दृष्टीहीनांचे जीवन प्रकाशमय करण्यास हातभार लावू या (१५ ऑवटोबर - जागतिक अंध दिन)

 दरवर्षी १५ ऑक्टोबर हा दिवस जगभरात ‘जागतिक अंध दिन' किंवा ‘पांढरी काठी सुरक्षा दिन' म्हणून साजरा केला जातो, हा एक जागतिक कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश अंधत्व आणि दृष्टीदोषाकडे लक्ष वेधण्यासाठी आहे. तुम्ही रस्ता ओलांडताना, चालताना संपूर्ण पांढऱ्या रंगाची किंवा वरून दोन तृतींयांश पांढरा आणि खाली एक तृतीयांश लाल रंग असलेली काठी घेऊन चालणारे अनेक लोक पाहिले असतील. हे सर्व लोक देसी डोळे परी निर्र्मिसी त्यापुढे अंधार अशी निसर्गाची अजब निर्मिती असलेले अर्थात अंध असतात.

१५ ऑवटोबर या दिवशी नॅब (नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड) या संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. ऑक्टोबरचा दुसरा गुरुवार हा जागतिक दृष्टी दिन आहे, आपले डोळे आणि दृष्टी सुरक्षित ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित करण्याची, दृष्टीदोष आणि अंधत्वाबद्दल जागरुकता वाढवण्याची आणि नेत्र आणि दृष्टी काळजीला प्रोत्साहन देण्याची संधी.

 २००० पासून जागतिक दृष्टी दिन साजरा केला जात आहे आणि आता जागतिक आरोग्य संघटनेच्या बरोबरीने अंधत्व प्रतिबंधक आंतरराष्ट्रीय एजन्सीद्वारे समन्वयित केले जात आहे. हे सुरुवातीला लायन्स क्लब इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या साइट फर्स्ट मोहिमेचा भाग म्हणून पाळण्यात आले. या दिवशी नेत्र तपासणी किंवा तुमच्या डोळ्यांची काळजी घेण्याचे वचन द्या आणि इतरांना तसे करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी सोशल मीडियावर शेअर करा. या जागतिक दृष्टी दिनाचे आंतरराष्ट्रीय अंधत्व प्रतिबंधक संस्था (आयएपीबी) चे उद्दिष्ट १० दशलक्ष डोळ्यांच्या चाचण्यांपर्यंत पोहोचणे हे आहे आणि नेत्र निगा सेवांसाठी जागरुकता निर्माण करण्याचे वचन दिले आहे. या वर्षी २०२४ मधील जागतिक आरोग्य दिनाची थीम ‘माय हेल्थ, माय राइट' अशी आहे. आरोग्य सेवा मिळणे हा मूलभूत मानवी हक्क आहे.

चढउतार, दगडधोंडे, खाचखळगे, कुत्रे, मांजर असे प्राणी, बसलेली-झोपलेली माणसे असे काठीच्या परीक्षेत्रात येणारे सगळेच अडथळे पांढऱ्या काठीचा उपयोग करून पार करता येतात. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पहिल्या महायुद्धानंतर डॉ. रिचर्ड व्हुव्हर यांनी सर्वप्रथम अंधांना चालण्या-फिरण्यासाठी सोयीची पडेल अशी विशिष्ठ स्वरूपाची काठी तयार केली. ती काठी हुव्हर केन म्हणून ओळखली गेली. १९२१ मध्ये ब्रिस्टलचे फोटोग्राफर जेम्स विंग्ज यांना अपघातात अंधत्व आले. तेव्हा गडद रंगांच्या काठय़ा घेऊन फिरताना वाहनचालक आणि इतर डोळस व्यक्तींना दुरून ती ओळखणे कठीण जात होते. हे लक्षात आल्यानंतर अंधारातही सहजपणे दिसेल, असा पांढरा रंग आपल्या काठीला दिला. दृष्टीहीन हा डोळा असूनही नसल्यासारखा असतो. पांढरी काठी आम्हांस जणू आमचा डोळाच. कुणाच्याही आधाराशिवाय मुक्तपणे संचार करण्यासाठीचा आत्मविश्वास. ही पांढरी काठी म्हणजे अंधाची आजची जीवन संजीवनी व जीवनसाथी आहे. जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त लोकांनी अंधांना रस्ता ओलांडताना मदत करणे, साहित्य पुरवून यामध्ये जनजागृती करावी. यामध्ये लोकसहभाग खूप आवश्यक आहे. अंधासाठी पांढरीकाठी म्हणजे त्यांच्या करिता जीवनरेखाच आहे.

 तुम्हा-आम्हाला डोळे आहेत, चांगली दृष्टी आहे. त्याद्वारे आपण साऱ्या सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घेऊ शकतो. मनमुराद आनंद लुटू शकतो. पण ज्यांना डोळे नाहीत, दृष्टी नाही, त्यांचा कधी आपण विचार केला आहे का? तात्पर्य म्हणजे त्यांचा देखील आपण सामाजिक कर्तव्यबुद्धीने विचार करायला हवा. कारण तेही समाजाचे अविभाज्य घटक आहेत. दृष्टिहीन लोकांना आपल्या सारखंच जग न्याहाळता यावं आणि त्यांनाही डोळसपणे जीवनदर्शन करता यावं व त्यांना एक नवी जीवनदृष्टी मिळावी, या दृष्टिकोनातून आपण सर्वजण ‘नेत्रदान' करण्याचा संकल्प करू या. दरवर्षी १५ ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक अंध दिन' म्हणून जगभर साजरा केला जातो. पांढरी काठी घेऊन रस्त्यावर चालणारी व्यक्ती ही अंध आहे याचं सामाजिक भान ठेवून त्याला मदतीचा हात देणं, हा एक कर्तव्याचा भाग आहे, हे लक्षात ठेवावे. जागतिक पातळीवर दृष्टिहीन लोकांची संख्या पाहता, त्यातील २० टक्के लोक एकट्या भारतात आहेत. अशा गंभीर जागतिक प्रश्नावर रामबाण उपाय म्हणजे प्रत्येक सुजाण नागरिकाने नेत्रदान करण्यास स्वयंस्फुर्तीने पुढे येणं व ही काळाची गरज देखील आहे. जगात सुमारे १८० दशलक्ष लोक दृष्टिहीन असून, त्यातील जवळ जवळ ३५ दशलक्ष लोक भारतात आहेत. जगातील सुमारे ९० टक्के अंध हे विकसनशील देशांमध्ये राहणारे आहेत. वार्धक्य, बदलती जीवनशैली, गरिबी, निरक्षरता, मानवी विकासाचा अभाव, सामाजिक मागासलेपणा, अत्याधुनिक वैद्यकीय साधन सामुग्रीची कमतरता या प्रमुख गोष्टी अंधत्वाच्या वाढत्या प्रमाणाला कारणीभूत आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणात नमूद केलं आहे.

  जागतिक पातळीवर ‘अंधत्व' या समस्येवर मात करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय अंधत्व प्रतिबंधक संस्था (आयएपीबी) आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्युएचओ) यांनी संयुक्तपणे ‘२०२० व्हीजन हा कार्यक्रम राबवून, प्रत्येकाला ‘दृष्टीचा अधिकार' ही संकल्पना साकार करण्यात पुढाकार घेतला आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी भारतासह ४० देशांनी योगदान देण्याची तयारी दर्शाविली, ही उल्लेखनीय बाब आहे. खरं तर, भारताच्या खालोखाल दक्षिण आफ्रिका व चीन या देशद्वयामध्येही अंधत्वाची समस्या लक्षणीय आहे. वैश्विक स्तरावर जनजागृती करून अंधत्वाच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी प्रभावी व ठोस उपाययोजना केल्या जात आहेत. जगातील लहानमोठ्या सर्वच देशांनी वैश्विक कर्तव्य या नात्याने या मोहिमेला यशस्वी करण्यात कटिबद्ध व्हावे, हे अपेक्षित आहे. प्रत्येक नेत्रहीन व्यक्तीला राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्याच्या मनातील अंध म्हणून न्युनगंडाची भावना घालविण्यासाठी प्रत्येकाने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. केंद्र व राज्य सरकारनेही नेत्रचिकित्सा व कॅटरॅक्टस्‌वर अद्ययावत उपचारपद्धती या बाबींवर भरीव आर्थिक तरतूद करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना नवी दृष्टी देण्यासाठी ठोस पावलं उचलावीत. शासनयंत्रणेने अंधत्व मिटविण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास अंधत्व निर्मूलन अभियान मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊ शकते, असे जागतिक आरोग्य संघटनेचे मत आहे.

 अंधांसाठी प्रत्येकाने सहानुभूतीपेक्षा स्वानुभूतीची भूमिका अवलंबिली पाहिजे. स्वतःचे डोळे पट्टीने बांधून काही वेळ जगायची अनुभूती घ्यावी, म्हणजे त्यातील गांभीर्य कळून येईल. अंध, अपंग, मतिमंद वा मूकबधिरांना गुणदोषांसह स्वीकारून त्यांना आपलंसं करणं यातच मानवी जीवनाची सार्थकता आहे. अंधांना सामाजिक जाणिवेतून रस्ता ओलांडताना मदत करणे, रेल्वे-बसमध्ये बसण्यास आपली जागा देणे, त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधणे, जीवनाशी निगडीत विभिन्न विषयांवर त्यांच्याशी गप्पा मारणे, त्यांचे मनोबल वाढविणे या गोष्टी आपण दैनंदिन जीवनात वावरताना करायला पाहिजेत. इतकेच नव्हे तर, एक पाऊल पुढे टाकून एखाद्या अंध व्यक्तीशी डोळस व्यक्तीचा विवाह करून देऊन त्याचे अंधकारमय जीवन प्रकाशमय करणं हे पुण्यकर्म आपण आपल्या जीवनात करू शकतो. आजच्या घडीला अंधत्वाची समस्या मिटविण्यासाठी नेत्रदान ही मोहीम लोक चळवळ होणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण मानव म्हणून जीवंतपणी अनेकप्रकारे पुण्यकर्म करीत असतो, हे कौतुकास्पद आहे. तथापि, मृत्यूनंतरही नेत्रदान करून आपण आणखी एका पुण्यकर्मात भर टाकू शकतो. म्हणून ही संधी दवडू नका, यासाठी नेत्रदानाकरिता आधीच इच्छापत्र भरून द्या, जेणेकरून आपल्या मृत्यूनंतर आपली नेत्रं दुसऱ्या अंध व्यक्तीला दान देऊन त्याला नवीन दृष्टी देता येईल. चला तर, नेत्रदान करून अंधत्वाची समस्या मिटविण्यास वचनबद्ध होऊ या.

नियतीने डोळ्यातल्या प्रकाश ज्योती हिरावून घेत ज्या अंध बांधवांचे आयुष्य अंधकारमय करून टाकले आहे, त्यांच्या जीवनात यंदाची दिवाळी आशेचा किरण आणेल अशी आपण सर्व प्रार्थना करू या! - प्रविण बागडे 

 

   

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

खेळाचा खेळखंडोबा