेकर यांनी कोळश्याची पूड आणि दारात येणाऱ्या समुद्राच्या वाळूने रांगोळी रेखाटण्यास प्रारंभ केला. चित्रांकित मोठ्या रांगोळी काढण्यात त्यांचा हातखंडा होता.
अकरावीनंतर ते मुंबईत आले आणि एचपीसीएल कंपनीमध्ये नोकरीला लागले. सणासुदीला विविध ठिकाणी ते रांगोळी काढत असत. त्यात दादरला कित्तेभंडारी हॉलमध्ये त्यांचे खास ‘रंगवली प्रदर्शन' भरत असे. यात पारंपरिक ठिपक्यांची रांगोळी त्यांनी चित्रात साकार करण्याची किमया साधली होती. ते पाहताना रसिक त्यात रंगून जात असतं. १९७४ मध्ये मांजरेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषकाला ३०० वर्ष झाले या निमित्त रायगड हाच विषय घ्ोऊन राज्याभिषेकाची भव्य रांगोळी साकारली होती. या राज्याभिषेकात छत्रपती शिवाजी महाराजांसह सुमारे ५२ व्यक्ती होत्या. त्याचे हावभाव, भरजरी कपडे, दागिने, राज दरबार असे सर्वच बारीक काम त्यांनी सुक्ष्मतेने चितारले होते. यातून रांगोळी काढतांनाचे त्यांचे कसब आणि झपाटलेपण प्रेक्षकांना जाणवले होते. तसेच त्यांनी परळला दामोदर हॉलमध्येही रायगड दर्शन रांगोळी प्रदर्शन भरवले होते.
महाराष्ट्रातच नव्हे; तर कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यत त्यांनी असंख्य रांगोळी प्रदर्शने भरविली होती. फक्रुद्दीन अली अहमद, इंदिरा गांधी, राजीव गांधी, फारुख अब्दुला, एन. टी. रामराव, यशवंतराव चव्हाण इत्यादी विभूतींनी त्यांच्या रांगोळीच्या प्रदर्शनांचे उद्घाटन केले होते.
शेकडो रंगवली प्रदर्शनांतून गुणवंत मांजरेकर यांनी राजकारण, समाजकारण, जागतिक संबध, क्रिकेट, भारतीय आणि परदेशी प्रसिद्ध व्यक्ती, छत्रपती शिवाजी महाराज इत्यादी विविध विषयांवर नयनरम्य लक्षवेधक रांगोळ्या काढल्या होत्या. वयाच्या ८० व्या वयापर्यंत ते रांगोळी काढत असत. त्यांच्या या रांगोळ्यांनी प्रदीर्घकाळ रसिकांना आनंद दिला. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी त्यांना रांगोळी सम्राट' ही पदवी दिली होती. रांगोळी कला जतन व्हावी म्हणून त्यांनी जणू काही रांगोळीचे विद्यापीठ या नात्याने असंख्य विद्यार्थ्यांना रांगोळीचे विनामूल्य मार्गदर्शन केले. मालवणी भाषेतील पहिला १०० कलाकारांना घेऊन केलेला ‘रोम्बाट' हा रंगमंचीय आविष्कार गुणवन्त मांजरेकर यांनी सादर केला होता. तोही बराच गाजला होता. - शिवाजी गावडे