ईच्छा तेथे मार्ग : कर्तृत्वाची गरुड भरारी
घरातील गॅस सिलिंंडरचा स्फोट होऊन शरीर भाजल्याने व गरीब परिस्थितीने प्रचंड नैराश्य आल्याने एकेकाळी आत्महत्या करायला निघालेली बाई आता स्वतःच्या आत्मविश्वास इच्छाशक्तीच्या बळावर आणि मी माझ्या मुलींसाठी जगणार, मी अबला नाही तर सबला आहे या आत्मविश्वासाने वावरत होती. पुढे जाऊन २०१८ साली AIW international Alliance Waste Speaker कार्यशाळेत इंटरनॅशनल स्पीकर म्हणून त्याच महिलेने प्रतिनिधित्व केले. त्या सौ. रुविमणी जोसेफ पॉल यांच्या संघर्षाची ही गाथा....
सौ. रुक्मिणी जोसेफ पॉल नवी मुंबईत दिघा गाव बेलापूर रोड येथे वास्तव्यास. त्यांचा जन्म बंजारा समाजात कळंबोली, नवी मुंबई येथे झाला. आई-वडील कन्स्ट्रक्शन वर्कर.. हंगामी काम. रुक्मिणी पाच भावंडे भावंडांना सांभाळणे, आर्थिक परिस्थितीमुळे मनात असतानाही त्यांना शिक्षण घेता आले नाही. रुक्मिणी राठोडचा विवाह जोसेफ पॉल यांच्याशी २००० साली झाला आणि त्या सौ. रुक्मिणी जोसेफ पॉल झाल्या. त्या ठाण्याला पतीसह राहू लागल्या. संसार सुरु असताना ३१ डिसेंबर २००२ साली भयानक घटना घडली. घरातील सिलेंडर गॅसचा स्फोट झाला. त्या खूप भाजल्या त्यावेळी त्यांची मोठी मुलगी फक्त सहा महिन्याची होती.
सहा महिन्याचे तान्हं बाळ आणि त्यांना भरपूर जखम मान, हात खूप भाजलं होतं. जवळजवळ सहा महिने त्या हॉस्पिटलला होत्या. शरीर फार कुरूप झालं होतं. मान आणि हात चिकटलेले होते. त्यांना व्यवस्थित कामे करता येत नव्हते आणि काही कामही नाही. घरात बिकट परिस्थिती. सहा महिन्याचा बाळ. आजारपणासाठी खर्च करायला पैसे नव्हते.
सुरुवातीला खूप इलाज केले; परंतु शेवटी आर्थिक परिस्थिती पुढे नाईलाज झाला. अशी काही परिस्थिती निर्माण झाली की त्यांना त्यांच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार आले व त्यांनी छोट्या बाळाला घेऊन त्या घराच्या बाहेर पडल्या आणि ठाणे सीएसटी ट्रेन पकडली. परंतु मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा कधीही श्रेष्ठ असतो. देवाच्या रूपात कोण, कधी भेटेल सांगता येत नाही. असेच त्या ट्रेनमध्ये त्यांना एक बाई भेटली. शेजारी बसल्या होत्या, त्यांनी त्यांची चौकशी केली. बाळाला पाणी दिले. त्यांची चौकशी केली आणि नेमक्या त्या बाई जे. जे. हॉस्पिटलमध्ये सेविका म्हणून काम करत होत्या. त्यांनी सांगितलं काही टेन्शन घेऊ नका व्यवस्थित होईल. जे. जे. हॉस्पिटलला गेल्यानंतर त्यांनी केस पेपर काढून दिले खूप मदत केली. सोनू शेखर डॉक्टर तर देवदूत म्हणून आले. खूप सहकार्य केलं .पैशापेक्षा काही माणुसकी किती महत्त्वाची ते डॉक्टरांच्या रूपात समजले. डॉक्टरांनी जरी बाकी सर्व मोफत असले तरी खाणं किंवा इतर काही गोष्टी होत्या. तिवारी अंकलनी छोटासा लघुउद्योग सांगितला की जो त्यांनी फार दिवस नाही केला तर सुरुवातीच्या अडचणीच्या काळामध्ये तो उद्योग त्यांना चार महिन्यासाठी उपयोगाला आला आणि नऊ हजार रुपये जमा झाले. दुसऱ्यांच्या दूरच्या नात्यातील आत्याकडे बाळाला ठेवून त्यांनी ऑपरेशन करून घेतले. ऑपरेशन होईपर्यंत बाळ सात-आठ महिन्याचं झालं होतं. मांडीची चामडी काढून लावण्यात आली आणि दहा दिवसांनी त्या बऱ्या झाल्या आणि बऱ्या झाल्यावर जेव्हा त्या घरी आल्या तेंव्हा लोक आश्चर्याने डोळे विस्फारून पाहू लागले की कसे शक्य की ज्या बाईला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. एक रुपया पदरी नाही. ज्या बाईने मरणाला जवळ केले असे वाटले होते. घराबाहेर पडली होती. ती बाई आता स्वतःच्या आत्मविश्वास इच्छाशक्तीच्या बळावर आणि मी माझ्या मुलींसाठी जगणार, मी अबला नाही तर सबला आहे या आत्मविश्वासाने वावरत होती. आश्चर्यचकित होऊन लोक पाहू लागले. २००६ साली नवी मुंबईला साठे नगर दिघा येथे राहायला आल्या. तोपर्यंत मुलगी तीन साडेतीन वर्षाची झाली होती; परंतु तरी पोटाचा प्रश्न, पोटाची अडचण होतीच. बटर चहा खाऊन दिवस काढावे लागत होते. दागिने, भांडी विकली. तेथील लक्ष्मी कसबेताईंनी सहकार्य केलं. विष्णुनगर एमआयडीसी रोडला त्या कचरा वेचत. त्यांच्यासोबत जाऊन कसा कचरा वेचायचा, कचरा वर्गीकरण कसे करायचे ते शिकल्या आणि पहिल्या दिवशी त्यांना ४० रुपये मिळाले. परंतु असे जरी असले तरी त्या घरी येऊन रडायच्या की जीवनाचा रस्ता कुठे येऊन पोहोचला की आता कचरा वेचावा लागत आहे. याही स्थितीत त्यांनी जवळजवळ एक वर्ष कचरा वेचायचं काम केलं. २००७ नोव्हेंबरला कचरा वेचक महिलांच्या कामात इतरांना मदत करू लागल्या. २००८ साली त्या कचरा वेचक महिला एकता बचत गटाच्या अध्यक्ष झाल्या. २००८ ते २०१७ दरम्यान सोसायटीत झाडू मारणे, महिला कामगारांना मदत करणे असे खूप काम त्यांनी करत सामाजिक कार्यातही सहभाग घेतला. २०१८ साली AIW international Alliance Waste Speaker कार्यशाळेत इंटरनॅशनल स्पीकर म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले की जिथे १००० महिला कचरा वेतन महिलांचा सहभाग होता.
त्या कचरा वेचकांच्या समस्या खूप तळमळीने मांडतात. त्या फिलिफाइन, बांगलादेश, हिमाचल, कर्नाटक, बॅगलोर, पुणे, इंदोर विजयवाडा या ठिकाणी पर्यावरण विषयक ठामपणे मत मांडतात. AIW च्या परिषदांमध्ये सामील होऊन संस्थेचे प्रतिनिधित्व करतात. सामाजिक बांधिलकी व गटातील भगिनीविषयीची आपुलकी लक्षात घेऊन त्यांना २०१७ ला कचरा वेचकांचे फेडरेशनच्या अध्यक्षा म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. रुक्मिणीताई निरक्षर असताना त्या मुलीकडे लिहा वाचायला शिकल्या. संघटनेच्या मार्गदर्शनाने त्या आता इंग्लिश बोलायला, लिहायला शिकत आहेत. त्यांची जिज्ञासू वृत्ती असल्याने त्यांना प्रत्येक गोष्ट शिकण्याची इच्छा असते. एखादे काम हातात घेतले की ते पूर्ण करण्याची तयारी रुक्मिणी ताईकडे आहे.
त्यांना दोन मुली आहेत. मोठी मुलगी बीकॉम होऊन आता MSW निर्मला निकेतनमध्ये शिकत आहे. छोटी मुलगी १० वी इंग्रजी माध्यमातून दिघा येथे शिक्षण घेत आहे. नवरा बायको, दोन मुली असा सुखी संसार सुरू आहे. या त्यांच्या प्रवासात त्यांना स्त्री मुक्ती संघटनेच्या नवी मुंबईच्या सौ. वृषाली मगदूम मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. २८ सप्टेंबर 2024 रोजी सानपाडा, नवी मुंबई येथे पार पडलेल्या महिला साहित्यिक संमेलनात एसएनडीटी विद्यापीठाच्या माननीय कुलगुरू उज्वला चक्रदेव यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. नवरात्र उत्सव संपून आता दीपावलीचे वेध लागले आहेत. स्त्री ही सृजनशक्ती आहे. भू ते अवकाश अशी तिची भरारी आहे, ती नवदुर्गा, चंडिका, आभाळमाया, प्रजनन शक्ती आहे , नवरात्रोत्सवात सौ. रुक्मिणी जोसेफ पॉल त्यांच्या कार्याची माळ गुंफल्याचा आनंद काही वेगळाच. त्यांचे कार्य अतुलनीय आहे. मरणाच्या दारावर जाऊन आपल्यातील शक्ती ओळखून पुन्हा नव्याने भरारी घेणाऱ्या रुक्मिणी नवदुर्गेला अभिवादन व त्यांच्या कार्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा.
- सौ. ऋतुजा रवींद्र गवस