मुशाफिरी
स्मरणगाथा
मरे एक त्याचा
दुजा शोक वाहे
अकस्मात तोही
पुढे जात आहे
प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या ना त्या प्रकारे आपण आपला भवताल समृध्द करणाऱ्या व्यक्तीमत्वांशी जवळून-दुरुन, कळत-नकळत भावनात्मकरित्या जोडलेलो असतो. मग त्यांचे निधनाच्या वृत्ताने पोरकेपणाची भावना मनात दाटून येणे स्वाभाविक असते. कारण अशा लोकांचा मृत्यू हा अल्पांशाने आपलाही मृत्यू असतो. मला कळायला लागल्यासून मी टाटा हे नाव ऐकतोय, मराठी वर्तमानपत्रे वाचतोय आणि मराठी-हिंदी नाटक, मालिका, जाहिराती, चित्रपट बघतोय. तेंव्हा अशा क्षेत्रांतील मान्यवरांचे जाणे हे चटका लावून जाणारच!
जन्माला आलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस हे जग सोडून जायचे आहेच; जन्मापासूनचा त्याचा मृत्यूपर्यंतचा प्रवास कसा होता, तो कितीजणांच्या उपयोगी पडला, कुटुंब-समाज- राष्ट्रहितासाठी त्याने केले काय यावर त्या व्यक्तीचा जन्म सार्थकी लागला की वाया गेला याचे मूल्यमापन होत असते. तसे तर विक्रमी लांबलचक आयुष्य जगणारेही अनेकजण या पृथ्वीतलावर होते, आहेत, असतील. पण त्या प्रदीर्घ आयुष्याचे त्यांनी केले काय? आनंद जसा बाबु मोशायला सांगतो त्याप्रमाणे त्यांची ‘जिंदगी लंबी होती...की बडी' होती ते पाहावे लागते. मंगेश पाडगावकर म्हणतात त्याप्रमाणे ‘पायाखाली असून काटे असतो हासत जात कुणी, फुलासारखी उचलून घेतो काळोखाची रात कुणी' या धर्तीचे जीवन जगून इतरांचे जगणे समृध्द करणाऱ्या काही असामीही या जगात होऊन गेल्या आहेत.
ऐन नवरात्रीत आपण उद्योग रत्न श्री. रतन टाटा यांना गमावले. त्यापाठोपाठ पत्रकारितेत पूर्णवेळ कार्यरत असणाऱ्या पहिल्या महिला पत्रकार श्रीमती नीला वसंत उपाध्ये (पूर्वाश्रमीच्या निला जयराम पाटील..आगरी समाजाचे भाग्यविधाते स्व. नारायण नागू तथा आप्पासाहेब पाटील यांची नात) यांचे निधन झाले; त्याला काही दिवस होत नाही तोच चतुरस्त्र कलावंत अतुल परचुरे याने अखेरचा श्वास घेतला. ही तिन्ही नामी व्यक्तीमत्वं मुंबईकर असल्याने सुजाण, सुसंस्कृत, सुशिक्षित मराठीजनांत शोककळा पसरली नसती तरच नवल!
तो १९७० चा काळ असेल. माझी आत्या आनंदीबाई हिच्या यजमानांची बदली लोणावळा टाटा कॅम्पमधून कल्याणमधील नेतिवलीजवळच्या टाटा कॅम्पमध्ये झाली होती. लहानपणी कोणत्याही मोटारीवर TATA अशी अक्षरे दिसली की मी ती मोठ्याने वाचत असे. त्या टाटा कंपनीचे नेतृत्व जेआरडी किंवा नवल टाटा किंवा रतन टाटा यांच्याकडे असेल किंवा कसे हे कळण्याचे माझे वय नव्हते. पण ‘टाटा' नावाची मोहिनी माझ्यावर पार बालपणापासूनच आहे. टाटांच्या लोणावळा कॅम्पातही मला माझे वडील नेत असत. माझ्या आत्याच्या यजमानांनी टाटा कंपनीच्या त्या आकाशी निळ्या रंगाच्या गाडीतून मला फेरफटका घडवला आहे. फेरफटका मारुन आल्यावर माझी आत्या मला कडेवर घेई आणि काही खाऊ भरवी असे मला स्पष्टपणे स्मरते. त्यावेळी टाटा कॅम्पमध्ये शनिवारी-रविवारी ३५ एमएमच्या पडद्यावर चित्रपट दाखवले जात. त्यासाठी आमच्या कल्याणच्या घरुन मला व माझ्या बहिणींना न्यायला माझे आतेभाऊ येत. आताच्या अनेक वाचकांना माझ्या चित्रपट विषयक तपशीलवार लिखाणाबद्दल उगाचच कवतिक वगैरे वाटते. त्या साऱ्याची पायाभरणी मी सात-आठ वर्षांचा असल्यापासून पाहात असलेल्या त्या टाटा कंपनीतील चित्रपटांमुळे झाली आहे. आत्याच्या मुली, मुलगे शाळा-महाविद्यालयीन शिक्षण घेत असत. माझ्या आतेबहीणींना त्यावेळच्या लोकप्रभा साप्ताहिकांत ‘सैरंध्रीचा सल्ला' या सौंदर्यप्रसाधन विषयक सदरातून प्रश्न पाठवायला आवडे. तर आतेभाऊ वाचन, चित्रकला, इंजिनियरिंग यात रुचि बाळगून असत. चांगले वातावरण लाभल्यास मुलांचा शैक्षणिक विकास होतो तो असा. माझा मोठा आतेभाऊ पुणे विद्यापीठातून एमएससी झाला, पुढे इंजिनियर झाला, प्राध्यापक झाला, पनवेलच्या कॉलेजात त्याने काही काळ प्राध्यापकीही केली. कालांतराने टाटा कंपनीत तो रुजू झाल्यावर इंजिनियर म्हणून प्रदीर्घ काळ काम केले. त्याला कंपनीतर्फे परदेशातही विशेष प्रशिक्षणासाठी जाण्याचा योग आला. माझ्या धाकट्या आतेभावालाही थोड्या विलंबाने खोपोली येथील टाटा हाय़ड्रो मध्ये कामाची संधी मिळाली. आता या दोन्ही आतेभावांचे मुलगेही इंजिनियर बनून टाटा कंपनीत सेवा बजावताहेत. म्हणजे त्यांची तिसरी पिढी सध्या तेथे कार्यरत आहे.
टाटा कंपनीतील गणेशोत्सवात गाजलेले वाद्यवृंद, जादूचे प्रयोग, नृत्याचे कार्यक्रम यांची रेलचेल असे. ‘महाराष्ट्राची लोकधारा' हा शाहीर साबळे यांचा कार्यक्रम मी सर्वप्रथम तेथे पाहिला. केवळ मनोरंजनच नव्हे; कर्मचारी, अधिकारी यांचे निवास, त्यांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य यांची चांगली काळजी टाटा कंपनीत घेतली जात असे. मुळातच पारशी लोक हे प्रेमळ, जागरुक, संवेदनशील, सामाजिक बांधीलकी मानणारे, देशप्रेमी असतात याचा पडताळा आपण घेतला आहे. ‘संपूर्ण भारतातील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्यांची नोंद असलेले पारशी लोक दाखवा आणि लाखाचे इनाम मिळवा' अशी पैज लावल्यास ती कायमच अनिर्णित राहिल याची मला खात्री आहे. भारतामध्ये राहुन भारताशी शत प्रतिशत इमान ठेवणारे पारशी हे सच्चे देशप्रेमी अल्पसंख्य होय! पुढे माझेही महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर मी ज्या लंडन पिल्सनर कंपनीत कामास लागलो, ती कंपनीही पारशी मालकांचीच होती. सन्मा. रतन टाटा यांचे या देशाप्रति असणारे योगदान खणखणीत व काबिलेतारीफ आहे. त्यांच्या निधनानंतर सर्वपक्षीय, सर्वजातीय नेटकऱ्यांनी ज्या प्रकारे शोक व्यक्त केला, मराठीसह सर्वभाषक दैनिकांनी अनेक पानी मजकूर देऊन त्यांना श्रध्दांजली अर्पण केली ती पाहता आपले किती नुकसान झाले आहे याचा अदमास यावा. सन्मा. रतनजी टाटा यांना भावपूर्ण आदरांजली.
याच नवरात्रीच्या काळात मराठी पत्रकारितेतील महिलांमधील एक मोठे नाव असलेल्या व महाराष्ट्र टाईम्समध्ये जवळपास ३६ वर्षे पत्रकारिता केलेल्या सन्मा.नीला उपाध्ये यांनीही हे जग ९ ऑवटोबर रोजी सोडले. सेन्सॉर बोर्ड सदस्य, वीस पुस्तकांच्या लेखिका, चित्रपश्चिमा हे सदर चालवणाऱ्या स्तंभलेखिका, एशियाटिक सोसायटीची रिसर्च तेलंग फेलोशिप मिळवणाऱ्या पहिल्याच मराठी पत्रकार असणाऱ्या नीलाताईंचा माझा संपर्क आला तो दिवंगत लेखक ‘एसईझेड'कार प्रा.शंकर सखाराम यांच्या पत्नी श्रीमती अंजली पाटील यांच्यामुळे. मग जेंव्हा कधी नीलाताईंची कुठे कार्यक्रमात भेट झाली, फोनवर संपर्क झाला की त्यांचा पहिला प्रश्न असे की ‘तुम्ही तुमचे पुढचे पुस्तक कधी प्रकाशित करणार आहात' म्हणून! नीलाताईंनी त्यांची काही पुस्तकेही मला स्वाक्षरी करुन भेट दिली आहेत. माझा एखादा लेख मुंबईतील आघाडीच्या दैनिकातून प्रसिध्द झाला की त्या हटकून फोन करुन शाबासकी देत. वरुन कडक, रुक्ष, फटकळ वाटणाऱ्या नीलाताई मजकूर, विषय, आशय, मांडणी यांच्या बाबतीत चोखंदळ होत्या व पर्फेक्शनच्या आग्रही होत्या हे मी खात्रीने सांगू शकतो. म.टा.मधील त्यांच्या कार्यकाळात त्यांना कुणाकुणाचा कसा त्रास झाला, त्यावर त्यांनी कसा मार्ग काढला, कोणकोण त्यावेळी मदतीसाठी तत्पर होते यावर त्यांनी सडेतोड लिखाण करुन ठेवले आहे. पत्रकारितेत येणाऱ्या अभ्यासू महिलांसाठी ते नक्कीच उपयुक्त ठरेल.
नवरात्री संपल्या, दसरा झाला. त्याला दोन दिवस होत नाहीत तोच बहुविध प्रतिभेचा अभिनेता अतुल परचुरे याने कॅन्सरशी चालवलेली झुंज अपयशी ठरल्याने आपला अकाली निरोप घेतला. पु.ल.देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली त्यांच्यासमोरच साकारुन त्यांची शाबासकी मिळवणाऱ्या निवडक कलावंतांमध्ये अतुल होता. नातीगोती नाटकातील त्याने साकारलेली गतिमंद मुलाची भूमिका कोण विसरेल? मराठी-हिंदी चित्रपट, मालिका, नाटके, जाहिराती असा त्याचा चौफेर संचार होता. इतर कलावंतांप्रमाणे कसलेमसले व्यसन न लावून घेणाऱ्या अतुलला कॅन्सरने गाठले ही बाब आरोग्याबाबत जागरुक असणाऱ्या सर्वांसाठी चिंता निर्माण करणारी म्हटली पाहिजे. आपल्या घरातले नसतानाही लागोपाठ झालेल्या या तिन्ही एक्झीट्सनी जणू जवळचेच, नात्यातलेच, आपल्यावर जीव लावणारे, आपले भावजीवन समृध्द करणारे कुणीतरी गेले आहेत ही भावना मनात दाटून आली आहे. या सहृदांना भावपूर्ण आदरांजली.
- राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर