वसंत ऋतू म्हणजे बहरलेली सृष्टी आणि आमच्या नशिबी हरवलेली दृष्टी
अनेक विचारवंत बाबासाहेबांनी धम्म क्रांती कशी केली हे खूप अभ्यासपूर्ण मांडतात. पण गेल्या ६८ वर्षात आम्ही काय शिकलो आणि कसे संघटितांचे असंघटित होत चाललो यांचे सत्य परिस्थिती वरील परीक्षण मांडण्याचे धाडस करीत नाही. त्यासाठी हे वसंत ऋतू म्हणजे बहरलेली सृष्टी आणि आमच्या नशिबी हरवलेली दृष्टी.
नागपूरच्या दीक्षा भूमीवर ११,१२,१३ ऑक्टोबर २०२४ ची प्रत्येक रोडवर असलेली गर्दी पाहून मनाला खूप आनंद वाटत होता आणि दुःखही होत होते. एकाच वेळी मनात दोन भावना येत होत्या. एक कारण एवढे लोक कोणीही न बोलावत लाखोंच्या संख्येने का येतात? काय घेऊन जातात. काही लोक पुस्तक विकत घेऊन झाडाखाली कुठेही जागा मिळेल तिथे वाचत बसतात. त्यांचे येणाऱ्या जाणाऱ्याकडे बिलकुल लक्ष नसते. तेव्हा माझ्यातील सत्यशोधक जागा होतो. मी त्याला विचारतो कुठून आला? नांदेड, परभणी, लातूर. प्रत्येकाची उत्तर वेगळी असतात. कशासाठी आला? दर्शनासाठी? किती वर्षे झाली येता? बारा-पंधरा वर्षे झाली असतील. त्याचवेळी मला प्रश्न पडतो कामगार, कर्मचारी अधिकारी आणि मतदार म्हणून हा एकत्र का येत नाही? बाबासाहेबांना अपेक्षित असलेला शासनकर्ती जमात का बनत नाही? स्वतंत्र मजदूर युनियन राष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त का बनत नाही? किंवा सत्ताधाऱ्यावर व प्रशासनावर दबाव निर्माण करणारा स्वतंत्र मजदूर पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विरोधी पक्ष का बनत नाही? नागपूरची दीक्षाभूमी लोकांना लढण्याची शक्ति देते. माणसाला माणसासारखी वागवणूक देण्याची विचारांची शिदोरी देते. ते घेऊन तो राज्याच्या देशाच्या नव्हे, तर जगाचे पाठीवर कुठेही गेला तर विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांची धम्मक्रांती डोळ्यासमोर ठेऊन जगण्यासाठी संघर्ष करू शकतो. यावेळी मला एका लेखकाची आठवण येते. तो म्हणतो वसंत ऋतू म्हणजे बहरलेली सृष्टी आणि आमच्या नशिबी हरवलेली दृष्टी.
दीक्षा भूमीवरील गर्दीकडे पाहून एके काळी म्हणजेच १४ ऑक्टोबर १९५६ ला असलेला पांच लाख समाज आणि यंदाचा म्हणजेच १२ ऑक्टोबर २०२४ चा पस्तीस चाळीस लाख असलेला समाज याची ही लेखकाने खाली केलेली तुलना जरूर वाचा. दीक्षाभूमीच्या परिसरात फिरत असतांना त्याच वेळी मनात घर करुन जाईल असा, एक आंधळा भिकारी रस्त्यावर एका बाजूला बसलेला. त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नाही. तो एवढा दरिद्री आहे की त्याला अश्रूदेखील महाग झालेत. गेली कित्येक वर्षे तो रडलेला नाही. त्याचवेळी एक कार्यकर्ता लेखक पूर्णपणे दिवाळं वाजलेला. खिशात दमडीदेखील नाही आणि फिरायला बाहेर पडतो. त्याची नजर त्या भिका-याकडे आणि त्याच्या त्या करूण अवस्थेकडे जाते. त्या भिका-याच्या बाजूला एक पाटी आणि दोन-तीन खडू पडलेले. हा लेखक त्या भिका-याकडे जातो आणि म्हणतो, मित्रा,मी एक लेखक आहे, पण माझ्याकडे एक पै देखील नाही, पण माझ्याकडे कला आहे. माझ्याकडे शब्दांची शक्ती आहे.ती मी तुला देऊ शकतो. तुझ्या परवानगीने मी या पाटीवर काही लिहू का?
साहेब भिकारी म्हणतो, माझ्याशी कुणी बोलतदेखील नाही. मी एक गरीब आंधळा भिकारी. तुम्हाला त्या पाटीचं जे ठीक वाटतं ते करा. तो लेखक त्या पाटीवर काहीतरी लिहून निघुन जातो. त्या क्षणापासून भिका-याच्या लक्षात येते की, एकदम जाणाऱ्या- येणाऱ्यांपैकी प्रत्येकजण त्याच्याजवळ थांबून त्याच्या पुढ्यात पैसे टाकू लागलाय. थोड्याच वेळात तिथे पैशाची रास जमते. तो भिकारी बेचैन होतो. नाण्यांची रास वाढतच जाते. तो एवढा अस्वस्थ होतो की पैसे टाकणा-यांपैकी एकाचा हात पकडतो आणि म्हणतो, साहेब, माफ करा तुमचा हात पकडल्याबद्दल. मी एक गरीब आंधळा भिकारी आहे. मला कृपा करुन जर या पाटीवर काय लिहीलंय ते वाचून दाखवलेत तर फार उपकार होतील हो.
तो माणूस पाटी उचलतो आणि वाचायला लागतो.
वसंत ऋतू म्हणजे बहरलेली सृष्टी आणि माझ्या नशिबी हरवलेली दृष्टी. भिका-याच्या गालावरुन अश्रू ओघळायला लागतात.आयुष्य कुणी जास्त जाणलं? या ओळी लिहीणाऱ्या लेखकानं? की त्या ओळी वाचून पैसे टाकणाऱ्या लोकांनी? की इतक्या वर्षांनी रडणाऱ्या त्या भिका-यानं?
तुमचे डोळे चांगले असतील, तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल...पण जर तुमची वाणी गोड असेल, तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल...माणसाला बोलायला शिकण्यास (किमान) २ वर्ष लागतात...पण काय बोलावे? हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते...ओढ म्हणजे काय? हे जीव लावल्याशिवाय कळत नाही...प्रेम म्हणजे काय? हे स्वतः केल्याशिवाय कळत नाही...विरह म्हणजे काय? हे प्रेमात पडल्याशिवाय कळत नाही...जिंकणं म्हणजे काय? हे हरल्याशिवाय कळत नाही...दुःख म्हणजे काय? हे अपेक्षाभंग झाल्याशिवाय कळत नाही...सुख म्हणजे काय?हे दुसऱ्याच्या हास्यात शोधल्याशिवाय कळत नाही..समाधान म्हणजे काय? हे आपल्यात शोधल्याशिवाय कळत नाही...मैत्री म्हणजे काय? हे ती केल्याशिवाय कळत नाही...आपली माणस कोण? हे संकटांशिवाय कळत नाही...सत्य म्हणजे काय? हे डोळे उघडल्याशिवाय कळत नाही...उत्तर म्हणजे काय?हे प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही...जबाबदारी म्हणजे काय? हे त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही...काळ म्हणजे काय? हे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही..
गेली ६८ वर्ष दीक्षाभूमीवर येणाऱ्या समाजांच्या वेग वेगळ्या संस्था, संघटना,पक्ष एक दोन दिवसांसाठी किती ही संघर्ष करावा लागला तरी येतात. वयोवृद्ध महिला पुरुषांना जेवढा उत्साह असतो तेवढाच तरुण मुलामुलांीनाही जोश असतो. प्रत्येक ठिकाणी शक्ति प्रदर्शन आणि घोषणाबाजी अनेकांच्या अंगावर शहारे उभी करते. मी सेवाग्राम एक्सप्रेसने नागपूर ते मुंबई प्रवास करणाऱ्या भिम सैनिकाकडून अनुभवला. त्यावेळी काही वर्षापूर्वी वाचलेले हे वसंत ऋतू म्हणजे बहरलेली सृष्टी आणि आमच्या नशिबी हरवलेली दृष्टी. आठवले ते आपल्या वाचकांसमोर मांडले आहे. कारण अनेक विचारवंत बाबासाहेबांनी धम्म क्रांती कशी केली हे खूप अभ्यासपूर्ण मांडतात. पण गेल्या ६८ वर्षात आम्ही काय शिकलो आणि कसे संघटितांचे असंघटित होत चाललो यांचे सत्य परिस्थिती वरील परीक्षण मांडण्याचे धाडस करीत नाही. त्यासाठी हे वसंत ऋतू म्हणजे बहरलेली सृष्टी आणि आमच्या नशिबी हरवलेली दृष्टी.
- सागर रामभाऊ तायडे