मुशाफिरी

चित्रपट संगीताचे ते सुवर्णयुग

   प्रिय वाचकहो, गेल्या शतकातल्या शेवटच्या दशकामधील १९९९ या वर्षातील नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या शनिवारपासून नवे शहर मधून सुरु झालेली मुशाफिरी यंदाच्या डिसेंबर २०२३ महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी अखंडपणे  प्रसिध्दीची चोवीस वर्षे पूर्ण करुन पंचविसाव्या म्हणजेच रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. साहित्य, शास्त्र, मनोरंजन, कला, क्रीडा, शिक्षण, सामाजिक जीवन, पाककृती, भटकंती या  व तुमच्या आमच्या जीवनाच्या विविध अंगांचा या लेखनातून परामर्श घेता आला. गेल्या चोवीस वर्षात या स्तंभलेखातून प्रसिध्द झालेल्या लेखांवर एकवीस पुस्तके अंध मुलांसाठी ब्रेल लिपीत प्रसिध्द झाली, आणखी चार पुस्तके प्रसिध्दीच्या वाटेवर आहेत. हे सारे तुम्हा रसिक, दर्यादिल, जिंदादिल, साहित्यप्रेमी आणि उमदेपणाने दाद देणाऱ्या सहृदयी वाचकांमुळे शक्य झाले. या लेखात तुमचे आमचे भावजीवन समृध्द करणाऱ्या हिंदी चित्रपट संगीताच्या एका श्रीमंत काळाबद्दल लिहीण्याचा प्रयत्न केला आहे.

   काव्य, गाणी, गीते, बडबडगीते हे सारे आपले सुगम संचित आहे. ‘कवितेला सशक्त भावनांचा उत्स्फुर्त आविष्कार' म्हटले जाते. कवितेतून वेदना अधिक जोरकसपणे मांडता येते. तुमच्या आमच्या जीवनाची सुरुवातच मुळी मातेने, आजीने, मामीने, काकीने, आत्याने गायिलेल्या अंगाईगीताच्या साथीने होते...आणि तुमच्या आमच्या जीवनाचा शेवटही ‘जय राम श्रीराम' या काव्यपंवतीने होतो. जन्म ते मृत्यु असा दीर्घ प्रवास कविता, गाणी, गीते, अभंग, आरत्या आपल्यासोबत करत असतात... किंवा आपण त्यांच्या संगतीने करत असतो असा काव्यप्रकाराचा हा अजोड महिमा आहे.

   जात्यावरील गाणी हा काय प्रकार असतो..त्याबद्दल सध्याची शहरी, निमशहरी पिढी कदाचित अनभिज्ञ असेल. बहिणाबाई चौधरी यांच्या बऱ्याच कविता या जात्यावरील गाणी, विविध प्रसंगी मनात आलेल्या भावनांना दिलेले काव्यरुप या प्रकारात मोडतात. कवि, गीतकार, शायर, गजलकार हा जन्मावा लागतो. त्याचे ट्युशन वलास नसतात. त्याचे प्रशिक्षण वगैरे नसते. ते तुमच्या आतूनच यावे, उमलावे लागते. कुणी ज्येष्ठ, अनुभवी ते आणखी चांगले कसे व्हावे यासाठी कदाचित दोन अनुभवाचे बोल सांगेल, त्याने फारफार तर एखाद्याच्या रचनेला थोडे घासूनपुसुन चमक आणता येईल. पण आडातच नसेल तर कार्यशाळा,  क्लास, शिकवणीच्या पोहऱ्यातूनही फारसे काही हाती लागणे तसे कठीणच! मराठी भावगीते, भवतीगीते, सुगम संगीत यांनी तुमचे आमचे भावजीवन पुरेसे समृध्द करुन ठेवले आहे. जसजसे आपल्याला कळायला लागते, थोडा इतर भाषांचा अभ्यास होतो, अन्य भाषा कानावर पडतात तसे हे भावजीवन विस्तार पावते. आकाशवाणी आणि हिंदी चित्रपट गीते ही सुध्दा आपल्यापैकी अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनून राहिली आहेत. आज जी पिढी पंचावन्न ते साठच्या घरात असेल त्यांच्या घरात एकेकाळी रेडिओ किंवा ट्रान्झिस्टर हा जणू कुटुंब सदस्य असल्यासारखा मानाने मिरवला असेल. खोटे वाटत असल्यास या पिढीतल्या कुणाशीही थोडे बोलून पाहा. टेलिव्हिजनचे प्रस्थ माजण्याच्या पूर्वीच्या काळात भा. रा. तांबे, नारायण मुरलीधर गुप्ते, ग.दि.माडगूळकर, जगदीश खेबूडकर, शांता शेळके, रमेश अणावकर, गंगाधर महांबरे,  मंगेश पाडगावकर, आरती प्रभू, वंदन विटणकर, सुधीर मोघे, शांताराम नांदगावकर, प्रविण दवणे या व अशा नामांकित कवींनी लिहिलेल्या  गीतांनी रसिकांच्या कानांची तृप्ती केली आहे.

   मराठी भावगीतांच्या पाठोपाठ रेडिओ युगाने आपल्याला हिंदी चित्रपट संगीत भरपूर ऐकवले. बेला के फुल, बिनाका गीतमाला, चित्रपट संगीत, गाता रहे मेरा दिल, रंगोली अशा अनेक कार्यक्रमांतून हिंदी चित्रपट गीते तुमच्या आमच्या घरी पोहचली..थेट मनात जाऊन स्थिरावली. हिंदी चित्रपट गीतांमध्ये साहिर लुधियानवी, मजरुह सुलतानपुरी, कैफी आझमी, हसरत जयपुरी, एम जी हशमत, गौहर कानपूरी, शकील बदायुनी, नवश लायलपुरी, शैलेंद्र, निरज, अंजान, राजा मेहंदी अलि खाँ, राजेंद्र कृष्ण, गुलशन बावरा, गुलजार, संतोष आनंद, रविंद्र जैन, आनंद बक्षी, योगेश, जावेद अख्तर यांच्यासारख्या अनेकांनी आमच्या पिढीच्या चित्ररसिकांवर गीतांचे संस्कार केले. मला आठवते..१ जानेवारी १९६० या दिवशी रजतपटावर झळकलेल्या ‘कोहिनूर' नावाच्या हिंदी चित्रपटासाठी शकील बदायुनी नावाच्या मुस्लिम गीतकाराने ‘मधुबन मे राधिका नाचे रे' हे हिंदू दैवत कृष्ण आणि राधेच्या प्रितीवरील गीत लिहिले. ते दिलिपकुमार अर्थात युसुफ खान या मुस्लिम अभिनेत्यावर चित्रित झाले. ते मोहम्मद रफी या मुस्लिम गायकाने गायिले, त्याचे संगीतकार होते नौशाद. अशी या हिंदी चित्रपट संगीताची जाती-धर्मापलिकडची अजबगजब मोहिनी आहे. मराठीपणाचे कडवे पुरस्कर्ते आणि अलिकडे हिंदू जननायक वगैरे बनू पाहणाऱ्या राज ठाकरे यांचे पिताश्री संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी याच मुस्लिम मोहम्मद रफींकडून प्रभू तू दयाळू कृपावंत दाता, शोधिसी मानवा राऊळी मंदिरी ही नितांतसुंदर मराठी भक्तीगीते सुरेलपणे गाऊन घेतली होती.

   आपण हिंदी चित्रपट गीतांचा विचार करतोय. यात गीतकारांना चित्रपटातील दृश्याला साजेशी (सिच्युएशनल) गीते लिहीण्याची, कधी कधी चतुरस्त्र प्रतिभेच्या गीतकारांवरही कारागिरी करण्याचीही वेळ येते. मग ‘बैठ जा बैठ गयी खडी हो जा खडी हो गयी' (अमीर गरीब - गीतकार आनंद बक्षी) किंवा ‘भुतराजा बाहर आजा सिधी तरह से मान जा नही तो मै बजाऊंगी तेरा  बँडबाजा' (चाचा भतिजा -गीतकार आनंद बक्षी) अशी गाणी साच्यातून चकल्या पाडाव्यात तशी पाडली जातात. मला कळायला लागले, गाणी ऐकायला सुरुवात झाली त्यावेळचे अंधुकसे आठवते...ते गाणे होते आर डी बर्मन यांनी स्वरबध्द केलेले किशोर कुमारच्या आवाजातील पडोसन चित्रपटातील ‘मेरे सामनेवाली खिडकीमे इक चांदसा तुकडा रहता है' हे गाणे! आजही ‘पडोसन' हा चित्रपट ऑल टाईम ग्रेटेस्ट कॉमेडी म्हणून गणला जातो. पुढे कविता, भावगीते, चित्रपट गीते जसजशी ऐकत गेलो तशी हिंदी चित्रपट गीते मनाला आणखी भुरळ घालू लागली. पुढे जाऊन मग मिलती है जिंदगी मे मोहब्बत कभी कभी (आँखे), हमने देखी है उन आँखो की महकती खूशबू (खामोशी), हम है मता-ए कूचा-ओ बाजार की तरहा (दस्तक)  लग जा गले (वोह कौन थी?) ना कोई उमंग है ना कोई तरंग है (कटी पतंग), किसी राहपे किसी मोडपर (मेरे हमसफर), सनम तू बेवफा के नाम से मशहूर हो जाए (खिलौना) इक चेहरे पे कही चेहरे लगा लेते है लोग (दाग), घूँगराेंकी तरह बजता ही रहा हू मै (चोर मचाए शोर), तेरा मेरा साथ रहे (सौदागर) अब तो है उनसे हर खुशी अपनी (अभिमान),  रातकली एक ख्वाब मे आयी और गले का हार बनी (बुढ्ढा मिल गया) जिंदगी के सफर मे गुजर जाते है जो मकाम (आपकी कसम), ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना (मुकद्दर का सिकंदर) किसी बात से मै किसीसे खफा हूॅ ( बेमिसाल) कोई होता किसको अपना (मेरे अपने) जब तक रहे तनमे जिया (समाधी), मंझिले अपनी जगह है रास्ते अपनी जगह (शराबी) कुछ ना कहो कुछ भी ना कहो ( १९४२ ए लव्हस्टोरी) अशी गाणी मनात खोलपणे रुतुन बसली.

   माझे आवडते संगीतकार पंचम अर्थात राहुल देव बर्मन. त्यांनी किशोरकुमार व लता मंगेशकर यांच्याकडून एकापेक्षा एक सरस गाणी गाऊन घेतली. पण मला कायम नवल वाटत आले आहे ते जन्मापासून अंध असलेले गीतकार-संगीतकार-गायक रविंद्र इंद्रमणी जैन यांचे! साधे डोके  दुखत असले तरी काम धाम सोडून घरी बसणारे अनेक आळशी लोक मी पाहात आलो आहे. रविंद्र जैन यांनी अंध असताना उच्च शिक्षण तर घेतलेच; पण त्यांनी अलिगढच्या औष्णिक उर्जा केंद्रात इंजिनियर म्हणून कामही केले आहे. अंध मुलांसाठी ब्रेल लिपित माझी अनेक पुस्तके  प्रकाशित झाली असल्याने अंध व्यक्ती आणि त्यांचे जीवन हा माझ्या विशेष अभ्यासाचा विषय राहिला आहे. डोळ्यांसमोर कायम अंधार! ब्रेल लिपीतले वाचन आणि कानावर पडणारे अन्य शब्द, रेडिओ, टीव्ही ऐकणे आणि केवळ एवढ्या भांडवलावर स्वतःचे स्वतंत्र विश्व उभारणे, नजर नसताना मनाच्या चक्षुंनी जग अनुभवणे, इतरांना उच्च प्रतिचा काव्यानंद देणे, दर्जेदार संगीताची निर्मिती करुन रसिकांना तृप्त करणे यात रविंद्र जैन कुठेही कमी पडलेले नाहीत. त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांची थोडक्यात यादी देतो..म्हणजे या माणसाची रेंज काय अफाट होती याची साक्ष पटेल..सौदागर, चोर मचाए शोर, फकिरा, गीत गाता चल, दो जासूस, पति पत्नी और वो, चितचोर, आँखियोंके झरोकेसे, राम तेरी गंगा मैली,  हिना, इ. त्याशिवाय रामानंद सागरकृत प्रचंड लोकप्रिय दूरचित्रवाणी मालिका रामायणलाही रविंद्र जैन यांनीच  संगीतबध्द केले होते. खुला खुला गगन ये हरी भरी धरती जितना भी ‘देखू' तबियत नही भरती... ही काव्यपंवती ‘गीत गात चल' या गाण्यासाठी त्यांना सुचली कशी याचे मला आजपर्यंत नवल वाटत आले आहे. डोळे असून धड वाचता येत नाही, अक्षर ओळख असूनही चार चांगले शब्द लिहिता येत नाही, धड बोलता-गाता येत नाही असे अनेक नमुने मी अवतीभवती पाहतो..तेंव्हा पद्मश्री पुरस्कार सन्मानित कै. रविंद्र जैन यांच्याबद्दलचा आदर शतगुणित होतो.  

   अशाच या हिंदी चित्रपट सृष्टीत अनेक गीतकारांना तडजोडी करुन त्यांच्या मनात नसताना कारागिरी करुन गाणी लिहावी लागली आहेत. याला अपवाद गीतकार निरज म्हणजेच गोपालदास सवसेना होय. शशि कपूर, राखी अभिनित शर्मिली चित्रपटासाठी ‘कैसे कहे हम प्यार ने हम को क्या क्या खेल दिखाए' हे नितांतसुंदर गीत लिहीणाऱ्या निरज यांनी काही काळानंतर आपल्या प्रतिभेला साजेसे हिंदी चित्रपटसृष्टीत आता काही वाट्याला येत नाही हे समजल्यावर चित्रपट गीत लिहीणे थांबवले होते.

   ...पण तरीही हिंदी सिनेमांत वेगवेगळी गाणी येत राहिली. ती विशिष्ट वर्गाच्या पसंतीलाही धरुन असतील कदाचित आणि ष्टोरीची गरज म्हणून उच्च प्रतिभेच्या गीतकारांनीही लिहुन दिली. गुलजार यांचे मस्सकली मस्सकली हे त्यातलेच एक. याच्याच आगे-मागे कंबख्त ईश्क, बेबी को भैस पसंद है, फव्वा उडाने आयी, गोली मारो भेजे मे, तु मेरे अगलबगल है या टाईपचीही चित्रपटगीते आली आणि गेलीही! 

राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर.

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

पंचनामा