साहित्यातून महिला सक्षमीकरण
पाण्याने काठोकाठ भरलेले पातेले जेव्हा आपण गॅसवर उकळायला ठेवतो तेव्हा त्या ज्वालांनी गरम वाफेने ते ओसंडून वाहू लागते. त्या तप्त वाफा म्हणजे एक प्रकारे स्त्रीयांची आतली घुसमटच ती कुठून तरी बाहेर पडणारच होती. मग ती थेट मुखातून न प्रामाणिक विचार तरूणपिढी पुढे मांडून त्यांना स्त्री जाणीवेविषयीचे महत्व सांगू व ते वृत्तीतून कृतीत घडवू तेव्हाच अपेक्षित बदल समाजात होऊ शकतो.
नारी अस्य समाजस्य कुशल वास्तुकारा
अस्ति या श्लोकाचा अर्थ विचारात घेता नारी ही खरी समाजाचा शिल्पकार आहे असे असताना नारीशक्ती, महिला सक्षमीकरण, महिला समान अधिकार यासारख्या शब्दांची गरज का पडावी, त्याची उत्पत्ती का व कशासाठी झाली ? हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. कारण मुळातच ती आदिशक्ती, संहारिणी, सहचारिणी,अर्धांगिनी अशा दुर्गेच्या रूपात आपण तिला बघतो. देवाधिदेव महादेव हे पवित्र गंगेला आपल्या शिरावर स्थान देतात किती मोठा मान आहे हा आणि आपल्या अविचारी समाजात नवविवाहित सौभाग्यवतीला म्हणतात...जास्त बडबड करू नको डोक्यावर बसायचं नाही. तसेच भगवान विष्णू यांनी सृष्टी संपन्न करणाऱ्या लक्ष्मी मातेला हृदयात स्थान दिले त्या अनुषंगाने विचार केला तर स्त्रियांना मान हा देव देवतांपासून दिला जात आहे हे प्रकर्षाने दिसून येते. काळ बदलत गेला तसा लोकांचा विचार करण्याचा दृष्टिकोनही बदलला. स्त्री पुढे गेली तर तिचेच वर्चस्व राहील मग आपल्या अधिकार व मताचे काय? हा प्रश्न समाजापुढे उभा राहिला त्यांच्या पौरुषत्वाला धक्का बसेल की काय ही भिती वाटू लागली आणि तिथून पुढे समाजात पुरुषसत्ताकाला प्रारंभ झाला.
पुरुषसत्ताक वर्चस्व असलेला समाज हा तिला अबला, अविचारी कमजोर, दुर्बल घटक अशा नजरेने बघत असे.अर्थात हे प्रमाण जगात आजच्या काळात कुठे कमी जास्त प्रमाणात आहे इतकचं! परंतु या सर्वांचा तिच्या तनामनावर भयंकर परिणाम झाला.अशावेळी तिच्यातील स्व ला धक्का पोहोचला. ती माझे अस्तित्व कुठे आहे, मी कुठे कमी पडते की काय या चक्रात अडकली. ती आपल्याच कोषात जगत राहिली. चार भिंतीतच तिचे जग अशी परिस्थिती निर्माण झाली.
पाण्याने काठोकाठ भरलेले पातेले जेव्हा आपण गॅस वर उकळायला ठेवतो तेव्हा त्या ज्वालांनी गरम वाफेने ते ओसंडून वाहू लागते. त्या तप्त वाफा म्हणजे एक प्रकारे स्त्रीयांची आतली घुसमटच ती कुठून तरी बाहेर पडणारच होती मग ती थेट मुखातून न बोलता तिच्या मनातले द्वंद्व कागदावर लिहून मांडू लागली. तसेही भारतीय स्त्री ही जनात न बोलता मनात खूप बोलते असे म्हणतात. तिच्या मनातले भाव,राग, किंवा तिचे अन्यायाविरुद्ध असणारे विचार अनेक ओव्या, भारूड लेख, कथेतून, कादंबरीतून, तिने मांडले याची अनेक उदाहरणे आहे. अगदी प्राचीन काळाचा विचार केला तर लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी, अपाला यादेखील अपार ज्ञानी होत्या त्या स्वतः पंडिता तर होत्याच; परंतु लेखन, वक्तृत्वात प्रविण होत्या. आपल्या स्वकर्तृत्वाने त्यांनी जनमानसात ठसा उमटवला होता.
महादंबा, मुक्ताबाई व जनाबाई यांनी ओव्या लिहून अनिष्ट रूढी परंपरेचा पगडा असणाऱ्या समाजात जनजागृती केली. महादंबेने गर्भकांड ओव्या लिहून अध्यात्म लेखनातून प्रबोधन केले.ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना ग्रंथात पुरुषसत्ताक समाज व्यवस्थेत स्त्रियांच्या शोषणाविरुद्ध लिहून सैद्धांतिक मांडणी केली. त्या काळात स्त्रियांना आपले मत मांडण्याचा अधिकार नव्हता. स्त्रियांचे प्रचंड शोषण होत असे. अशा परिस्थितीत त्यांनी साहित्यातून समाजाला योग्य दिशा दाखवली हे खूप गौरवास्पद आहे. तसेच रमाबाई रानडे लक्ष्मीबाई टिळक, सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांवरील अन्याय, त्यांच्या वेदना यांना वाचा फोडली त्यांच्या स्त्रीवादी आत्मकथनांनी साहित्यात मोलाची भर घातली. त्यानंतर मध्ये सुनिता देशपांडे यांचे ‘आहे मनोहर तरी' व कमल पाध्ये यांचे ‘बंध अनुबंध' इत्यादी उल्लेखनीय साहित्य आहे आणि दलित साहित्यात देखील स्त्रियांचा मोलाचा वाटा आहे. बेबी कांबळे यांचे ‘जिने आमचे', उर्मिला पवार ‘आयदान' सिंधुताई सपकाळ ‘मी वनवासी' या सर्वांनी स्वतः भोगलेले दुःख, अन्याय व तसेच दलित स्त्रियांवर झालेले अत्याचार आदी व्यथा परखडपणे मांडल्या आहे.
तसेच ताराबाई भवाळकर यांनी लोकसाहित्यातून स्त्री प्रतिमेचे दर्शन घडवले आहे. ‘लोकपरंपरा आणि स्त्री प्रतिमा' हे त्यांचे पुस्तक गाढ्या अभ्यासाचा पुरावाच आहे. एक दुसऱ्या बाजूने विचार केला तर स्त्रीयांनी आपल्या गुलामगिरीतून मुक्त व्हावे. शिक्षित व्हावे असे पुरुषांना देखील वाटत होते. त्याची अनेक उदाहरणे देखील आहे.जसे की, अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले, रमाबाई , आनंदीबाई जोशी आदींना त्यांच्या पतींनी भक्कम साथ देऊन त्यांना शिक्षित केले.त्या काळात डोळ्यांवर अंधश्रद्धेची पट्टी बांधलेल्या समाजाच्या डोळ्यात अंजन घालून आपल्या लेखणीतून, चर्चेतून, मार्गदर्शनातून स्त्रीयांना जागृत केले. आत्ताच्या अरूणा ढेरे, पद्मा गोळे, नीरजा आदी कवयित्री व लेखिका देखील साहित्यातून आपले प्रगल्भ विचार मांडत असतात. काळ जसा बदलला तसे वैचारिक लेखन, प्रबोधन चर्चा यामध्ये अमुलाग्र बदल होत गेले. पुढे यांच्या लेखणीतून निर्मिती होणाऱ्या कथा ,कादंबऱ्या, काव्यसंग्रह,ग्रंथ निर्मिती यांना प्रोत्साहन देऊन प्रेरित करायचे का आडकाठी निर्मित करून ते डावलायचे हा मुद्दा देखील जोर धरू लागला. आजही काही स्त्रियांच्या परखड मतांवर, मार्मिक लेखनावर मागचा पुढचा विचार न करता टीकास्त्र सोडले जाते. यातूनच पुढे महिला सक्षमीकरण या विषयाला धुमारे फुटले व तो चर्चेचा, वादविवादाचा विषय झाला. त्या त्या दिवसापुरते याला महत्व दिले जाते. नंतर तो विषय बाजूला रहातो. आता तर अनेक कायदे सुव्यवस्था, आरक्षण स्त्रीयांसाठी तयार झाले आहे. अनेक साहित्यातून हे वाचायला मिळते. परंतु आजही पूर्णपणे महिला सक्षमीकरण झाले आहे असे म्हणता येणार नाही. अजूनही भारतातील बऱ्याच राज्यात स्त्री शिक्षित नाही.ती आर्थिक, वैचारिकदृष्ट्या सक्षम नाही .तसेच कुटुंबात एखाद्या निर्णय घ्यायचा असेल तर ती घेऊ शकत नाही. ते स्वातंत्र्य तिला नाही.ती घरातल्या इतर सदस्यांवर अवलंबून असते. मुलगी जन्माला येताच मुलगा मुलगी हा भेदभाव देखील अनेक कुटुंबात दिसून येतो. हे थांबायला हवे आहे. तिला शैक्षणिक अधिकार, तिचे करियर बाबत अधिकार याविषयी तिच्या मतांना महत्त्व देऊन स्वातंत्र्य द्यायला हवे. यावर देखील साहित्यातून अनेक विचार लेखक लेखिका मांडत असतात. परंतु ते लोकांपर्यंत पोहोचायला हवे. त्यासाठी आजकाल सोशल मिडिया हे एक प्रभावी माध्यम आहे. फक्त त्याचा योग्य वापर करायला हवा. पथनाट्य लेखन, एकांकिका, नाटक याद्वारे विचार मांडू शकतो.
फ्रेंच स्त्रीवादी लेखिका सीमॉन द बोव्हार यांनी स्त्रीवादी जाणिवेचे, प्रतिमेचे वेगवेगळे पदर आपल्या दमदार लेखणीतून उलगडले आहेत. स्त्री-पुरुष विषमतेचे भान येणे ही जाणीवेची प्रथम अवस्था पुरुष रचित स्त्रीत्वाच्या कल्पनेला नकार देणे ही दुसरी अवस्था तर स्त्री-पुरुष समतेच्या तत्वावर आधारित नव समाजाची निर्मिती ही तिसरी अवस्था या तिन्ही अवस्थांचे अविष्कार वाड्मय साहित्य काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आढळून येते. यातील तिसरा मुद्दा हा आजच्या पिढीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा वाटतो. नवसमाज निर्मिती तेव्हाच होईल जेव्हा आपण आपले स्त्री स्वातंत्र्य, सशक्तीकरण हे परखड प्रामाणिक विचार तरूणपिढी पुढे मांडून त्यांना स्त्रीजाणीवेविषयीचे महत्व सांगू व ते वृत्तीतून कृतीत घडवू तेव्हाच अपेक्षित बदल समाजात होऊ शकतो. अन्यथा ‘ये रे माझ्या मागल्या' याप्रमाणे जे पूर्वापार चालत आले आहे. ते इतके खोलवर रूजले आहे की त्याची पाळेमुळे खणून काढली तरी ती मुळं डोके वर काढतील व त्यांना अंकुर फुटेल. त्यामुळे मुळावरच घाव घालूया त्यासाठी ज्वलंत लेखणी हाती घ्यावी; जाज्वल्य विचार लोकांच्या मनावर बिंबवले तर ते पिढी दर पिढी जनमानसात जिवंत रहातील यात तिळमात्र शंका नाही. शेवटी साहित्य म्हणजे सर्वांचे हित ज्यात आहे ते म्हणजे साहित्य अशा साहित्यातून आपण महिलांविषयीचे हित हितचिंतक म्हणून मांडले तर सक्षमीकरणाचे बीज हे शंभर टक्के रूजणार व सशक्त रोपे उगवणार!
म्हणतात नं...शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी विचार व हेतू शुद्ध असेल तर ही फळे भावी पिढी नक्की चाखणार व हे वारसाचक्र पुढे अविरत फिरत रहाणार.
- कल्पना देशमुख