”पायोजी मैने राम रतन धन पायो”

या जगात भगवंताहून अधिक मौल्यवान काहीच नाही. भगवंत म्हणजेच आपले आत्मस्वरूप हेच आपले सर्वोच्च प्राप्तव्य आहेत. अशी अमूल्य वस्तू ठेवायला तशाच सामर्थ्यवान अंतःकरणाची व्यवस्था करायला हवी.

मना कल्पना कल्पिता कल्पकोटी।
नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी।
मनी कामना राम नाही जयाला।
अती आदरे प्रीती नाही तयाला । श्रीराम ५९।

मनात कल्पनेचा अंशही राहू नये, कारण कल्पनेतूनच इच्छा, वासना, कामना निर्माण होतात. त्या आपल्याला जन्म-मरणाच्या बंधनात टाकतात. स्वरूपाकार होऊन मुक्त होण्यापासून दूर ठेवतात. मनात अखंडपणे वृत्ती, विचारतरंग उठत असतात. जेव्हा विशिष्ट ध्येय समोर नसते, जेव्हा एकाग्र होण्यासाठी काही ‘लक्ष्य' नसते, तेव्हा मनात अक्षरशः कोट्यावधी कल्पना जन्म घेत असतात. ह्या कल्पना किंवा हे विचार जर दृश्य जगातील असतील तर मनुष्याला रामाची भेट कदापि होणार नाही. कारण राम भेटायला हवा असेल तर आधी त्याचा अखंड ध्यास लागायला हवा.सतत त्याचे विचार मनात येऊन त्याच्या भेटीची तळमळ लागायला हवी.

करुणाष्टकात श्रीसमर्थ म्हणतात...
”अचपळ मन माझे नावरे आवरिता,
तुजविण सीण होतो धाव रे धाव आता”.
”जळधरकण आशा लागली चातकासी,
हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी।
तुजविण मज तैसे जाहले देवराया,
 विलग विषमकाळी तूटली सर्व माया।
सकळजन सखा तू स्वामी आणिक नाही,
 विषय वमन जैसे त्यागिले सर्व काही”

हे मन विषयांमधे अविरत धावते आहे. त्या ऐवजी मनाला भगवंताची गोडी लावली तर ते त्या कल्पनेत रमेलही. मात्र केवळ कल्पना किंवा मनोराज्ये करून राम भेटत नाही. त्यासाठी भक्ती, निष्ठा, साधना यांची जोड लागते. भक्ती म्हणजे अपार, निष्काम, निरपेक्ष प्रेम. अव्यभिचारी भक्तीतून येते ती निष्ठा. ”केवळ भगवंतच माझा आहे आणि मी केवळ भगवंताचा आहे,” ही निस्सीम भावना म्हणजे निष्ठा. कोणतीही परिस्थिती विना तक्रार, भगवंताची इच्छा मानून स्वीकारणे, त्याच्यावरील श्रध्दा-प्रेम कणभरही न ढळता स्थिर राहणे आणि कोणत्याही परिस्थितीत त्याच्याशिवाय इतर कोणाचाही आश्रय न घेणे यालाच निष्ठा म्हणतात. चातक पक्षी आपली तहान भागवण्यासाठी जसा फक्त पावसाची वाट पाहतो, पाण्याच्या एका थेंबासाठी तो सर्व उपाय सोडून फक्त आणि फक्त पावसाचे ध्यान करतो त्या निष्ठेने भगवंत-भेटीची वाट पाहावी लागते. हे तेव्हाच शक्य होते जेव्हा आपल्या मनात भगवंताचे प्रेम जागृत होते. प्रेमाशिवाय निष्ठा नाही, निष्ठेशिवाय साधना नाही अन्‌ साधनेशिवाय भगवंताची भेट नाही. म्हणुनच दृश्य जगाचा म्हणजेच मायेचा सर्वथा त्याग करुन जे सत्य आहे त्या भगवंताचा एकच ध्यास लावून घ्यावा. शंका-कुशंका यादेखील कल्पनाच आहेत. भगवंताच्या सत्यतेबद्दल, सामर्थ्याबद्दल किंचितही शंका मनात असू नये. मनोराज्यात रमणारा माणूस प्रत्यक्ष आचरणापासून दूर राहतो आणि प्रत्यक्ष प्रयत्नांशिवाय प्रगती होत नाही.

स्वामी वरदानंद भारती म्हणतात, ”शास्त्रनिष्ठा न सोडता माणसाने आपल्या प्रकृतीप्रमाणे व आवडीप्रमाणे साधना स्वीकारावी. मात्र साधना सात्विक हवी. निष्काम हवी. अन्यथा साधनेने कदाचित सिध्दी मिळतील, कामनापूर्ती होईल, पण अध्यात्मिक लाभ काही होणार नाही. अर्थात ‘रामभेट' काही होणार नाही. कारण सकाम साधनेत आपले प्रेम आपल्या स्वार्थावर असते. भगवंतावर नसते. प्रेम आणि स्वार्थ या दोन भावना उजेड आणि अंधाराइतक्या परस्पर विरुद्ध आहेत. जे अंतःकरण स्वार्थाने, कामनांनी बरबटलेले असते ते ईश्वर भेटीला पात्र नसते.” जोपर्यंत भगवंताबद्दल सादर, सप्रेम कामना मनात स्थिर होत नाही तोपर्यंत त्याची भेट होत नाही. स्वार्थी कल्पना सोडून शुद्ध कल्पना-भगवंताची कल्पना मनात धारण करावी. जगातील विषयांच्या, काम-क्रोध इ. षड्रिपूंना बल देणाऱ्या, अशुद्ध कल्पना मनातून अगदी हद्दपार करून टाकाव्यात. पुन्हा पुन्हा तिथेच धावणाऱ्या वृत्तींना धरून-पकडून भगवंताच्या खुंट्याला बांधून टाकावे. हीच साधना आहे. स्वतःच्या विचारांमध्ये प्रयत्नपूर्वक बदल करून अंतःकरण रामभेटीसाठी पात्र करून घेणे हीच तपश्चर्या आहे.

जगाच्या व्यवहारात मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी मजबूत तिजोरीची व्यवस्था केली जाते. या जगात भगवंताहून अधिक मौल्यवान काहीच नाही. भगवंत म्हणजेच आपले आत्मस्वरूप हेच आपले सर्वोच्च ‘प्राप्तव्य' आहेत. अशी अमूल्य वस्तू ठेवायला तशाच सामर्थ्यवान अंतःकरणाची व्यवस्था करायला हवी. त्यासाठीच समर्थ मनाला बोध करत आहेत. ”आपुलेन अनुभवे। कल्पनेस मोडावे। मग सुकाळी पडावे। अनुभवाचे दा.बो. ७-३-४२”. ”मी देह आहे” ही कल्पना साफ मोडून टाकावी. कारण हीच कल्पना इतर अनंत कल्पनांचे मूळ आहे. या मूळावरच घाव घालायला हवा. देहबुध्दी नष्ट झाल्यावरच ब्रह्मस्वरुपाचा अनुभव येईल. हा अनुभव हीच ”रामभेट”.
जय जय रघुवीर समर्थ
-सौ. आसावरी भोईर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

रांगोळीचा किमयागार : गुणवंत मांजरेकर