रोज दोन जीबी डाटा आणि चार तासांचा घाटा!

सध्याच्या युगाला मोबाईल युग असेही म्हटले जाते. केवळ भारताचाच विचार केला, तर येथील शहरी भागात नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांपासून ते वयोवृद्धापर्यंत प्रत्येकाच्या हातात आज स्मार्ट फोन आहे आणि त्या फोनमध्ये प्रतिदिन दोन जीबी डाटाचा रिचार्ज केलेला आहे. गेल्या काही वर्षांत भारतात मोबाईल आणि इंटरनेट क्षेत्रात जेव्हढी प्रगती झाली आहे, तेव्हढी अन्य कोणत्या क्षेत्रात झाली असेल, असे वाटत नाही. सीडीएमए मोबाईल, त्यानंतर जीएसएम कार्ड, कीपॅडचा मोबाईल ते आताचा स्मार्ट फोन असा केवळ मोबाइलचाच प्रवास थक्क करणारा आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रवासात आधीच्या तुलनेत मोबाईल वापरणे अधिक माफक होत गेले आहे. ३१ जुलै १९९५ या दिवशी भारतात पहिल्यांदा मोबाईलवरून संवाद साधला गेला. पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम याना पहिल्यांदा मोबाईलवरून संपर्क साधला. त्यानंतरचा काही काळ मोबाईल म्हणजे ‘स्टेटस सिम्बॉल' बनला होता, मोबाईलवरून फोन करणे आणि मोबाईलवर फोन स्वीकारणे दोन्हीही त्या काळात सामान्य नागरिकांना परवडणारे नव्हते. आऊटगोईंगसाठी प्रत्येक मिनिटाला १६ रुपये आणि इन्कमिंगसाठी ८ रुपये खर्चावे लागत होते. आज २८ वर्षांत थोड्या थोडक्या पैशांत आऊटगोईंग आणि इनकमिंग दोन्हीही सेवा अमय्राादित वेळ विनामूल्य झाल्या आहेत, एव्हढेच नव्हे, तर त्यासोबत इंटरनेट चालवण्यासाठी डाटाही फ्री मिळत आहे. लाईट आणि २जी नंतर ३जी -४जी चा टप्पा ओलांडत भारतात आता  ५जीचा काळ चालू झाला आहे. आज भारतात एका पोळीपेक्षा मोबाईलचा दिवसाचा सरासरी रिचार्ज किमतीने कमी झाला आहे. आधी टॉप-अप रिचार्जचा काळ होता. जेव्हढे संभाषण व्हायचे तेवढे रिचार्जमधील पैसे कमी व्हायचे, त्यामुळे मोबाईलवरील बोलणेही मर्यादेत आटपले जात असे. आता मोबाईल रिचार्ज मध्ये अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. सर्व रिचार्जमध्ये टॉकटाईम फ्री असल्याने त्याला गौण स्थान देऊन लोकांनी इंटरनेटचा वापर  अधिकाधिक  करावा यासाठी लोकांना आकर्षित करणारेच प्लान्स उपलब्ध करून दिले जात आहेत. प्रतिदिन एक जीबी डाटा देणाऱ्या आणि २ जीबी डाटा देणाऱ्या रिचार्जमध्ये थोड्याथोडक्या पैशांचा फरक असल्याने बहुतांश लोक प्रतिदिन २ जीबी डाटा देणारा प्लान निवडतात. २ जीबी डाटा सुद्धा ज्यांना अपुरा वाटतो त्यांच्यासाठी प्रतिदिन अडीच आणि तीन जीबी डाटा देणारेही प्लान आहेत. काही वर्षांपूर्वी एक जीबी डाटा एक महिनाभर पुरवून पुरवून वापरला जाई, तिथे अशी काय गरज निर्माण झाली कि लोकांना दोन जीबी डाटाही आता कमी पडू लागला आहे.

पूर्वी इंटरनेटचा मुख्य वापर ईमेल पाठवणे आणि स्वीकारणे यापुरता सीमित होता. त्याकाळी क्वचितच गूगलवर सर्फिंग केले जाई. आज मात्र ज्यांना आपण वापरत असलेल्या मोबाईलमध्ये ईमेल सुविधा आहे की नाही हेही माहित नाही त्यांनाही दिवसाला २ जीबी डाटा अपुरा पडत आहे. आज एखाद्या शहाण्या अभ्यासू विद्यार्थ्याला विचारले की इंटरनेटचा वापर कशासाठी केला जातो? तर तो उत्तर देईल 'इंटरनेटच्या मदतीने सर्फिंग करून कोणत्याही विषयातील आणि कोणत्याही क्षेत्रातील माहिती जगाच्या पाठीवरून एका क्लिकवर आपण शोधू शकतो, जगातील कोणाशीही आपण  इंटरनेटच्या साहाय्याने संपर्क साधू शकतो.' त्याचे म्हणणे खरे असले, तरी आजमितीला खरोखर या सर्व बाबींसाठी आपण इंटरनेटचा वापर करत आहोत का ? तर मुळीच नाही. मग आपला २ जीबी डाटा जातो तरी कुठे ? सामान्यतः आम्हा बहुतांश भारतीयांच्या मोबाईलमधील हा दोन जीबी डाटा खर्च होतो तो सोशल मीडियावर अनावश्यक वेळ घालवण्यात, रिल्स आणि शॉर्ट व्हिडीओज पाहण्यात, युट्युबवरील चित्रपट आणि वेब सिरीज पाहण्यात आणि ऑनलाईन गेम्स खेळण्यात. आज या सर्व गोष्टींमध्ये प्रतिदिन आपण एव्हढे तास खर्च करत आहोत  ज्याचा आपल्याला कधी हिशेबही मांडता येणार नाही. माणसाची एखाद्या क्षेत्रातील गरज वाढली की त्या क्षेत्रात उत्पादन करणारे अनेक निर्माते तयार होतात. ती गरज भागवण्यासाठी आणि ती अधिक तीव्र करण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या शोधल्या जातात. त्याप्रमाणे या क्षेत्रातही तेच चालले आहे. सोशल नेटवर्किंग साईट्‌सनी लोकांच्या गरजा ओळखून आपल्या साईट्‌स अद्ययावत केल्या आहेत. नवनवीन गेमिंग अँप्स निर्माण झाले आहेत. नवनवीन ओटीटी प्लॅटफॉर्म उदयास आले आहेत आणि त्यांवर वेब सीरिजचे पेव फुटले आहे. रिल्स आणि शॉर्ट व्हिडीओजचा तर इथे महापुरच आहे. प्रतिदिन केवळ भारतातून हजारो शॉर्ट  व्हिडीओज आणि रिल्स युट्युब आणि तत्सम साईट्‌सवर अपलोड केले जातात. युट्युबने अशा व्हिडीओ आणि रिल्स मेकर्सना खुले प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले आहे. अधिकाधिक तरुणांनी याच्या नादी लागावे यासाठी ठराविक सबस्क्राइबर आणि लाईक कमेंटची मर्यादा पार केल्यावर युट्युब अशा मेकर्सना पैसेही देऊ लागले आहे. परिणामी कमीतकमी  इन्व्हेस्टमेंट करून साईटवर आयते मटेरियल अपलोड केले जाऊ लागले आहे ज्यामधून प्रतिदिन कोट्यवधी रुपये युट्युब कमावत आहे. रिल्स बनवणारे आज गल्लोगल्ली तयार होऊ लागले आहेत. रिल्सच्या नादातून आज लहान मुलेही सुटलेली नाहीत. जसे मनोरंजन करणारे रिल्स आहेत तसे विनोदी, तांत्रिक ज्ञान देणारे, शासकीय योजनांची माहिती देणारे, चटकदार पदार्थाच्या रेसिपी सांगणारे, अंतराळापासून भूगर्भापर्यंतची माहिती देणारे, वैद्यकीय सल्ला सांगणारे, सौंदर्य टिप्स देणारे, राशी भविष्य सांगणारे, झटपट पैसे कमावण्याचा कानमंत्र देणारे, शेअर बाजारातील घडामोडी सांगणारे, कोणतीही विजेची उपकरणे आणि यंत्रे चुटकीसारखी कशी दुरुस्त करावीत याची माहिती देणारे, इलेक्टॉनिक उपकरणांची अनबॉक्सिंग करणारे, खेळाच्या सामन्यातील महत्वाचे प्रसंग दाखवणारे अशा एक ना अनेक विषयांवरील शॉर्ट व्हिडीओज आणि रिल्स आज मुबलक प्रमाणात अपलोड करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये दिवसागणिक भरच पडत आहे.  हे रिल्स आणि व्हिडीओज आपण प्रतिदिन गरज नसताना तासनतास पाहत असतो. या सर्व ज्ञानाचा आपण  दैनंदिन व्यवहारात किती उपयोग करतो ? काही प्रमाणात यांचा उपयोग होतही असेल; मात्र प्रत्यक्ष उपयोग आणि प्रतिदिन हे सर्व पाहण्यात आपण दिलेला वेळ याचे समीकरण कुठेतरी जुळते का ? लोकांना जुगारी बनवण्यासाठी अनेक अनलाईन गेमिंग अँप्स तयार करण्यात आले आहेत. दिग्गज खेळाडू आणि सिनेकलावंत या अँप्सच्या जाहिराती करून लोकांना त्यांच्या आहारी जाण्यास प्रवृत्त करतात. मैदानावरील खेळ राहतो बाजूला या गेमिंग अँप्सवर खेळण्यात आपला कितीतरी वेळ वाया जातो. यातून सुरुवातीला पैसा मिळतोही. कालांतराने खेळणारा कसा लुबाडला जातो याचा त्यालाही थांगपत्ता राहत नाही. वेळ पण जातो आणि पैसाही जातो. सरकारला यातून वारेमाप टॅक्स मिळत असल्याने त्यांवर बंदी घालण्याचा ते विचारही करत नाही.

आपण आपलेच पैसे खर्च करून प्रतिदिन दोन जिबी डाटा विकत घतो आणि तो डाटा खर्च करण्यासाठी (किंवा वसूल करण्यासाठी) आपला कितीतरी अमूल्य वेळ निव्वळ वाया घालवतो, सोशल नेटवर्किंग साईट्‌सवर आपण हजारो मित्र आणि फॉलोअर्स गोळा करतो; मात्र यापैकी किती जण उद्या आपल्या अडीअडचणींना धावून येणार आहेत ? जेव्हा आपल्यावर प्रतिकूल प्रसंग ओढवतो तेव्हा धावून येतात ते आपले शेजारपाजारचे मित्र, आपल्या जिवाभावाचे नातेवाईक. यांच्याशी नाते घट्ट करण्यासाठी मिळालेला वेळ आपण आभासी जगात रममाण होण्यात घालवत आहोत हे आपल्या केव्हा लक्षात येणार ? वेळेसारखी मौल्यवान गोष्ट अन्य कोणतीच नाही, कारण गेलेला क्षण आणि वेळ पुन्हा कधीच मागे फिरून येत नाही. देवाने प्रत्येकाला ठराविक कालावधीचे आयुष्य देऊनच पृथ्वीवर पाठवले आहे. प्रत्येकाकडे वेळ मय्राादित आहे. या मय्रादित वेळेचा कुठे आणि कसा वापर करावा यासाठी देवाने मानवाला बुद्धी आणि विवेक दिला आहे. ते सर्व बाजूला ठेऊन आपण या इंटरनेटच्या मायाजालामध्ये स्वतःला गुंतवून ठेवत असू तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच नाही का ? इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायणमूर्ती यांचे विधान मध्यंतरी चांगलेच गाजले होते. भारताला उत्पादकता वाढवण्याची गरज असून त्यासाठी तरुणांनी आठवड्याला ७० तास काम करण्याची तयारी ठेवली पाहिजे' असा सल्ला नारायणमूर्ती यांनी दिला होता. त्यांच्या या विधानाचे जेव्हढे स्वागत झाले त्याहून अधिक त्यांना विरोध झाला. कामासाठी ८ तास पुरेसे असून दिवसातील २४ तासांपैकी ८ तास काम, ८ तास झोप आणि ८ तास स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी दिले पाहिजे असे ज्ञान त्यावेळी अनेक तरुणांनी पाजळले होते. हे ज्ञान पाजळणारे तरुण आपल्यातीलच होते जे प्रतिदिन दोन जीबी डाटा संपवण्यासाठी दिवसातील ४-४ तास सोशल साईट्‌सवर आणि रिल्स पाहण्यात वाया घालवतात. आजमितीला उत्पादकतेमध्ये जपान आणि चीनचे उदाहरण आपण देतो. या देशातील जनता देशाची उत्पादकता वाढवण्यासाठी दिवसातील १२-१२ तास राबते. आपले देशप्रेम केवळ स्वातंत्र्यदिनाच्या आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी उफाळून येते. सीमेवरील सैनिकांचा अभिमान वाटायला लागतो, क्रांतिकारकांच्या स्मृती जागृत होतात. मात्र या सर्वांनी आपल्याप्रमाणे वेळ अनावश्यक गोष्टींत वाया घालवला असता तर आपण खरंच स्वतंत्र झालो असतो का ? आपल्यासह समाजाला, पर्यायाने देशाला पुढे घेऊन जायचे असेल तर आपल्या क्रयशक्तीचा योग्य विनियोग करायलाच हवा.


आज आपल्या प्रत्येकावर खरोखर जबाबदाऱ्यांचे एव्हढे ओझे आहे का ? आपण खरंच प्रचंड तणावाखाली काम करत आहोत का, की ज्यामधून रिलॅक्स होण्यासाठी आपल्याला प्रतिदिन मनोरंजनाची एव्हढी गरज भासते आणि त्यासाठी आपण तीन-चार तास रिल्स, गेम्स आणि सोशल नेटवर्किंग साईट्‌स पाहण्यासाठी देतो. जर तसे काही नसेल, तर हा वेळ आपण वाचवायला हवा. वाचलेला वेळ आपण प्रतिदिन कुटुंबासाठी, मित्रपरिवाराशी संवाद साधण्यासाठी, वाचनासाठी, छंद जोपासण्यासाठी, समाज आणि राष्ट्र हिताच्या कार्यासाठी द्यायला हवा. यातूनच आपले जीवन अधिक समृद्ध बनेल.   -जगन घाणेकर, घाटकोपर. 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी