पुस्तक परिचय ः नातेसंबंध सुदृढ राखण्यासाठी उपयुक्त पुस्तक ‘का चिंता करीशी ?'
डॉक्टर राजेंद्र बर्वे यांचे ‘का चिंता करीशी?' हे पुस्तक मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या पुस्तकात ‘स्वीकार, सर्वस्वी स्वीकार, विनाअट स्वीकार', ‘कशासाठी पोटासाठी?, खंडाळ्याच्या घाटासाठी !', ‘हे बंध रेशमाचे व ‘पूर्णभान ' अशी चार प्रकरणे आहेत.
पहिल्या प्रकरणात मानसिक समस्येचा स्वीकार का करावा? हे सांगितले आहे. शिवाय स्वाध्याय व केस स्टडी दिल्या आहेत. दुसऱ्या प्रकरणात चिंता व तणाव याच्याशी सामना कसा करायचा? हे उदाहरणांसह सांगितले आहे. ‘हे बंध रेशमाचे' या तिसऱ्या प्रकरणात नाती कशी जपावी?, निमूट निष्क्रियता की दुराग्रही आक्रमकता, नात्यातील आत्मसन्मान, ‘नाही' म्हणणं म्हणजे काय?, भावनांची देहबोली, विषमय नातेसंबंध, (टॉक्सिक रिलेशनशिप), सवयी म्हणजे काय?, आक्रमक संवादशैली, भाषेतील सकारात्मकता, जनाचे आणि मनाचे ऐकावे! कसे? याबद्दल सविस्तर विवेचन केले आहे. त्यातून नात्यांतील परस्पर संबंध जोपासण्यासाठी कोणती संवाद कौशल्य वापरायची, समोरच्याला न दुखावता ‘नाही'कसे म्हणायचे?, वाईट सवयी कशा बदलायच्या?, ठामपणे कसे वागायचे? बोलायचे? यासाठी नॉन व्हायोलंट कम्युनिकेशन अथवा कंपॅशनेट कम्युनिकेशनचा वापर कसा करायचा?, आत्मविश्वासाने वागण्यासाठी कोणती कौशल्य जोपासायची?, ठामपणे वागण्याचे फायदे सांगितले आहेत. या प्रकरणातील सूचनांचा नातेसंबंध सुदृढ राखण्यासाठी चांगला उपयोग होईल.
‘पूर्णभान' माईंड फूलनेस या प्रकरणात पूर्णभान अनुभव, भान नसणं, पूर्णभान व्याख्या, साक्षरता भावनांची, साक्षी भाव, ज्ञानाच पूर्णभान, प्रज्ञाचं मानसशास्त्र, करुणा म्हणजे काय? यावर मुद्देसूदपणे चर्चा केली आहे. सदर पुस्तक व्यक्तीचे मानसिक आरोग्य सुदृढ टाकण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या पुस्तकात जागोजागी स्वाध्याय, केस स्टडी दिल्या आहेत. त्यामुळे समुपदेशनासाठीदेखील या पुस्तकाचा फायदा होणार आहे. यासाठी सदर पुस्तक संग्रह असणे अत्यंत आवश्यक आहे. - लेखक : डॉक्टर राजेंद्र बर्वे प्रकाशक : रोहन चंपानेरकर.
मूल्य २००/- रु पृष्ठे ः १३५
-रवींद्र जांभळे