करिअरच्या नव्या दिशा
प्रामुख्याने शिकायचं कशाला असतं तर नोकरी मिळवायला हा ट्रेंड वाढत असतानाच आपण एकशेपन्नास कोटी लोकसंख्या असलेल्या देशात रहात आहोत, आजही अन् या पुढील काळातही नोकरी, प्रतिष्ठा, स्थैर्य, स्वतःची स्वप्नं पुर्ण करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे असे भविष्य दिसते आहे. द्विपदवीधर पदवी प्राप्त करूनही, इंजिनिअर चहाची टपरी चालवतोय, एम बी ए झालेला वडापाव सेंटर सुरू करतोय, पी एच डी घेऊनसुद्धा नोकरीची संधी न मिळालेला भेळ-पाणीपुरी केंद्र चालवतोय, दोनशे नोकऱ्यांच्या भरतीसाठी दोन दोन लाख अर्ज येतात हे असं घडताना आपण पहातोय, अनुभवतोय.
करिअरच्या नव्या दिशा या एकशे बहात्तर पानी पुस्तकात, तंत्रशिक्षण, व्यवस्थापन, आरोग्य, कृषी ग्रामविकास, दिव्यागांसाठीच्या संधी, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या संधी, ललीत, कला, संशोधन, प्राप्त् मिळू शकणाऱ्या शिष्यवृत्ती, अशा विविधांगी, वेगवेगळ्या शिक्षण अभ्यासक्रमांची अत्यंत मोलाची माहिती दिली आहे. आजही नव्वद टक्के वाहतुक ही जलमार्गाने होते, त्यात असणाऱ्या नोकरी-व्यवसायाच्या संधी आणि मुख्य म्हणजे भारत सरकारची ही संस्था मुंबईत आहे, असे तपशीलवार मार्गदर्शन, अशी सर्वोपांग एकत्रित माहिती या पुस्तकात दिली आहे.
अशा प्रकारची समग्र माहिती देणारे मराठी भाषेतील कदचित हे एकमेवाद्वितीय पुस्तक असावे असं मला वाटतं. या पुस्तकात महत्वाची विद्यापिठे, नामांकित शिक्षण संस्था, संशोधन क्षेत्रातील अनेक अभ्यासक्रम, व्यवसायाभिमुख शिक्षण देणाऱ्या संस्था इतकेच नव्हे तर संबंधीतांचे संपर्क क्रमांक, पत्ते, संकेतस्थळे, इमेल, निवडप्रक्रिया आदी उपयुक्त माहितीचा खजिना या सर्वांची नोंद आहे.
काही अभ्यासक्रम तर दहावी बारावी नापास झालेल्या मुलामुलींसाठी सुद्धा आहेत हे विशेष! आपली उमेद न हरवू देता त्यांनाही त्यांच्या आयुष्यात करिअरचे दालन कसे खुले करता येईल याचे महत्वपूर्ण मार्गदर्शन केले आहे. गरजू विद्यार्थ्यांसह त्यांच्या त्यांच्या पालकांनीसुद्धा हे पुस्तक वाचणे, संग्रही ठेवणे अगदी आवश्यक असेच. फक्त नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा कौशल्य विकसित करून स्वतःचा मार्ग स्वतः शोधायला हवा कारण पदवी, डॉक्टरेट घेतलेल्या तरूण तरुणींची बेरोजगारी आज सगळ्यात जास्त आहे. ‘करिअरच्या नव्या दिशा' हे पुस्तक अभ्यासक्रमांचा एक मार्गदर्शक, पथदर्शक म्हणून उपयुक्त पुस्तकांच्या यादीत अग्रकमाने गणले जाईल यात काही शंकाच नाही. करिअर घडविणेच्या शोधात असणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी या अनमोल माहितीचा लाभ जरूर घेतला पाहिजे.
मुळातच संशोधक वृत्ती अंगभूत असलेले लेखक देवेंद्र भुजबळ महाराष्ट्र राज्य सरकारच्या माहिती खात्यात संचालक पदावरून निवृत्त झालेले आहेत, न्युज स्टोरी टुडे पोर्टलचे संपादक आहेत, आतापर्यंत त्यांची नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. इतरांना प्रकाशवाटा दाखवणाऱ्या अशा या लेखकाचे हे पुस्तक निश्चितच काहींचा अंधार दूर करणारे ठरेल हा विश्वास आहे.
करिअरच्या नव्या दिशा लेखक : देवेंद्र भुजबळ, प्रकाश कः न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन
पाने : १७४, मुल्य : ३५० रुपये
-सुनील शरद चिटणीस