ब्लॅक इज ब्युटीफुल

तिला सगळे काळीच म्हणत. तीच तिची जन्मापासूनची ओळख होती. तिचे आई-वडील आणि मोठा भाऊ गोरे होते. त्यामुळे तिच्या कुटुंबियांना तिच्या काळेपणाचे फारच वैषम्य वाटायचे. विशेषतः तिच्या आईला. तशी ती लख्ख काळी नव्हती. सावळी होती. पण इंग्रजांची गुलामगिरी नसानसात भिनलेले भारतीय लोक सावळ्यालाही काळंच म्हणतात हे मी अनेकदा बघितलं आहे. मी तिच्यातला आत्मविश्वास एका वेगळ्या प्रकारे जागवला, तिच्या सुडौल शरीरयष्टीवर लक्ष केंद्रीत करायला लावले...आणि...आणि जणू चमत्कारच घडला.

ती ज्ञानप्रबोधिनीची अत्यंत हुशार विद्यार्थिनी होती. पुढे बारावीला स्कोरिंग करत तिने वैशंपायन मेडिकलला ॲडमिशन घेतली. मग ती टेनिस खेळायला जाऊ लागली. तिथे तिला व्हीनस विल्यम्स म्हणून चिडवायला लागले. तिच्या मनाला जणू शेकडो इंगळ्या डसत होत्या. फक्त काळ्या रंगामुळे तिची हुशारी, सगळे गुण, टॅलेंट अक्षरशः मातीमोल झालं होतं. तिने अनेक उपाय केले, कित्येक क्रीम्स वापरली, विविध डॉक्टर्सची ट्रीटमेंट घेतली. पण परिणाम शून्य. सुई टोचलेल्या फुलपाखरासारखी काळी तडफडत होती. ती एमबीबीएस झाल्यावर पुण्यात नोकरी करणाऱ्या तिच्या भावाने पलॅट घेतला. तिच्या कुटुंबियांनी पुण्याला शिपट व्हायचा निर्णय घेतला. सामान हलवायला सुरुवात झाली. त्याच दिवशी तिने मला थांबवले. मला म्हणाली, तुमच्याशी बोलायचं आहे. तिला सोयीस्कर अशा निवांत ठिकाणी आम्ही बसलो. तिने डायरेक्ट मुद्द्याला हात घातला,  मला कळले आहे की तुम्ही कौन्सिलिंग करता. मला माझ्या काळेपणावर उपाय सांगा. माझी आता पूर्ण कोंडी झाली आहे. मी विचारात गढून गेलो. तिला या क्षणी आत्मविश्वास देणं अत्यंत गरजेचं होतं नाहीतर तिचं आयुष्य उध्वस्त होण्याच्या मार्गावर होतं. या कामी तिच्या गुणांचा काहीच उपयोग होणार नव्हता कारण त्याची जाणीव होतीच. मला तिचा असा एखादा प्लस पॉइंट हवा होता ज्याची तिला अजून जाणीव झाली नव्हती.

विचार करता करता मी तिच्याकडे नीट बघितलं आणि मला उपाय सापडला. मी विचारलं, तुझ्याकडे पूर्णाकृती आरसा आहे का ? ती म्हणाली,  आमच्याकडे तर नाही पण नव्या पलॅटमध्ये आहे. मी तिला आश्वस्त केलं, तो आरसाच तुझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट असणार आहे. ती माझ्याकडे अविश्वासाने बघत राहिली. मी पुढे बोलू लागलो, तुम्ही तिकडे शिपट झाल्यावर घरात कुणीही नसताना जमेल तितक्या मोकळेपणाने त्या आरशासमोर उभी राहा आणि आरशात बघ. तिथं एक रेखीव शिल्प तुझ्याकडे पाहून खुदकन हसेल. त्या रेखीवपणाशी असलेलं तुझं नातं तुला जन्मभर सांभाळायचं आहे. त्यासाठी तुला एक हेल्दी पॉझिटीव्ह लाईफस्टाईल जगावी लागेल; ज्यात व्यायामाला सर्वोच्च स्थान असेल. तुझ्या काळेपणाविरुद्धच्या लढाईत तुझं प्रमाणबद्ध शरीर हेच तुझं हत्यार असणार आहे. या युद्धाला जिंकण्यासाठी तुला तुझ्या गात्रागात्रांतून रणशिंग फुंकावं लागेल. तुझ्या रंध्रारंध्रातून चैतन्याची कारंजी उसळू देत आणि मग बघ कसा चमत्कार घडेल. तुझ्या सळसळत्या पेशींच्या गगनभेदी जल्लोषात तुझ्या काळेपणाचा आवाज क्षीण होऊन जाईल. मी माझे बोलणे संपवले. ती काही क्षण माझ्याकडे बघत राहिली आणि मग एकेक शब्द ठामपणे उच्चारत म्हणाली,  मी तुम्हाला कधीच विसरणार नाही.

जग फार लहान आहे. काही वर्षांनी आमची परत भेट झाली. मी पहिल्या नजरेत तिला ओळखू शकलो नाही. एक अत्यंत आकर्षक तरुणी माझ्या समोर कमालीच्या आत्मविश्वासाने उभी होती. मग ती कितीतरी वेळ भरभरुन बोलत राहिली....  स्वतःविषयी, करिअरविषयी, विदेशातील नोकरीविषयी.... आणि मी फक्त समाधानाने ऐकत राहिलो. - जितेंद्र अभ्यंकर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 फटाक्यांमुळे होते प्रदूषण