निष्काम भक्तीने भगवंताचा अनुभव येतो

भगवंताचे भजन जेव्हा निष्कामपणे होते तेव्हा चित्तशुध्दी होते. शुद्ध चित्तातच भगवंताचा प्रवेश होतो. भगवंत प्रत्येक चराचरात असतोच, फक्त शुद्ध चित्तात तो प्रकट होतो, अनुभवास येतो. त्याच्या आनंदस्वरूपाची प्रचिती येते.

नको वासना वीषई वृत्तिरुपे।
पदार्थी जडे कामना पूर्वपापे।
सदा राम निःकाम चिंतीत जावा।
मना कल्पनालेश तो ही नसावा । श्रीराम५८।

वैराग्य हेच परमार्थाचे सार आहे हे समर्थांनी सांगितले. परमार्थ म्हणजे जे ‘परम आहे, सर्वश्रेष्ठ आहे, ते जाणून घेणे. त्या तत्वाशी एकरुप होणे. ते जाणून घेण्याचा एक मार्ग आहे भक्ती. भगवंताची अनन्य भक्ती आपल्याजीवनात समाधान आणि सार्थकता देते. भक्ती परिपूर्ण होण्यासाठी काही पायऱ्या आहेत. सर्वात आधी भाव हवा. भगवंत आहे आणि तो मला हवा आहे, त्याची भेट हवी आहे असे मनापासून वाटले पाहिजे. प्रपंचातील अडचणी संपून सुख लाभावे यासाठी भगवंताचा आसरा नको, तर त्याच्या प्रेमासाठीच तो हवा असे वाटणे ही दुसरी पायरी. भगवंताशिवाय अन्य काही नकोच, फक्त तोच हवा ही तिसरी पायरी.

भगवंतच सर्वत्र, सर्वांभूती आहे, त्याच्याशिवाय अन्य काही नाहीच, ”मी” ही नाही हे आत्मनिवेदन ही अंतिम पायरी. हे साधण्यासाठी मनात फक्त भगवंताचा विचार हवा. इतर सर्व विचार, इच्छा, कल्पना संपायला हव्यात. आपली ज्ञानेंद्रिये या विविधरंगी, विविधरुपी जगातील शब्द, स्पर्श, रुप, रस, गंधरुपी सुखे ग्रहण करत असतात. सुखाच्या अनुभवातून असे अधिक सुख हवे आणि दुःखाच्या अनुभवातून असे अधिक दुःख नको ही वासना वाढत जाते. अमुक मिळाले, अमुक झाले तर सुख होईल, नाही तर दुःख होईल ह्या कल्पनेतूनच वासनेचा जन्म होतो.सुखाच्या अनुभवासाठी काही मिळाले पाहिजे असे वाटणे ही वासना. हे मिळालेच पाहिजे असे तीव्रतेने वाटणे ही कामना. पूर्वीच्या पापांमुळे नाशवंत पदार्थावर कामना जडते. पूर्व जन्मातील किंवा पूर्व काळातील चुकीच्या वर्तनामुळे वासना अपूर्ण राहिलेल्या असतात. त्यांचा जोर असतो. त्यामुळेच पदार्थावर, वस्तू, व्यक्ती यावर कामना जडते. कामना पूर्ण झाली तर तेवढ्यापुरते समाधान होते, पण नाही पूर्ण झाली तर दुःख होते. ते दुःख दूर व्हावे या कल्पनेतून पुन्हा नवी वासना उत्पन्न होते. हे चक्र आपल्याला जन्म-मरणात बांधून टाकते.

यावर उपाय सांगताना समर्थ म्हणतात, विषयांची म्हणजे जगातील पदार्थांची वासनाच नाहीशी करावी. ती जिथून जन्म घेते ती कल्पनाच मनातून समूळ नष्ट करावी. कल्पनेचा किंचितही अंश मनात राहू देऊ नये. पण मन तर कल्पनेशिवाय, विचारांच्या तरंगांशिवाय राहू शकत नाही. म्हणून चंचल मनाला रामाच्या चिंतनात गुंतवून टाकावे. मात्र हे चिंतन शुध्द  असावे.  अर्थात्‌ निष्काम असावे. या जगातील काही हवे, नको यासाठी नसावे. जगातील पदार्थांविषयी कोणत्याही प्रकारची इच्छा नसणे यालाच वैराग्य म्हणतात. काही हवेसे वाटणे ही जशी इच्छा आहे; तसेच काही नकोसे वाटणे हीदेखील इच्छाच आहे. काही मिळाले तरी ठीक, नाही मिळाले तरी ठीक अशी अखंड समाधानाची स्थिती राखता येणे म्हणजे वैराग्य. असे व्हावे, असे न व्हावे असे काहीही न वाटता, जे होईल ती सर्व भगवंताची इच्छा मानून सर्व परिस्थितीत मनाचे समाधान कायम राहणे यालाच उदासीनता म्हणतात. आपल्या जीवनात जे जे घडते आहे त्याकडे अलिप्तपणे पाहता येणे, मनात कोणतेही राग-द्वेषाचे तरंग-वृत्ती उफाळून येऊ न देणे, सर्व परिस्थितीत मनःस्थिती ‘सम ठेवता येणे ही उदासीनता आहे. त्यासाठी अभ्यास लागतो. साधना लागते. कामना विचारपूर्वक, प्रयत्नपूर्वक कमी करता येतात. जगाबद्दलच्या कामना हळूहळू जगदीशाकडे वळवता येतात. अखंड सरावानेहे शक्य होते. सुरवातीला सकाम असलेले भगवंताचे भजन जेव्हा दृढ उपासनेने निष्कामपणे होते तेव्हा चित्तशुध्दी होते.शुद्ध चित्तात भगवंताचा प्रवेश होतो. भगवंत प्रत्येक चराचरात आहेच. फक्त शुद्ध चित्तात तोप्रकट होतो. अनुभवाला येतो. त्याच्या आनंदस्वरूपाची प्रचिती येते. आपल्याला सतत येणारा दुःखाचा, असमाधानाचा अनुभव थांबतो. कारण दुःख मूळ असलेल्या अपेक्षा संपतात. आता आनंदाच्या शोधात आपले मन बाह्य जगात धावत नाही. आपल्या अंतरात असलेल्या पूर्ण आनंदाचा शोध लागल्याने ते त्या आनंदात स्थिर होते. आपले स्वरूप जाणून त्याच्याशी तदाकार होणे, वेगळेपणाने न उरणे हेच आत्मनिवेदन आहे. भक्तीची आणि ज्ञानाची परिपूर्णता आहे. मनुष्य जन्माचे सार्थक आहे.
जय जय रघुवीर समर्थ  - सौ. आसावरी भोईर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

शतायुष्याच्या वाटेवरी