एपीएमसी सभापती पदी प्रभु पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता

वाशी ः महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात आपल्या गटाचे वर्चस्व कायम राखण्यासाठी शिंदे गटातर्फे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. त्याच अनुषंगाने आता शिंदे गटाने त्यांचा मोर्चा ‘मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती'कडे (एपीएमसी) वळविला असून, एपीएमसी सभापती पदासाठी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे. लवकरच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीची जागा रिक्त होणार असून, त्याजागी बदलापूर मधील शिंदे समर्थक प्रभू पाटील यांची वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा एपीएमसी आवारात रंगू लागली आहे.

‘मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती'चे विद्यमान सभापती अशोक डक यांच्यासह बाजार समितीमधील इतर ७ संचालकांचा त्यांच्या स्थानिक एपीएमसी मधील कार्यकाळ संपल्याने  पणन खात्यामार्फत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधील संचालक पदे रद्द करण्यात आली होती. मात्र, राज्याचे पणन मंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील सुनावणी होईपर्यंत या आदेशाला स्थगिती दिली होती. परंतु १ डिसेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत एपीएमसी सभापती अशोक डक यांना  राजीनामा देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे खाजगी सुत्रांकडून समजते. त्यामुळे एपीएमसी मध्ये पुन्हा निवडणूक लागण्याची शक्यता असून, या ठिकाणी शिंदे गटाचे कट्टर समर्थक प्रभू पाटील यांची वर्णी लागण्याची चर्चा एपीएमसी वर्तुळात तसेच सर्वत्र सुरु आहे.

मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये सहा महसुल विभागातून प्रत्येकी २ असे १२ शेतकरी प्रतिनिधी संचालक म्हणून निवडून आले होते. त्यापैकी ७ जणांची त्यांच्या स्थानिक बाजार समिती मधील मुदत संपली आहे. त्यामुळे एपीएमसी नियमांनुसार त्या बाजार समिती मधील संचालकांची मुदत संपल्यानंतर त्या ठिकाणी पद रद्द झाले असेल तर एपीएमसी मध्ये संचालक पदासाठी अपात्र ठरतात. त्यानुसार सदर संचालक अपात्र ठरले होते. परंतु, या संचालकांनी न्यायालयामध्ये धाव घेऊन मुदतवाढ मिळवली आहे. त्यापैकी मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अशोक डक यांना १४  डिसेंबर २०२२ पर्यंत न्यायालयाने मुदतवाढ दिलेली आहे. त्याच दरम्यान पणन मंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपात्रतेच्या आदेशाला सुनावणी होईपर्यंत स्थगिती दिली होती. याबाबत पणन मंत्र्यांकडे बैठक घेण्यात येणार होती. गेल्या ऑक्टोबर महिन्यात ठरलेली सदर बैठक पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर २ डिसेंबर रोजी घेण्यात येणारी सुनावणी देखील पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र, याच दरम्यान १ डिसेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृह मध्ये झालेल्या बैठकीमध्ये एपीएमसी सभापती अशोक डक यांनी स्वतःहून सभापती पदाचा राजीनामा द्यावा अशा सूचना देण्यात आल्याचे खाजगी सुत्रांकडून समजते. तर येत्या ५ डिसेंबर रोजी मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये संचालक मंडळाची बैठक होण्याची शक्यता असून, याच बैठकीत अशोक डक त्यांच्या पदाचा राजीनामा देतील आणि नवीन मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती सभापतीची नेमणूक केली जाईल, अशी शक्यता आहे.

दरम्यान, आता राज्यात बीजेपी आणि शिंदे गटाची सत्ता आली असून, एपीएमसी मध्येही शिंदे गट आपली सत्ता स्थापन करणार अशी चर्चा एपीएमसी वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे आता ‘मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती'च्या सभापती पदी बदलापूर मधील संचालक प्रभू पाटील यांचीच वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे आगामी कालावधीत मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती मधील संचालक मंडळ बरखास्त होऊन नव्याने निवडणुका होतील का?, राज्याप्रमाणेच एपीएमसी मध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदे गट यशस्वी होईल का?, याकडे मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती मधील घटकांच्या नजरा लागल्या आहेत. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

शिवसेनेच्या सरपंच सह सर्व ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध