सेवानिवृत्ती व त्यानंतरचे ताणविरहित जीवन जगायचे असल्यास...!

आज सुरक्षित नोकरी करणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांना वयाच्या ५०/६०/६५ नंतरचा काळ आनंदात घालवायचा असेल तर त्यासाठी १२ नियम तयार केले आहेत. हे नियम तयार करत असताना अनेक मंडळीची मदत झाली आहे. यातील काही नियम आपल्याला ठाऊक असतील. काही नवीन असतील. तर काही नियम कशाला महत्व द्यावे हे सांगणारे असतील. हे नियम सगळ्यांनीच नीट वाचावेत, लक्षात ठेवावेत व आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा.

गेले अनेक दिवस मी आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनाची बातमी लिहून घेण्यासाठी जात आहे. त्यात माझा बातमीदार, पत्रकार कमी आणि असंघटीत कामगार नेता म्हणून जास्त फायदा होणार आहे. कारण संघटीत क्षेत्रातील कामगारांचे नेतृत्व करणाऱ्या ट्रेड युनियनच्या नेत्यांनी कामगार कर्मचाऱ्याच्या शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींचा विचारच केला नाही. त्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बापाच्या जागेवर बापाच्याच कंपनीत नोकरी मिळेल ही अपेक्षा होती, तीच आज संपविण्यात आली. विषमतावादी राजकीय पक्षांच्या ट्रेड युनियनच्या ध्येय, उद्दीष्ट आणि धोरणाने भांडलवदारांच्या कंत्राटी पद्धतीचा स्वीकार केला. त्यामुळेच आज अनेक सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी आपल्या मुलांना कंत्राटी नोकरी असल्यामुळे सरकारच्या ध्येय धोरणाला दोष देतात. पण त्याला आपण आपली ट्रेड युनियन त्याचा राजकीय पक्ष जबाबदार आहेत हे विसरतात. टाटा पॉवर कंपनीच्या कर्मचारी अधिकारी यांना सेवानिवृत्त एक वर्ष सहा महीने पूर्वी आपली मिळणारी रक्कम अनाठायी खर्च न करता ती सुरक्षित कशी करावी याचे प्रशिक्षण देत असते. टाटा पॉवर कंपनीच्या सेवानिवृत्त ग्रुपवर एका मित्राने हा लेख टाकला आणि जास्तीत जास्त शेयर करायला सांगीतले. तेव्हा एका मित्राने कॉल करुन सूचना केली की  भविष्यात कंत्राटी कामगारांना पेन्शन तर मिळणारच नाही. मग या सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी अधिकारी यांच्या रक्कमेची गुंतवणूक सुरक्षित कशी करावी, भावनिक होऊन मुलांना देऊन टाकल्यावर त्यांनी कसे जगावे यावर उपाय सुचवणारा लेख लिहावा. म्हणून हा प्रपंच!

१) तुम्ही आत्तापर्यंत कष्ट, मेहनत व काटकसर करून जे काही पैसे वाचवले आहेत किंवा गाठी मारले आहेत; त्याचा उपभोग घेण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. है पैसे मुलाबाळांसाठी, नातवंडांसाठी मागे ठेवण्याएवढा दुसरा मोठा धोका नाही. कारण यांना तुम्ही हा पैसा गोळा करण्यासाठी किती कष्ट घेतले आहेत याची काहीच किंमत किंवा जाणीव नसते. ते तुमच्या संपती वर जन्म सिद्ध हक्क अधिकार सांगतील. हे विसरू नका.म्हणुनच ही धोक्याची सूचनाः- ही वेळ कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीसाठी पण योग्य नाही. मग गुंतवणूकीची योजना कितीही भव्यदिव्य,आकर्षक किंवा ‘फुल प्रुफ' असो. त्यामूळे कदाचीत तुमच्या समस्या व टेन्शन्स वाढायची शक्यता आहे. तुम्हाला टेन्शनविरहीत व शांतपणे आयुष्य जगायचे आहे हे विसरू नका. त्यामूळे या वयात गुंतवणुक करू नये.

२) तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या किंवा नातवंडांच्या आर्थिक परिस्थितीची अजीबात चिंता करू नका. तुमचे पैसे स्वतःसाठी खर्च करायला मुळीच कमीपणा मानू नका. तुम्ही तुमच्या मुलाबाळांना इतकी वर्षे संभाळले, त्यांना अन्न-वस्त्र-निवारा दिलात. चांगले शिक्षण दिलेत. आता त्यांना लागणारे पैसे त्यांना कमवू द्यावेत. त्याला घेणारा बनवू नका तर देणारा बनवा. त्याला कोणताही धंदा करण्यासाठी तयार करा. अन्यथा तो कंत्राटी कामगार आहे. त्यांचे कसे भागेल याचा विचार तूम्ही करायचा नाही. तो विचार त्या नवरा बायकोना करू देऊन काटकसर करायची सवय लागु द्या.

३) आपले आरोग्य चांगले कसे राहील याची काळजी घेत चला. यासाठी झेपेल एवढाच व्यायाम नियमीतपणे करा. उगीचच्या उगीच जिमला जाणे, तासन्‌तास पळणे, तासन्‌तास योगासने करणे किंवा प्राणायाम करणे यासाखे अघोरी व्यायाम करू नका. चांगले खा, भरपूर झोप काढा. नियमीतपणे वैद्यकीय तपासणी करून घेत चला व आपल्या डॉक्टरच्या संपर्कात रहा. तसेच आपल्याला लागणारी नियमीत औषधे सतत जवळ बाळगत चला. कारण नसताना डॉक्टर्सच्या जाळ्यात अडकू नका किंवा औषधांच्या व्यसनात गुरफटू नका. निसर्गाच्या सानिध्यात राहून निरोगी राहण्यासाठी महीना दोन महिन्यात चार पाच दिवस चांगल्या पर्यटन स्थळाला भेट देऊन आनंद उपभोगा.

४) तुमच्या जोडीदाराची काळजी घेत चला. त्यांच्यासाठी उत्तमोत्तम वस्तु व प्रेझेन्ट्‌स आणत जा. कारण एक ना एक दिवस तुमच्यातील एकजण आधी जाणार आहे याची जाणीव ठेवा. हाती असलेला पैसा दोघांनी मिळून इन्जॉय करा. कारण एकट्याने पैसा इन्जॉय करणे कठीण असते. ज्या वयात प्रेमात आनंदाचा उपभोग घ्यायचा होता. तेव्हा नोकरी करून मुलांचे शिक्षण पूर्ण करण्याची घर घेण्याची आवश्यकता व जबाबदारी पार पाडणे महत्वाची होती. आता ती संपली म्हणूनच दोघांनी एकमेकांना सांभाळून आनंदाचा उपभोग घ्यावा.

५) छोट्या छोट्या गोष्टींवरून उगीच डोक्याला त्रास करून घेऊ नका. तुम्ही आयुष्यात पुष्कळ उन्हाळे पावसाळे बघीतले आहेत. तुमच्या मनात काही सुखी आठवणी आहेत तर काही दुःखी, मनाला यातना देणाऱ्या आठवणी पण आहेत. पण लक्षात ठेवा,तुमचा ‘आज' सर्वात महत्वाचा आहे.त्यामूळे भूतकाळातील वाईट आठवणींमूळे,तसेच भविष्यकाळातील चिंतेमुळे तुमचा ‘आज' खराब होऊ देऊ नका. छोट्या छोट्या गोष्टी आपोआप सरळ होतील.

६) तुमचे वय काहीही असो, प्रेम करायला शिका. तुमचा जोडीदार, तुमचे कुटुंब,तुमचे शेजारी, तुमचे कंपनीतील, कॉलेज मधील मित्र मैत्रीणी त्यांच्यावर प्रेम करायला लागा. जुने रुसवे फुगवे सोडून द्या. आज लक्षात ठेवा. जोपर्यंत माणसाची बुद्धी शाबूत असते व मनात प्रेमाचा ओलावा असतो तोपर्यंत माणूस वृद्ध होत नसतो. म्हणुनच मन तरूण व तंदुरुस्त ठेवा.

७) स्वतःविषयी अभीमान बाळगा. तो अंतरबाह्य असुदे. वेळच्या वेळी कटींग सलूनमध्ये जाऊन केस कापून घ्या. डेन्टिस्टकडे जा. आवडत्या पावडरी, पर्फ्युम्स वापरायला संकोच करू नका. कपडे निटनेटके ठेवा. बाहेरून तुम्ही जितके चांगले रहाल तेवढे आतून समाधानी असाल, हे लक्षात ठेवा. लोकं काय म्हणतील हे विसरून जा, त्याकडे पाठ फिरवा.

८) तुम्हाला फॅशन करायची असेल तर खुशाल करा. वृद्ध मंडळीसाठी नवीन फॅशन्स काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही थोडे फॅशनेबल राहिलात तर तरुणांना सुद्धा आवडाल. कला कौशल्य, गीतगायन, वादन, नृत्य स्पर्धा, कविता, शेर शायरी जे आवडत असेल ते मनसोक्तपणे करा, त्यासाठी लाजू नका.

९) आपले ज्ञान व माहिती अद्ययावत ठेवा.वर्तमानपत्रे वाचत जा. टि.व्ही.वरील बातम्या बघत जा. सोशल नेटवर्कींग साइटचे सभासद व्हा. तुम्हाला कदाचीत तुमचे जुने मित्र किंवा मैत्रीणी परत भेटतील. संपर्कात रहा. त्यांच्या स्वभावाच्या अनुभवाच्या चांगल्या वाईट गोष्टी लिहून काढा. त्यात पण मोठा आनंद आहे.

१०) तरुणांचा व त्यांच्या मतांचा आदर करा. कदाचीत तुमच्या व त्यांच्या विचारात फरक असू शकेल. पण तेच उद्याचे भविष्य आहेत. त्यांना सल्ला द्या, मार्गदर्शन करा आणि तेसुद्धा त्यांनी मागीतले तरच; उगीचच्या उगीच त्यांचेवर टिका करू नका किंवा त्यांचे दोष काढत बसू नका. कालच्या शहाणपणाला आजच्या जगातही तेवढेच महत्व आहे याची त्यांना जाणीव करून देत चला. आम्ही खूप उन्हाळे पावसाळे पाहिले हे कोणाला सांगु नका, तुम्ही कोण होता हे सांगु नका, आज काय आहात तेच सांगा आणि वागा.

११) ‘आमच्या वेळी असे होते, आमच्यावेळी तसे होते' असे शब्दप्रयोग अजीबात करू नका. कारण तुमची वेळ आत्ताची आहे, कालची नव्हे. त्यामळे काल काय घडले हे सतत तोंडावर फेकून मारत जाऊ नका. आत्ताचे आयुष्य आनंदात कसे घालवायचे याचा विचार करून आचरण करावे. तर सुखी आनंदी राहाल व इतरांना ठेवाल.

१२) बहुतेक मंडळी वृद्धत्व आले म्हणून रडत बसतात. फारच थोडी मंडळी वृद्धत्वाचा आनंदाने स्विकार करतात. आयुष्य फार छोटे आहे. त्यामूळे असे करू नका. नेहमी आनंदी लोकांच्या संगतीत रहाण्याचा प्रयत्न करा. त्यामूळे तुम्हालाही आनंद वाटेल. निराश, दुःखी, रड्या लोकांपासून दूर रहा. लक्षात ठेवा दुःखी व रडी माणसे कोणालाच आवडत नसतात. आनंदी व सकारात्मक विचारांची माणसेच लोकांना आवडत असतात. मी नेहमी कामगार,कर्मचारी अधिकारी यांचे आजचे जगणे पाहतो. मला त्यांच्याशी बोलायला आवडते. पहिला प्रश्न असतो. मुलंमुली किती आणि काय करतात. हीच खरी बोलण्याची सुरवात असते. त्यातुन चांगले वाटले विचारांची घेवाण देवाण होते. त्यांचे संकलन करून लेख तयार करतो. तोच वाचकांसमोर ठेवतो. आवडला तर त्यावर आपली परखड प्रतिक्रिया व्यक्त करा.
-सागर रामभाऊ तायडे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

परीक्षेची पूर्वतयारी