आठवणींची पेटी : दृष्टी

जोशी काकांबरोबर आम्ही ट्रीपला जात असु. काका एकदम वेगळेच होते. दरवेळेस जी  प्रसिद्ध ठिकाणं दाखवणार आहेत ती दाखवायचेच... पण त्याच्या पलीकडचं असं काहीतरी आम्हाला दाखवायचे. मला तर तेच जास्त आवडायचे... आता मी घरी गॅलरीत ऊभी होते...आणि हे आज आठवले.....काय, कुठे आणि कसं बघायचं हे सांगणारे जोशी काका आठवले.....विचार करता करता लक्षात आलं की जरा बाहेर बघितलं तर हे पसरलेलं सुखाचं चांदणं दिसेल....पण आम्ही ते बघतच नाही...

असेच एकदा  काकांबरोबर दोन दिवसांच्या ट्रिपला गेलो होतो. प्रवास सुरू झाला. दीड तास झाल्यानंतर काकांनी मध्येच गाडी थांबवायला सांगितली. काका म्हणाले.. ‘शेतातल्या पायवाटेने थोडं तुम्हाला  चालावं लागेल. चला ... जरा वेगळी गंमत दाखवतो...तुम्ही कधी पाहिली नसेल....'

थोडं पुढे गेलो लांबूनच झाडं  दिसायला लागली....कशाची आहेत ते ओळखायला येईना...जवळ जाऊन बघितलं तर तिथे डोंगरी आवळ्यांची असंख्य झाडं तिथे होती. झाडावर आवळ्यांचे अक्षरशः घोसच्या घोस लगडलेले होते. टपोरे फिकट  हिरवटसर आवळे इतके सुंदर दिसत होते...त्यांचा मंद मधुर वास आसमंतात पसरला होता...वाऱ्याबरोबर दरवळत होता...बघताना खूप मजा वाटत होती...दृष्टीसुख घेत कितीतरी वेळ आम्ही उभे होतो....अशी आवळ्यांची शेती आम्ही प्रथमच बघितली. नंतर काकांनी सांगितले की आयुर्वेदीक औषध बनवण्यासाठी हे सगळे आवळे नेले जातात. ते टपोरे आवळे ती झाडं अजूनही स्मरणात आहेत....

काकांनी हे एक निराळंच आम्हाला दाखवलं. काका म्हणाले, ‘आपण  ज्या झाडाखाली उभे आहोत ते झाड कशाचे आहे माहित आहे का ?' आम्हाला  ओळखता येईना. मग काकांनी सांगितले..‘हा कदंब वृक्ष आहे. या वृक्षाची काय बरं माहिती आहे कोणाला?'

आम्हाला कोणाला काही माहिती नव्हती. कदंब वृक्षाचा संबंध कृष्णाशी आहे हे मात्र माहीत होते. काकांनी त्या वृक्षाची पूर्ण माहिती दिली. झाडाची रचना कशी आहे ..श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी त्याच्यावर कसे बसत असतील याचे रसभरीत वर्णन काकांनी केले. काकांनी विचारले की ‘कोणाला श्रीकृष्ण अष्टकम्‌' येते का ?
बहीण, मी आणि अजून दोघीजणी पुढे आलो. काका म्हणाले ‘चला हात जोडा आपण म्हणू या.'

त्या कदंब वृक्षाखाली  उभं राहून आम्ही
‘भजे व्रजेक मंडनम्‌
समस्त पाप खंण्डनम्‌
स्वभक्त चित्तरंजनम्‌
सदैव नंद नंदनम्‌'
हे श्रीकृष्ण अष्टकम्‌ म्हटले.

आताही घरी म्हणताना तो वृक्ष आणि काका आठवतात...
तिथुन निघालो ..काका म्हणाले.. ‘रात्री पण एक तुम्हाला गंमत दाखवणार आहे.....' आता रात्री काय काका दाखवणार आहेत याची मला उत्सुकता लागली. दिवसभर आम्ही काही काही पाहत होतो....‘आपण एका छोट्या खेड्यात रात्री राहणार आहोत' असं त्यांनी आधीच सांगितलं होतं. तिथे आटोपशीर  छान छोट्या छोट्या खोल्या होत्या. साधंसं चवदार जेवण झालं .आता रूमवर जायचं झोपायचं असं वाटलं....तर काका म्हणाले..‘चला आता गंमत बघायला. इतक्या रात्री त्या खेड्यात काय बघायचं?'
निघालो...

गाडी पुढे गेली. नुसता अंधार आणि अंधारच होता.. तिथे  अंधारात काय बघायचं? पुढे काय असेल ? आम्हाला कोणाला काहीच कल्पना येईना....आमचे तर्क सुरू झाले..काजवे...कोणीतरी म्हटलं..या दिवसात नाही दिसत. आदिवासींचा नाच.....ईथे कुठले आदिवासी...काका भूत तर नाही ना?

कसलाच अंदाज येई ना....नाही म्हटलं तरी  मनात भीती दाटून आली.....काका शांतच होते. आमच्या कोणत्याच प्रश्नांना ते उत्तर देत नव्हते..एका जुनाट मोठ्या पडक्या अशा देवळासमोर गाडी थांबली. गाडीच्या लाईटच्या उजेडात आम्हाला दिसले... समोर लांबलचक मोठ्या पायऱ्या होत्या. काकांनी आम्हाला त्या पायऱ्यांवर बसायला सांगितले. काकांच्या हातात मोठा टॉर्च होता. काकांनी तो बंद केला. गाडीचा लाईटही बंद झाला होता. पूर्ण अंधार होता....

आता इथे काय पाहायचं...? काका म्हणाले ‘आकाश..'
आकाशात काय बघायचे?
आम्ही वर बघायला लागलो..
शहराच्या उजेडात कधी न बघायला मिळालेले आकाश आम्हाला दिसले...

असंख्य चांदण्यांनी भरलेले .....त्या गडद अंधारात चांदण्या स्पष्ट दिसत होत्या. चंद्र आणि शुक्राची चांदणी गोड दिसत होती...सप्तर्षी दिसले ...खूप वर्षानंतर आम्ही ते बघीतले....निसर्गाचं एक अलौकिक असं रूप आम्हाला दिसत होतं....आकाशात इतक्या चांदण्या असतात.....

अंधारात डोळे जरा सरावले. काका म्हणाले..‘जरा ईकडे तिकडे बघा' तेव्हा लक्षात आलं की आमच्या आसपास चांदणं पसरलेले आहे...त्या चांदण्याखाली आपण बसलेलो आहोत हे आम्ही अनुभवले.....सगळे निःशब्द झालो होतो....निरव शांतता ......असा चांदण्याचा अनुभव आम्ही आधी कधी घेतलाच नव्हता...अपार आनंद झाला होता....
मी घरी गॅलरीत ऊभी होते...आणि हे आज आठवले.....काय, कुठे आणि कसं बघायचं हे सांगणारे जोशी काका आठवले.....विचार करता करता लक्षात आलं की जरा बाहेर बघितलं तर हे पसरलेलं सुखाचं चांदणं दिसेल....पण आम्ही ते बघतच नाही...लांब लांब जाऊन काय काय पाहायच्या नादात हा हाताशी असलेला आभाळभर आनंद बघायचा राहूनच जातो का काय.....एक सांगू? बघा ना कधीतरी तुम्ही पण...तुमचं तुमचं आभाळ आताशा मी बघत असते चांदण्यांबरोबर अजूनही काही काही दिसते....कल्पनेच्या पलीकडलं...अदभुत असं....दरवेळेस काहीतरी मला वेगळंच दिसतं....कधीतरी वर आभाळात  गेलेले ही दिसतात... बोलता येत त्यांच्याशी.....मनातल्या मनात....आपलं सुखदुःख...सांगता येतं...आयुष्याच्या वळणावर असे जोशी काकांसारखे भेटले ...त्यांच्या अनुभवांनी, ज्ञानाने त्यांनी माझं आयुष्य अधिक समृद्ध केलं ...जगणं अधिक सुंदर झालं.....

 नुकताच कोजागिरी येऊन गेली.
काकांची आठवण आली ...|
रात्री आकाश...चंद्राच चांदणं तुम्हीही बघा हं....
-नीता चंद्रकांत कुलकर्णी 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

साहित्यातून महिला सक्षमीकरण