अनेक नेते, अनेक पक्ष, कोणाला मिळेल मोक्ष?
महाराष्ट्रात विधानसभेचे बिगुल वाजले आहे. एकीकडे सणांची राणी दिवाळी जवळ आल्याने लोक खुशीत आहेत, तर दुसरीकडे निवडणूकीच्या तारखा जाहिर झाल्याने इच्छुक उमेदवार तिकिटासाठी आतूर आहेत. पक्षाचे नेतृत्व अनेकांना तयारीला लागा असे सांगत ऐनवेळी तिसऱ्याच नावाची घोषणा होते, तयारी करणारे उमेदवार हवालदिल होतात व नाइलाजाने पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करतात. बहुतेक वेळा अपप्रचारच जास्त केला जातो.
नुकत्याच काही राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या, आता निवडणुक आयोगाने काही राज्याच्या निवडणुका जाहिर केल्या आहेत, त्याचबरोबर लोकसभेच्या व विधानसभेच्या काही रिवत जागांवर पोट निवडणुकाही जाहिर केल्या आहेत. त्यानुसार पक्षांची व नेत्यांची आपापल्या परीने, मोर्चेबांधणी सुरुआहे.
मागील काही दिवसात भारतीय जनता पक्षांने सत्ता स्थापनेसाठी विविध पक्षात फूट पाडून वा काही नेत्यांना आपलेसे करुन काही राज्यात सत्तापालट केली व तेथे भाजपामिश्रीत सरकारे स्थापन करुन आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आज देशातच नव्हे तर जगातला सर्वात मोठा पक्ष, भाजपा ठरला आहे. भाजपाचा इतिहास पाहिला तर मोठा रंजक आहे.
देशात १९७५ साली, तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ‘इमरजेंसी' जाहिर केली होती. अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्यात आले. सरकार विरोधकांवर विविध प्रकारची बंधने लादण्यात आली. तेव्हा तत्कालीन लोक नेते ‘जयप्रकाश नारायण' यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांना आवाहन केले की, ‘तुम्ही सगळे आपापले छोटे-मोठे पक्ष, आपापल्या पक्षांची नावे विसरुन जा, आणि सर्वजण मिळून एकाच पक्षात राहून, सरकारचा सामना करा' त्यानुसार सर्व घटक पक्षांनी मिळून ‘जनता पक्षाची' स्थापना केली. सर्व पक्षांची एकत्र येऊन १९७७ ची लोकसभा निवडणूक लढवली. त्यात यशस्वीही झाले. जनता पार्टीला २९८ जागा मिळाल्या, तर काँग्रेस फवत १५३ जागाच जिंकू शकली.
त्यानंतर झालेल्या विधानसभेतही जनता पक्षाला घवघवीत यश मिळाले. काँग्रेस पक्षाला अपयश मिळाल्याने इंदिरा गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तेव्हाच्या जनता पक्षात सर्वात जुने जाणते नेते होते, ते मोरारजी देसाई! म्हणून त्यांना पंतप्रधान पद देण्यात आले. पण, ते आपला म्हणावा तसा प्रभाव पाडू शकले नाहीत. जनता पक्षात कलह सुरु झाला व त्यांचे सरकार पडले. परत निवडणुका झाल्या व इंदिरा गांधीच्या पक्षाने त्या जिंकल्या, इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या, तेव्हा पंजाबमध्ये विघटनवाद्यांनी, वेगळ्या ‘खलीस्तान' राज्याची मागणी केली. ‘गोल्डन टेंपल' मंदिरात ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार' कांड झाले. शिखांच्या भावना दुखावल्या गेल्याने इंदिरा गांधीच्याच बॉडीगार्डने, इंदिरा गांधीवर पिस्तूलातून गोळीबार करुन त्यांची हत्या केली. त्यानंतर इंदिरा गांधीचे वारसदार म्हणून राजीव गांधीना पंतप्रधान म्हणून घोषित करण्यात आले. त्यांनी आपला कार्यकाल पूर्ण केला. पण त्यांच्याच सहकाऱ्यांनी त्यांचा घात केला व परत सरकार बदलले, पण त्यांचाही निभाव लागला नाही, कोणताही नेता आपला प्रभाव पाडू शकला नाही. आपला कार्यकाल पूर्ण करु शकला नाही, नंतर आलेल्या मनमोहन सरकारने आपला दोन्ही वेळचा कार्यकाल पूर्ण केला.
पक्षातील लालची व सत्तालोलूप नेत्यांनी व काँग्रेसच्या मित्रपक्षांनी मनमोहन सरकारला बदनाम केले. परिणामस्वरुप काँग्रेसची सत्ता जाऊन २०१४ साली, भारतीय जनता पक्षाने, नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यात यश मिळवले, ते आजतागायत अबाधित आहे. नरेंद्र मोदी यांचा भर देशात ‘हिंदू राष्ट्र' आणण्यावर आहे. मोदींना व भाजपला, देशात लोकशाही व सर्व धर्म समभाव हा मुलमंत्र मान्य नसावा. कारण त्यांच्या अनुयायांनी व संघ परिवाराने हिंदू विरहित लोकांना या ना त्या कारणाने टार्गेट करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यामुळे देशातील सलोख्याचे वातावरण बिघडत चालले आहे. जिकडे-तिकडे हाहःकार माजत आहे. कायद्याचे तीन-तेरा वाजत आहेत. त्यावर केंद्र सरकार अथवा राज्य सरकार कठोर निर्णय घेताना दिसत नाही. केंद्र सरकार व भाजपप्रणित राज्य सरकारे समाजद्रोहयांना प्रतिबंध न घालता, त्यांना सूट देऊन वाचवण्याचा प्रयत्नात असल्याचे स्थिती दिसते.
२०१४ साली भारतीय जनतेने नरेंद्र मोदीवर विश्वास दाखवून, त्यांच्या हाती सत्तेची दोरी दिली, पण ती वापरण्यात कुठेतरी चूक होत आहे. मोदींच्या पहिल्या कालखंडात म्हणावी तशी प्रगती झाली नाही म्हणून त्यांना दुसऱ्याही ‘टर्म' मध्ये संधी दिली गेली, पण संधीचीच बंदी झाली. सरकारची जुमलेबाजी, कमी व्हायचे नाव घेत नाही. भ्रष्टाचाराने, महागाईने, बेरोजगारीने, कळस गाठला आहे. तरीही सरकारला जाग येत नाही. लोकांच्या जगण्या-मरण्याचे सरकारला काहीही सोयरसुतक नाही, सरकार आपल्या मस्तीत मग्रूर आहे. तर भाजपचे व मोदींचे अंधभवत चेले आपल्या मनमानीवर उतरले आहेत व स्वतःला कायद्याच्या धाकातून सहीसलामत असल्याचे भासवत आहेत.
पण, हा प्रकार सतत चालत नाही, भविष्यात वारे फिरु शकते, मौसम बदलू शकतो. बदल हा निसर्गाचा नियम आहे. पूर्वीचे लोक किंवा आपले पूर्वज हवेचा रोख पाहून आपले भावी अंदाज व्यक्त करत असत. अनेकवेळा त्यांचे अंदाज शंभर टक्के खरे ठरत असत. एवढंच कशाला कुठला पक्षी कोणत्या झाडावरील खोपटात बसेल ते सांगत असत. जनावरांची मुखमुद्रा पाहून त्याची हालत जाणून घेवून त्यांची काळजी घेत असत.
खरंतर तो काळ अंदाज व्यक्त करण्याचा होता. अनुभवाचा होता. आता जग बदलत चालले आहे, सर्वच क्षेत्रात नवनवीन यंत्राचा शोध घेतला जात आहे आणि त्याचा वापरही मोठ्या प्रमाणावर होत आहे. निरनिराळ्या टेवनीकचा विकास केला जात आहे. जेणेकरुन आपले कार्ये आणि व्यवहार अचूक व्हावेत अशी त्यामागची भावना असायची आणि ती भावना खरीही असायची. याउलट आताच्या बहुतेक लोकांचे अंदाज हवेत बाण मारल्यासारखे निघतात किंवा गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. तरीही त्यात दम असायचा. आता तो दम राहिलेला नाही.
आता आपण खुश आहोत कारण हे विज्ञान युग आहे. वेळ पाहण्यासाठी रेतीच्या घड्याळाचा किंवा आपल्या सावलीचा आधार घ्यावा लागत नाही. आपल्या हातात अशी अशी स्मार्ट घड्याळे आहेत. ज्यामुळे तुम्ही दिवसभरात किती पावले चालला आहात, तुम्ही किती पाणी प्यायले आहात, तुम्ही किती श्वास घेतले वगैरे-वगैरे, एवढं असूनही तुम्ही हवामानाचा व निवडणूक निकालाचा अंदाज बांधू शकत नाही. हवामानाच्या अंदाजासाठी सरकारचा, ‘मौसम' विभाग आहे. पण त्यांचा अंदाज चुकून एखादा खरा ठरतो. त्यांचे अंदाज बहुतेक चुकलेलेच असतात. जिकडे पावसाचा जोर दाखवला जातो तिकडे कोरडे ठणठणीत असते तर उलट भागात पाण्याचा वेग जास्त बरसून जातो. जसा वेधशाळेचा अंदाज चुकतो तसाच निवडणूकीत कोणाला किती मते किंवा कोणत्या पक्षाला किती जागा हा चॅनेलवाल्यांचा अंदाज कधीच खरा होत नाही. विविध चॅनेल्सवर तथाकथित स्वतःला तिस्मारखाँ समजणारे अँकर बऱ्याच वेळा तोंडावर पडलेले पहायला मिळतात. ‘ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी' या उवतीप्रमाणे त्यांचे वागणे असते. ‘माल तसा ताल' पण अंदाज फोल'
आता महाराष्ट्रात विधानसभेचे बिगुल वाजले आहे. एकीकडे सणांची राणी दिवाळी जवळ आल्याने लोक खुशीत आहेत, तर दुसरीकडे निवडणूकीच्या तारखा जाहिर झाल्याने इच्छुक उमेदवार तिकिटासाठी आतूर आहेत. पक्षाचे नेतृत्व अनेकांना तयारीला लागा असे सांगत ऐनवेळी तिसऱ्याच नावाची घोषणा होते, तयारी करणारे उमेदवार हवालदिल होतात व नाइलाजाने पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करतात. बहुतेक वेळा अपप्रचारच जास्त केला जातो, चलाख उमेदवार आपल्या हातातील पैशाने आपल्या कार्यकर्त्यांसह विरोधकांनाही वश करतात. पडेल उमेदवाराला ‘बुडते को, तिनके का आधार' प्रमाणे मिळतील तेवढे पैसे वसूल करणे एवढेच त्याच्या हातात म्हणूनच अनेक उमेदवार निवडणूक हरुनही तालेवार कसे बनतात हे कोडे जनतेला पडते. पण उमेदवार आणि पक्ष यांच्याखेरीज एक दोन मध्यस्थ सोडले तर कोणालाच सुटत नाही.
आता तर डबल खुशीची संधी आहे. दिवाळीच्या निमित्ताने, लोकांना लुटण्याची व्यापाऱ्यांना संधी, तर निवडणूक उमेदवाराला लुटण्याची त्याची चिल्या-पिल्यांना संधी, हा योगायोग समजावा का? निवडणुकांचे अंदाज खोटे ठरवण्याची कला फक्त ‘ई व्ही एम' व निवडणूक आयुवतांकडेच आहे.
हरियाणाचा माहोल काँग्रेसकडे दिसत होता, पण प्रत्यक्षात उमेदवार निवडून आले भाजपचे, व सरकारही भाजपचेच असेल, तिच स्थिती महाराष्ट्राची होणार का? कारण आता महाराष्ट्रात १९७७ पूर्वीचीच स्थिती आहे. अनेक नेते अनेक पक्ष जो तो आपलाच विजय होणार या भ्रमात आहे, त्यामुळे कोण , कोमात जातो, हे येणारा काळच ठरवेल. -भिमराव गांधले