मुशाफिरी
मानवी इतिहासात कुत्र्याला मोलाचे स्थान आहे. मग तो पाळलेला असो... की बिनबुलाये दारात आलेला भटका कुत्रा! मानवप्राणी जिथे जिथे गेला तिथे कुत्राही सोबत गेला आहे. ज्येष्ठ पांडव युधिष्ठीराने तर स्वर्गाच्या प्रवेशदारापर्यंत आपल्यासोबत कुत्रा नेल्याची आख्यायिका आहे. घसघशीत रक्कम देऊन कुत्र्याचे पिल्लू घरी आणत, त्याचे कोडकौतुक करत लहानाचे मोठे करणारे अनेक परिवार आहेत. मात्र भटक्या, पिसाळलेल्या, चावऱ्या, बिनमालकांच्या कुत्र्यांनी समस्त कुत्रासमुदायाची इज्जत घालवण्याचे काम केले आहे.
प्राणीविश्वात श्वान अर्थात कुत्र्याचे महत्व खूप आहे. पुराणात शिरलात तरी दत्तगुरुंजवळ कुत्रे असल्याची छायाचित्रे भवतगण दाखवतील. कुत्रा हा एक इनामी, विश्वासू, प्रामाणिक, अदलबदल न करणारा प्राणी मानला जातो. त्याच्या नाकाच्या अतिविशिष्ट रचनेमुळे त्याची वास घेण्याची, घेतलेला वास मेंदूत साठवण्याची क्षमता चांगली असते. त्यामुळे पोलीस दलात कुत्र्यांचा सन्मानाने विचार करण्यात आला असून विविध गुंतगुंतीच्या मामल्यांत त्यांची मदत घेतली जाते. बॉम्बशोधक पथकांत त्यांचा हटकून समावेश केला जातो. या कुत्र्यांवर प्रेम करणाऱ्या मनुष्यमात्रांची संख्याही खूप आहे. शिवसेनाप्रमुख मान. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनाही कुत्रे आवडत असत. राज ठाकरे हेही आपल्या घरातील कुत्र्यांना जीव लावतात. अनेक सिनेतारे-तारका एकाच वेळी अनेक श्वान बाळगून त्यांची देखभाल करत असतात. हे झाले श्रीमंतांचे; पण यथातथा आर्थिक स्थिती असणारेही कित्येकजण माझ्या पाहण्यात आहेत, की ज्यांनी कुत्री सांभाळून त्यांच्याही पोटापाण्याची चिंता वाहिली आहे. जर्मन शेफर्ड, बुलडॉग, फ्रेंच बुलडॅाग, सायबेरियन हस्की, बिगल, अलास्कन मॅलाम्युट, पुडल, कॅटल डॉग, रॉटवेलर, बॉर्डर वुली, ऑस्ट्रेलियन शेफर्ड, बॉक्सर, इंग्लिश कॉकर, बुल टेरियर, अमेरिकन बुली अशा एक ना अनेक जातीचे कुत्रे आढळून येतात. यातील काही कुत्रे हे शिकारी प्रकारचे मानले जातात. काही कुत्रे घरगुती सांभाळासाठी व घराचे रक्षण करण्यासाठी योग्य समजले जातात. यातून उरलेल्यांना आपण भटके, बिनमालकांचे समजतो.
मराठी चित्रपटाचा विचार केला तर दादा काेंडके यांनी ‘वाघ्या' नावाच्या कुत्र्याचे पात्र त्यांच्या सिनेमात आणले होते व त्यावर एक पूर्ण गाणेही चित्रित करण्यात आले होते. सॅण्डो एम एम ए चिनाप्पा देवर नावाचे तामिळी दिग्दर्शक त्यांच्या प्राणीप्रेमासाठी सुप्रसिध्द होते. त्यांनी हाथी मेरे साथी, जानवर और इन्सान, गाय और गौरी, राजा, माँ, मेरा रक्षक असे हिंदी चित्रपट काढून त्यात प्राण्यांच्या मानवांमधील चांगुलकीच्या जवळीकीचे चांगले चित्रण केले होते. के.सी.बोकाडिया यांनी तेरी मेहरबानिया या सिनेमात जॅकी श्रॉफ व पूनम धिल्लोंसोबत कुत्र्यालाही मोठी भूमिका दिली होती. १९६०-१९८० दरम्यान निर्मित अनेक सिनेमांमध्ये नायकाची आई, बहीण, नायिका, छोटा भाऊ यांच्यावर एखादे संकट खलनायकामुळे आले तर त्यांची सुटका करण्यात नायकाचा मित्र असलेला कुत्रा हमखास धावून जाई असेही आपण अनेकदा पाहिले असेलच.
हे सारे आज मला प्रकर्षाने आठवले ते पुण्यातील एका छटनेमुळे! तेथे मध्यरात्री अडीचच्या सुमारास घराकडे पायी जाणाऱ्या एका गृहस्थाच्या अंगावर दुसऱ्या एकाचा पाळीव कुत्रा धावून गेला. तो चावेल म्हणून त्या गृहस्थाने स्वतःकडे असलेल्या पिस्तुलातून त्या कुत्र्यावर गोळी झाडली. पण ती त्याला लागली नाही; मात्र त्या आवाजाने कुत्र्याचा मालक घराबाहेर धावत आला व झाल्या प्रकाराबद्दल त्याने पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पोलीस ठाण्यात गेल्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी टाळाटाळ केली जाते असा अनेक नागरिकांचा आरोप असतो. सोबत पत्रकार, राजकारणी, प्रभावशाली व्यक्तीमत्व गेले तरच पोलीस चटकन गुन्हा नोंदवतात, अन्यथा दिरंगाई करतात अशी ओरड नागरिक नेहमी करीत असतात. पण या प्रकरणात तसे झाले नाही. पोलीसांनी लगेच गुन्हा नोंदवला. घटनास्थळाला भेट दिली, पिस्तुलाची पुंगळी शोधली. गोळी झाडणाऱ्या इसमाचे पिस्तुलही जप्त केले. काय ही तत्परता! या घटनेच्या वृत्तात पुढे असे म्हटले आहे की जर कुणाचा पाळीव कुत्रा कुणाला चावला तर ती व्यवती कुत्र्याच्या मालकाविरोधात उपद्रवाचा गुन्हा दाखल करु शकते व योग्य त्या प्राधिकरणाकडे भरपाईसुध्दा मागू शकते. कारण कायद्यानुसार पाळीव कुत्र्यावर देखरेख ही त्याच्या मालकाने ठेवायला हवी. हे म्हणजे आधी तुमच्यावर कुणीतरी चाकूहल्ला करु दे, तुम्हाला जखमी करु दे, मग तुम्ही तक्रार करा आणि मग योग्य ते प्राधिकरण तुम्हाला झालेल्या दुखापतीबद्दलची भरपाई देईल, यातला प्रकार म्हटला पाहिजे. या पाळीव कुत्रेवाल्यांचा आणि त्यांच्या कुत्र्यांचा त्रास आजूबाजूच्या व परिसरातल्या इतर लोकांना होऊच नये यावर काय उपाययोजना?
कुत्रे हे काही आपले दुश्मन नव्हेत! या जगतावर त्यांचाही आपल्याइतकाच अधिकार आहेच हेही खरे. पण विषय केवळ पाळीव कुत्र्यांचा नाही तर भटक्या, बिनमालकांच्या, चावऱ्या, बेवारस, लुत लागलेल्या, रोगीट, पिसाळलेल्या कुत्र्यांचाही आहे. अनेक निरागस बालके, वृध्द व्यवती, गरोदर महिला, रुग्ण यांना या भटवया, चावऱ्या कुत्र्यांच्या हल्ल्यांना सामोरे जावे लागले आहे. काही भटवया कुत्र्यांनी बालकांना फाडले अशाही घटना घडल्या आहेत . त्यांचे काय करायचे? त्यांचे कायदा काय (वाकडे) करतो? महानगरपालिकेकडे तक्रार केल्यास त्यांची गाडी येते. क्वचित प्रसंगी त्यांचे निर्बिजीकरण केले जाते. पण या कुत्र्यांची दहशत कायम राहतेच. चावऱ्या, पिसाळलेल्या कुत्र्यांच्या दंशामुळे ‘रेबिज' सारखा गंभीर रोग होतो. त्यावर तापदायक इंजेवशने घ्यावी लागतात. या औषधोपचारात उगाचच बहुमोल वेळ जातो आणि मनस्ताप होतो, ते वेगळेच! आरोग्यशास्त्र असे सांगते की (कोणत्याही, पाळीव वा भटवया!) कुत्र्याच्या अंगावरील तसेच मांजर, बोका यांच्या अंगावरील गळणारे केस हे मानवाच्या श्वासातून शरीरात गेल्यास ते खूप हानीकारक असते. त्यातून श्वसनाचे व फुप्फुसाचे विविध रोग होतात. काही विशिष्टधर्मिय लोक कबुतरांना धान्य टाकून पुण्य पदरात पाडायला बघतात. मी प्राण्यांच्या डॉक्टरांच्या मुलाखती घेतल्या असल्याने त्यांना याबाबत प्रश्न विचारले आहेत. तेथेही असे उत्तर मिळाले की कबुतराची पिसे, त्यांची विष्ठा यांचा संपर्क मानवी जीवनाशी येणे अत्यंत घातक होय. तरीही घरामध्ये कबुतर, पोपट, लव्ह बर्डस् पाळणारे कित्येक प्राणीमित्र माझ्या पाहण्यात आहेत. ‘वन्य जीव निसर्ग संरक्षण संस्था' या प्राणीप्रेमी संस्थेशीही माझा गेली पंधरावीस वर्षे निकटचा संबंध राहिला आहे. तेथेही मानवी वस्तीजवळ आढळणारे साप, भेकर, ससे, घुबड, रानमांजर, मोर वा तत्सम प्राणी-पक्षी संकटात असल्यास त्यांची सुटका करावी, त्यांची माहिती वन विभागाला द्यावी आणि योग्य त्या उपचारांनंतर त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडुन द्यावे हेच तत्व अंगिकारले जाते. असे अनेक नाग, अजगर व तत्सम सरपटणारे व अन्य प्राणी-पक्षी यांच्या या प्राणीमित्रांनी केलेल्या सुटकेचा मी ‘याची देही याचि डोळा' साक्षीदार आहे.
प्राणीमित्र, प्राण्यांचा पालक-छांदिष्ट असण्याला कुणाची हरकत असण्याचे काहीच कारण नाही. मात्र हल्ली हा विषय कळीचा ठरु पाहात आहे. आपल्या पाळीव प्राण्यांची आवड आपण खासगीरित्या जोपासावी, त्यांचे हागमुत काढावे, त्यांना अंथरुणात घेऊन झोपावे, आपल्या ताटात घेऊन जेवण भरवावे, त्यांचे वाढदिवस बॅनर-पोस्टर चौकात लावत महागड्या हॅाटेलात साजरे करावेत, त्याची जाहिरात वर्तमानपत्रात द्यावी किंवा कसे हा ज्याचा त्याचा व्यक्तीगत प्रश्न आहे. मात्र त्याचा उपद्रव शेजारपाजारच्यांना, समाजाला व्हायला लागला की तो प्रश्न सार्वजनिक व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारा ठरतो. माझ्या पाहण्यात असे अनेक पापभिरु, दानशूर प्राणीप्रेमी आहेत की ते घरची बिस्किटे, चपात्या, दूध, पोळ्या, भाकऱ्या आणून कुत्र्यांना घालतात आणि हे कुत्रे नेमके बसतात इतरांच्या दारात! सर्वच कुत्र्यांना हे घरचे, शिजलेले अन्न आवडते असे नाही. मग इतरांच्या दारांना या प्राणीमित्रांनी कुत्र्यांसाठी म्हणून आणून ठेवलेले शिळेपाके, काही कुत्र्यांनी नुसतेच हुंगुन-विस्कटून टाकून दिलेले अन्न एखाद्या उकिरड्याचे स्वरुप आणते. यातूनच मग भांडणे उद्भवतात. आपल्या दारात आपली मुले, घरचे सदस्य बरे वाटतात. दारात बिनबुलाये झुंडीने जमलेल्यांना मग ‘दारचे कुत्रे' म्हणण्याची प्रथा यातूनच रुढ झाली असावी की काय? ‘बसंती इन कुत्तोंके सामने मत नाचना' हा शोलेमधील धर्मेंद्राचा डायलॉग चांगलाच गाजला होता. ‘तुम कुत्तेकी मौत मरोगे' असेही एक चरचरीत वाक्य कधी हिरो तर कधी व्हिलन एकमेकांकडे जळजळीत कटाक्ष टाकत म्हणताना आपण पडद्यावर पाहिले असेल. ‘हाथी चले बाजार कुत्ते भोंके हजार' अशीही एक म्हण हिंदीमध्ये आहे. एकाच वेळी दत्तगुरुंचे सानिध्य, इमानी, विश्वासू म्हणून जणू कुटुंब सदस्य असल्यासमान बहुमान, पोलीसी शोधकार्यातही सहभागाची संधी, हे काम करताना किंवा वयोमानानुसार मृत्यू आल्यास सर्वांना शोकाकुल करुन हे जग सोडल्याची अनुभूती आणि दुसरीकडे हेटाळणी, हाडतुड, शिळेपाके खाण्याचा प्रसंग, दुसऱ्या गल्लीतील स्वजातीयांकडून हल्ल्यांची सतत भिती, लोकांच्या तक्रारींवरुन सरकारी यंत्रणांकडून उचलून नेण्याची चिंता, टारगट पोरांकडून केंव्हाही दगडफेक होण्याचा संभव अशी दुहेरी वागणूक मिळणारी कुत्रा ही एकमेव प्राणीजमात असावी. -राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर