आईची वेडी माया

‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी' म्हणजे काय तर तो कितीही श्रीमंत असला किंवा राजा जरी असला आणि त्याला जर आई नसेल किंवा आईचे प्रेम मिळाले नसेल तर तो चक्क भिकारी आहे. एवढे मोल ह्या आईच्या प्रेमात आहे.

आईच्या प्रेमाला तोड नाही हे जगजाहीरच आहे. हे वेळोवेळी सिद्ध सुद्धा झालेले आहे. प्रत्येक आईला आपले मुल हे जीव की प्राण असतं. आई ही प्रेमापोटी आपल्या अपत्यासाठी कुठला पण त्याग करण्यासाठी सदैव तयार असते. मग ती कुठल्याही वयात का असेना, किती गरीब किंवा श्रीमंत असेना! आईच्या प्रेमाला कुठलीही सीमा नसते. सर्वात निःस्वार्थ प्रेम जर असेल तर ते आईचेच असते. तिथे कुठलाही स्वार्थ नसतो. ती कुठलाही नफा किंवा तोटा बघत नाही. तिला फक्त आपल्या मुलावर प्रेम करणे हेच माहित असते. आईचा त्याग हा या विश्वात सर्वात मोठा त्याग आहे. त्याला कुठलीही तोडच नाही. खरं प्रेम कोणतं असतं, ते कसं असतं ते आईचंंच असतं. प्रेम कसं करावं हे शिकायचं असेल तर ते आईकडूनच शिकले पाहिजे. आई ही प्रेम कसे करावे ह्याची जिती जागती कार्यशाळा आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हिरकणीची गोष्ट सर्वाना माहीतच आहे. त्या काळी सगळीकडे गडकिल्ले आणि परकोट होते. सुरक्षेच्या दृष्टीने संध्याकाळी गडकिल्ले आणि परकोटाची दरवाजे बंद केले जायचे. जो काही नागरिकांना व्यवहार करावयाचा असे तो दिवसभरात करावयाचा असे. संध्याकाळी सर्व दरवाजे बंद व्हायचे आणि त्यानंतर कोणालाही गडकिल्यात आणि परकोटात दिवस निघेपर्यंत प्रवेश मिळत नसे. त्या व्यक्तीला ताटकळत बाहेरच सकाळ होइपर्यंत वाट बघावी लागे. असे कडक नियम जनतेच्या सुरक्षेसाठी असत. एके दिवशी एक गवळण रायगडाच्या खाली काही अंतरावर असलेले वाकुसरे (वाळूसरे) या गावात राहत होती. दुध विकण्यासाठी ती रायगड किल्ल्यावर सकाळी गेली. तिला लहान बाळ होते. त्या बाळाला तिने पाळण्यात टाकले आणि दुध विकायला निघून गेली. परंतु ह्या गवळणीला दुध विकायला वेळ झाला. खूप संध्याकाळ झाली आणि परत पोहचेपर्यंत किल्ल्याचे दरवाजे बंद झाले होते. ती गवळण द्वारपालाला विनवण्या करू लागली की द्वार उघडा माझे लहान बाळ घरी एकटेच आहे. परंतु द्वारपाल आदेशाने बांधला गेला होता. त्याला सक्त ताकीद देण्यात आली होती की, संध्याकाळी अंधार पडल्यावर काहीही झाले तरी किल्याचे द्वार उघडायचे नाही. एव्हढ्या गवळणीने विनंती करून सुद्धा द्वारपालाने द्वार उघडले नाही. शेवटी ती विनवण्या करून कंटाळली. तिच्या डोक्यात एकच चक्र चालू होते की, माझे बाळ रात्रभर कसे राहील ? ते उपाशी राहील, त्याला भुक लागली असेल. माझी आठवण म्हणुन ते रडत राहील. ह्या गवळणीला सतत आपल्या बाळाचीच चिंता लागून राहिलेली होती.

शेवटी ही आई होती आणि आपल्या बाळासाठी काहीपण करण्याचा जो गुणधर्म आहे तो तिच्यात होता. ती हिम्मतवाली होती. तिने हिम्मत केली आणि शेवटी ४४०० फुट उंची असलेला गड ती काळ्याकुट्ट अंधारामध्ये दऱ्या, दाट झाडे-झुडपे असूनही उतरली आणि आपल्या बाळाजवळ पोहचली. गडकिल्ले चढणे आणि उतरणे म्हणजे एव्हढे सोपे नव्हते. रात्रीची वेळ, अंधार, कितीतरी खडतर प्रवास, दगड, धोंडे, मोठे मोठे खडक, झाड झुडूपं, जंगलाने व्यापलेले, साप, विंचू काटे आणि इतर हिंस्त्र प्राण्याची भीती सुद्धा होती. ह्या सर्व अडथळ्यांची पर्वा न करता स्वतःचा जीव धोक्यात टाकून ही गवळण आपल्या बाळाजवळ सुरक्षित पोहचली. कशासाठी? तर एकमेव उद्देश तो म्हणजे  बाळासाठी. एव्हढा मोठा पराक्रम ह्या आईने आपल्या बाळासाठी केला. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना ही बातमी कळली तेव्हा महाराजांनी ह्या हिरकणीचे कौतुक केले. ज्या बुरुजावरून ती चढली होती त्या बुरुजाला तिचे नाव सुद्धा दिले तसेच तिचा साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला.

अशा अनेक हिरकणी जगात आहेत. त्या अहोरात्र आपल्या बाळांसाठी राबत असतात, कष्ट घेत असतात, काळजी घेत असतात व निर्स्वार्थपणे प्रेम करत असतात. हे झाले इतिहासातील उदाहरण. हे सगळं आठवण्याचं कारण की, माझ्या सोबत घडलेली घटना. माझे वय ६१ वर्ष. माझ्या आईचे वय असेल ८२ वर्ष. मी घरीच प्लॅस्टिकच्या खुर्चीवर बसलो होतो. बाजुला आई उभी होती. अचानक ती प्लॅस्टिकची खुर्ची तुटली आणि मी पडलो व त्याच प्लॅस्टिकच्या खुर्चीत फसलो. मला उठता येईना. मला बाजुला धरायला सुद्धा काही नव्हते. आई एकदम घाबरली. आता माझे वजन ९० किलो. आईचे वजन फक्त ३० किलो. एव्हढे असुन सुद्धा ती मला उचलत होती आणि मोठमोठ्याने घरात आवाज देत होती. मग दोघी आल्या आणि त्यांनी मला आधार दिला व मी उठलो. पण त्या वेळची आईची तळमळ कासाविसता बघून मी खुपच प्रभावित झालो की एक आई आपल्या मुलाकरिता किती जीव लावते. तिने माझे लगेच कान फुंकले. मागे डोक्याला हात लावला. बेंड आले का ते बघितले. लगेच गळ्यात पडली. पाणी आणले. डोक्यावरून सतत हात फिरवीत होती. मी तिला विश्वास देत होतो की बाई मला काही झाले नाही. परंतु ती काही ऐकायला तयार नव्हती. दवाखान्यात जा म्हणू लागली. आराम करा, डोक्याला बाम, अमृतांजन लावा वगैरे वगैरे. मी लहान मुलासाठी ही धावपळ समजू शकतो. परंतु एका ६१ वर्षाच्या पुरुषासाठी ( मुलासाठी ) सुद्धा तेच प्रेम, तिच माया, तोच जिव्हाळा तेच वात्सल्य. दिवसभर मला कुठेही जाऊ दिले नाही. मी झोपल्यावर ती खोलीत परत आली. माझ्या अंगावर टाकले. मच्छरदाणी चारही बाजूने खोचलेली अगोदरच होती; परंतु तिने परत नीट लावलेली आहे की नाही ही खात्री करून परत चारही बाजूने खोचली. रात्रभर चकरा मारत होती आणि मला बघत होती. बिचारी माउली माझ्यासाठी ती रात्रभर झोपली नाही. माझ्याच काळजीत होती.

कुठून येत हे सर्व ममत्व ? काय जादू आहे न आईच्या प्रेमात.ते खरंच म्हटले आहे की, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ह्या उक्तीची मला आठवण झाली. मी हे सर्वांना सांगत होतो तर त्यांनासुद्धा आश्चर्य वाटत होते व म्हणत होते की, तुम्ही खरोखर भाग्यवान आहात. तुम्हाला आईचे प्रेम मिळते. खरोखर मला सर्वात भाग्यवान व श्रीमंत असल्याचे वाटले. हे असे आईचे प्रेम सर्वांना मिळो अशी मी मनोकामना व्यक्त करतो व ह्या कृत्रिमरुपी स्वार्थी जगात खरा ममत्वाचा झरा कायमरूपी वाहत राहो. सर्वांचे मंगल हो. धन्य ती आई आणि तिचे वात्सल्य. - अरविंद मोरे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 ‘हृदयी राजा' मध्ये अंतरीचे बोल