विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी जुळलेले ललितलेख : अनुबंध

 एखाद्या प्राध्यापिकेवर विद्यार्थी किती निस्सीम, निरलस प्रेम करतात आणि त्यांच्या कठीण काळात त्यांना कशी मदत करतात. तसेच त्याची जाणीव ठेवून या प्राध्यापिका मुलांचे भले करण्यासाठी मोठेपणा बाजूला ठेवून कश्या झटतात याचे जातिवंत उदाहरण म्हणजे अनुबंध' हे ललित लेखांचे पुस्तक होय. वैशिष्ठ्य म्हणजे विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेवून प्रा. वीणा सानेकर यांच्या बाबतच्या अनुभवाचे कथन करणारे हे पुस्तक त्यांनी त्यांच्या निरोप समारंभाच्या दिवशी प्रकाशित केले. यावर टाकलेला हा प्रकाशझोत.

सोमय्या महाविद्यालयात जवळपास तीन तपे प्राध्यापक म्हणून सेवा बजावताना प्रा. डॉ .वीणा सानेकर यांनी अनेक विद्यार्थ्यांना न्याहाळले. त्यांच्या समस्या जवळून जाणून घेतल्या. तसेच त्यांचे भावविश्व त्यांना जाणवले. त्यातून आकाराला आलेले ललितबंध म्हणजेच ‘अनुबंध'. हे पुस्तक ज्ञानप्रसारक पब्लिकेशन, विक्रोळी यांनी प्रकाशित केले आहे. प्रा.सानेकर यांच्या विद्यार्थिनी समृध्दी म्हात्रे-मोरे आणि तिची बहीण साधना गोरे यांनी हे पुस्तक साकारण्याची जबाबदारी पार पाडली असून त्यांनीच यात प्रतिनिधिक मनोगते दिली आहेत. वैशिष्ट्य म्हणजे महाविद्यालयीन काळात जगणं सुंदर करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हे पुस्तक अर्पण केले आहे. त्यास विदुषी आणि सुप्रसिद्ध साहित्यिका डॉ. विजया वाड यांची ( ब्लर्ब ) पाठराखण लाभली आहे. तर आशयबद्ध मुखपृष्ठ चित्रकार ईशा सानेकर हिने रेखाटले आहे.

विश्वकोश मंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ. विजया वाड यांनी म्हटले आहे की, एक उत्तम शिक्षक ‘जीवन' वाचतो आणि एक उत्तम लेखक ती सर्वस्व वेचून ‘अक्षरबद्ध' करतो या नात्याने  ‘अनुबंध ' मधील ललित लेख बोलके होतात. ते प्रत्येकास अंतर्मुख करून त्यांच्या मनातील कवाडे उघडतील असा मला विश्वास वाटतो. ही वीणा सानेकर यांच्या लेखणीची ताकद आहे.

प्रा. डॉ. वीणा सानेकर यांनी त्यांच्याशिवाय डबा न खाणारा उदय रोटे, लेकीला आवर्जून मराठी माध्यमात घालणारी रोशना मणचेकर, गरोदरपणी सातव्या महिन्यात घर बदलावे लागले; तेव्हा पाठीशी उभी राहणारी हेमलता वाडकर, स्वरांनी जिंकून घेणारा रघुनाथ व प्रबोधनचे गौरी रवी, सचिन, वैशाली, अमोल, सुजाता असे कितीतरी प्रबोधनचे कार्यकर्ते, अक्षरावरून कायम त्यांचे बोलणे  ऐकून घेणारा.. पण न रागवणारा आजचा आघाडीचा पत्रकार सचिन लुंगसे, काटू नि रचू या लाडक्या लेकी, प्रसन्न प्राजक्ता आणि  कविता, चिमुकली आदिती, निशिकांत, निखिल, समिधा, दिप्ती, सायली राणे, सायली जाधव अशा चेहरे डोळयासमोर येणाऱ्या विद्यार्थ्यांना यात शब्दबद्ध केले आहे.

तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागातल्या कामातून गवसलेली तृप्ती, आरती, सुशील, नासिर, आता राजावाडी हॉस्पिटलशी जोडली गेलेली अश्विनी, कल्चरल फोरमचे सईजो, जयदेव, पंकज, आता राजकारणात ठामपणे वावरणारी वर्षा भोसले ही मुले त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील नेतृत्वगुणामुळे त्यांच्या लक्षात राहिल्याने त्यांचे जीवनही यात ललितबद्ध झाले आहे.

एकदा प्रवासादरम्यान त्या ठाणे स्टेशनवर उतरल्या होत्या. पुलावर सभोवार माणसांची गर्दी जमली होती. समोरून एक मुलगा तीरासारखा धावत आला. तिथल्या गर्दीत चक्क खाली वाकून पायाला हात लावत म्हणाला,  ‘मॅडम, ओळखलंत का मला ? मी तुमचा विद्यार्थी. हा अनुभव सांगताना त्यांना गहिवरून आल्याचे दिसून येते.तो विद्यार्थी जणू तमाम विद्यार्थ्यांचा चेहरा झाला होता. असे त्या म्हणतात, तेव्हा  सर्व विद्यार्थी त्यांच्या डोळ्यापुढे तरळतात असे आपल्याला वाचतांना जाणवते.

वेगवेगळ्या क्षणी भेटलेल्या रत्ना आणि अंजना या दोघींनी त्यांची एका मोठ्या अपघातानंतर रात्रंदिवस काळजी घेतली त्याला तोड नाही. त्याचे पडसाद यात उमटले आहेत. तंत्रकुशल सायुरी, पहाडी आवाजाचा अतुल आणि अलीकडेच भेटलेल्या मुली कोमल, आदिती, सृष्टी, पूर्वा, तेजल, अक्षता, हर्षदा, नमिता, मानसी, श्रिया आणि आदर्श यांना त्या यात स्थान देण्यास विसरलेल्या नाहीत. उशिरा आलेली आणि विभागाच्या कुटुंबाचा भाग झालेली चैत्राली अशी सर्वच मुले त्यांना जीव लावणारी आहेत. अक्सा खरे ही विद्यार्थिनी अमराठी; पण मराठीवर तिचे उत्तम प्रभुत्व आहे. तिच्या लाघवी स्वभावाने कितीतरी मित्र मैत्रिणींना तिने सहज जोडले आहे .याची जाणीव आपल्याला यातून होते. या तमाम विद्यार्थ्यांनी प्रा.डॉ.वीणा सानेकर यांचे आयुष्य सुंदर केले. त्यांना अपघातातही सहाय्य करून उभारी दिली.सतत चैतन्यशील ठेवले. त्यांना या लालितबंधात त्यांनी सोप्या शब्दात बंदिस्त केले आहे.

प्रा.डॉ. वीणा सानेकर  यांच्या ‘अनुबंध' मधील ललितबद्ध भाषा शैलीचा विचार करताना त्या असे सहज लिहून जातात की,   ‘मुलं मोठी होतात सुरक्षित झाडाच्या पानांतून दिसणारे आकाश त्यांना एकीकडे खुणावते आणि दुसरीकडे झाडाशी असलेला अनुबंध त्यांना तोडता येत नाही. हा अनुबंध झाडाची मुळं अधिक बळकट करतो आणि या पाखरांच्या पंखात भरारी घेण्याचं बळ रुजवतो.' असे शब्दबद्ध करताना त्या विद्यार्थ्यांच्या भावाविश्वात काव्यात्मकतेने रमतात.

एकंदरीत पाहता ‘अनुबंध' मधील लेखांतून त्यांनी जाणून घेतलेल्या भोवतालच्या विद्यार्थ्यांची जीवनरहाटी , मुलांच्या आयुष्यातला पट उलगडत त्यांच्यातील नात्यांचा इंद्रधनुष्य गोफ विणला आहे. त्यात विद्यार्थ्यांच्या समस्या, त्यांना वेळोवेळी केलेले प्रबोधन आणि सूचना, त्यांना उघडून दिलेली विविध संधींची दारे, पाठ्यक्रमाव्यतिरिक्त शिकवलेली जगण्याची मूल्ये, विद्यार्थ्यांना सतत प्रेरणा देण्याची हातोटी, महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी राबवलेले विविध प्रकल्प आणि मराठी भाषेविषयीचे उपक्रम व कार्यक्रम, मुलांना लावलेला पुस्तकांचा सहवास आणि मुलांच्या समस्या जाणून त्यांना वेळोवेळी दिलेला आधार आणि प्रसंगी त्यांना जाणवू न देता साम, दाम यांनी केलेले सहकार्य याची जाणीव यातून आपल्याला होते. विद्यार्थ्यांचे भावविश्व जाणून घेण्यासाठी आपल्याला ‘अनुबंध' यातील ललितबंध वाचावयास हवे.
 अनुबंध ( ललितलेख ) : लेखिका : प्रा. डॉ. वीणा सानेकर मुखपृष्ठ : ईशा सानेकर
प्रकाशक : ज्ञानप्रसारक पब्लिकेशन, विक्रोळी
पृष्ठे : १०४,   मूल्य : रु. २००/-
- शिवाजी गावडे 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

कोकणातील नवान्न पौर्णिमा