परीक्षेची पूर्वतयारी

प्रथम सत्र परीक्षा अगदी सात आठ दिवसांवर आली होती. परीक्षा मग ती कोणतीही असो, अजूनही आपल्या शाळेत आणि घरात एक भीतीदायक वाटणारे तणावाचे वातावरण असते. कितीही नकोशी वाटली तरी अजूनही शाळेतील परीक्षेला पर्याय निघालेला नाही. आपल्याला आवडो किंवा न आवडो शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक मुलाला परीक्षा द्यावीच लागते. एवढी वर्ष परीक्षा घेतल्या जात असूनही,  परीक्षा आवडते असं सांगणारा विद्यार्थी अजून भेटला नाही. अशीच एका शाळेत प्रथम सत्र परीक्षा जवळ आली होती.

शाळा सुरू झाल्यापासून गेल्या सहा महिन्यांत मुलांना शाळेत जे काही शिकवलं होतं ते मुलं खऱ्या अर्थाने किती शिकली, याची तपासणी या परीक्षेतून होणार होती. म्हणजे परीक्षा मुलांचीही होती आणि मुलांना शिकविणाऱ्या शिक्षकांचीही होती. अभ्यासक्रमातील घटक शिकवायला आपण कमी पडलो नाही हे परीक्षेतून सिद्ध होऊ नये म्हणून आणि प्रथम सत्रातील परीक्षेत मुलांना सर्व प्रश्नांना आनंदाने सामोरे जाता यावे व  परीक्षेत त्यांना कोणताच प्रश्न अवघड वाटू नये म्हणून त्या शाळेतील बाईंनी परीक्षेतील प्रश्नांवर आधारित सराव घ्यायला सुरुवात केली. परीक्षेची अभिरूप पूर्वतयारी बाईंनी अगदी आनंदी वातावरणात सुरू केली. बाईंची सरावाची पद्धत देखील अभिनव होती. परीक्षेत असे प्रश्न येतील, तसे प्रश्न येतील, हे पाठ करा ते पाठ करा, याचा दहा वेळा सराव करा, ते दहा वेळा लिहून काढा. असला कोणताच यांत्रिक प्रकार त्या शाळेत घडत नव्हता. खऱ्या अर्थाने आनंददायी शिक्षणातील आनंददायी परीक्षेचा तो आनंददायी सराव सुरू होता.

बाईंनी सर्व मुलांना एकत्र बसवलं आणि हसऱ्या चेहऱ्याने मुलांना सूचना द्यायला सुरुवात केली, ‘आठ दिवसांनी आपली प्रथम सत्र परीक्षा आहे, परीक्षेनंतर दिवाळीची सुट्टी!' बाईंच्या एका वाक्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद नाचू लागला. बाई पुढे बोलल्या, ‘सुट्टीत खूप मजा करा, आपला रोज फक्त एक पेपर असणार आहे. पहिलीच्या मुलांना थोडसं लिहायचं आहे दुसरीच्या मुलांना त्यापेक्षा थोडं जास्त लिहायचं आहे आणि तिसरी चौथीच्या मुलांना तर लिहिता येतंच.' बाईंच्या सूचना मुलं लक्षपूर्वक ऐकत होती. या श्रवणभक्तीमध्ये परीक्षेची भीती नव्हती तर  आपल्याला काय करायचे आहे याचा आवाका मुले घेत होती. कळत नकळत आपल्याला रोज एक पेपर द्यायचा आहे या विचारांची पेरणी हसत खेळत बाईंनी मुलांच्या मनावर केली. परीक्षेतील चर्चेत मुलांचा सहभाग हळूहळू वाढला. मग बाई म्हणाल्या, ‘आपला पहिला पेपर आहे मराठीचा, आपण ज्या गोष्टी ऐकल्या, गाणी म्हटली, चित्र बघितली चर्चा केली त्यांच्या गमती जमती या मराठीच्या पेपरमध्ये असतात.' बाईंनी अखंड शाळेतील मुलांवर एक कटाक्ष टाकला आणि बाई म्हणाल्या, ‘आपण एक गंमत करूयात का?' गंमत म्हटल्यानंतर मुलांना अजून आनंद झाला. सगळ्यांनी एका सुरात होकार दिला.

गमतीचा तो धागा पकडत, आनंदाचे तेच वातावरण कायम ठेवत बाई म्हणाल्या, ‘मुलांनो, कल्पना करा की तुम्ही शाळेत येत आहात आणि अचानक तुमच्या वाटेवर एखादे पक्षाचे छोटेशे पिल्लू जखमी होऊन पडले आहे तर तुम्ही काय कराल?' थोडा वेळ शांतता पसरली. मुलांची विचारचक्र त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. मग हळूहळू एक एक मुल बोलू लागले, ‘आम्ही त्याला उचलून घेऊ,त्याला घरी घेऊन जाईन,' कोणी म्हणाले, ‘आम्ही त्याला पाणी पाजू, त्याची काळजी घेऊ, त्याला त्याच्या घरट्यात ठेवू.' हळूहळू सगळी शाळा एक एक वाक्य बोलू लागली. विचार प्रवर्तक प्रश्नाची वेगवेगळी उत्तरे बाई स्वीकारू लागल्या आणि त्या सगळ्या उत्तरांची बाईंनी एका गोष्टीत रूपांतर केले. पहिलीतल्या मुलापासून चौथीतल्या मुलापर्यंत प्रत्येक मूल, मी पिल्लासाठी काय करणार ते सांगत होते. कोणत्याच पुस्तकात नसतील एवढे पर्याय मुलांनी हसत हसत सांगितले. बाईंनी सर्वांना शाबासकी दिली आणि म्हणाल्या, ‘तुम्हाला छान कल्पना करता येतात, असा कोणताही प्रसंग आला की तुम्ही असाच विचार करा, अशाच वेगवेगळ्या गोष्टी तयार करा आणि पेपरमध्ये लिहा.'

मुलांनादेखील त्यांनी केलेल्या कल्पनेचा खूप आनंद झाला होता. परीक्षेत मराठीच्या पेपरमध्ये असंच काहीतरी असेल असा विचार करून मुले पुन्हा आपापल्या वर्गात गेली. पाच वाजले. शाळा सुटली. आनंदाने मुले आपापल्या घरी गेली. दुसरा दिवस उजाडला. मुलांची शाळेत यायची लगबग सुरू होती. नेहमीप्रमाणे आज शाळेत काहीतरी वेगळा अनुभव येणार या उत्सुकतेने आपली आवराआवर करून मुले शाळेकडे जायला निघाली.  अर्ध्या वाटेत आल्यावर काही मुलांना झाडाखाली एक सुंदर छोटेशे पक्षाचे पिल्लू पडलेले दिसले. मुलांनी अलगद त्या पिलाला उचलले आणि आपल्यासोबत शाळेत आणले. पिल्लाला घेऊन शाळेत आतमध्ये मात्र कोणीच गेले नाही.  सर्वजण शाळेच्या आवारात झाडाखाली बाईंची वाट बघत उभे होते. सर्व मुले बाईंची आतुरतेने वाट पाहत होती. पिल्लाच्या भोवती मुलांचा गराडा पडला होता. इतक्यात बाई आल्या. मुलं बाहेरच का उभी आहेत याचा विचार बाई करू लागल्या. बाई जवळ येताच सगळी मुलं सांगू लागली, ‘बाई काल तुम्ही म्हणाला एखादे जखमी पिल्लू दिसले तर तुम्ही काय कराल आणि खरंच आज शाळेत येताना आम्हाला हे पिल्लू दिसले'. बाईंनी जखमी पिलाकडे पाहिले. परत मुले म्हणू लागली, ‘बाई, तुम्ही म्हणाला तसंच झालं.' बाईंनी शांतपणे सर्वांचं म्हणणं ऐकून घेतले आणि त्या म्हणाल्या, ‘आता काल तुम्ही जे-जे सांगितलं ते सगळं करा. मग मुलांची धांदल सुरू झाली.  आपण काय म्हटलं त्याप्रमाणे प्रत्येक मूल कृती करू लागले. कोणीतरी एक छोटी टोपली आणली. त्या टोपलीत आपला स्वतःचा रुमाल ठेवला. हळूहळू चार-पाच मुलांनी एकावर एक रुमालाच्या घड्या करून ठेवल्या. पिल्लासाठी छान गुबगुबीत गादी तयार केली. मग पिल्लाला त्या गादीवर अलगद ठेवले. मग कोणीतरी कापसाने पिलाच्या चोचीत थेंब थेंब पाणी सोडू लागले. काही मुलांनी आपला खाऊ पिल्लासाठी ठेवून दिला. कालच्या प्रत्येक कल्पना आज प्रत्यक्षात येत होत्या. तासभर पिल्लाची काळजी घेऊन झाली. बाईंनी कोणत्याच मुलाला हे करू नको, ते करू नको असे सांगितले नाही. पिल्लाच्या मायपोटी मुलं जे जे करू पाहत होती ते सारं मुलांना बाईंनी करू दिले. परीक्षेत येणारी अपूर्ण गोष्ट खऱ्या अर्थाने मुलांनी पूर्ण करून दाखवली याला किती मार्क द्यायचे हा विचार बाई करू लागल्या. मग मुलांनी नकळत उंच ठिकाणी पिल्लाला ठेवले आणि शाळेच्या नेहमीच्या उपक्रमांना सुरुवात झाली. दिवसभर पुन्हा एकदा आनंदात गेला. संध्याकाळ झाली. शाळा सुटण्याची घंटा वाजली. मुलांनी बाईंना विचारले, ‘बाई, उद्या पिल्लाला शाळेत आणायचे का?'  बाईंनी सांगितले, ‘आता त्याला घरी घेऊन जावा, एक-दोन दिवस त्याची काळजी घ्या आणि मग त्याला सोडून द्या, ते जाईल त्याच्या घरट्यात.'

कुणीतरी आनंदाने पिल्लाची टोपली हातात घेतली. टोपलीभोवती पुन्हा मुले जमली. प्रत्येकाचे हात टोपली घेण्यासाठी पुढे येऊ लागले, जणू प्रेमाच्या अन्‌ मायेच्या हजारो लाटा पिल्लाला कवेत घेऊ पहात होत्या. कालची कल्पना आणि आजचे वास्तव हातात हात घेऊन चालत होते. प्रथम सत्राच्या मराठी विषयाच्या परीक्षेची पूर्वतयारी झाली. हळुहळु मुलं पिल्लासोबत घराकडे जाऊ लागली. बाई मुलांकडे पहात होत्या, मनात म्हणत होत्या, आता असा कोणताच प्रश्न नाही की जो माझी मुलं सोडवू शकणार नाहीत.
-अमर घाटगे 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

निष्काम भक्तीने भगवंताचा अनुभव येतो