मालमत्ता कर अभय योजनेला 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ

नवी मुंबई :  मागील पावणेदोन वर्षांपासून कोव्हीडच्या कमी - जास्त प्रसारामुळे नोकरी, व्यवसाय व उद्योगधंद्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. तसेच नागरिकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या मालमत्ता कर अभय योजनेस मुदतवाढ देणेबाबत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना नागरिकांकडून विनंती करण्यात येत होती. 31 जानेवारी 2022 रोजी अभय योजनेच्या मुदतवाढीचा कालावधी संपत असल्याने आयुक्तांनी मालमत्ता कर अभय योजनेस 1 महिना म्हणजेच 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

      महानगरपालिकेच्या उत्पन्नातील मालमत्ताकर हा मुख्य स्त्रोत असून दि. 01 ऑक्टोबरपासून 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत थकीत मालमत्ता कराच्या दंडात्मक रक्कमेवर 75% सूट देणारी मालमत्ता कर अभय योजना जाहीर करण्यात आली होती. या अभय योजनेस 31 जानेवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि यामध्ये आणखी काही कालावधीची मुदतवाढ मिळावी, जेणेकरून मालमत्ताकराची थकाबाकी भरताना सवलतीचा लाभ घेता येईल अशाप्रकारची विनंती विविध स्तरांतून करण्यात येत होती. त्यानुसार महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी आणखी एक महिन्याची म्हणजेच 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत अंतिम मुदतवाढ जाहीर केली आहे.

     आता मालमत्ता कर अभय योजनेला 28 फेब्रुवारी 2022 पर्यंतची अंतिम मुदतवाढ देण्यात आल्याने थकबाकीदार नागरिक / व्यावसायिक यांनी आपल्या मालमत्ता कराची संपूर्ण थकित रक्कम अधिक 25% दंडात्मक रक्कम भरल्यास त्यांना दंडात्मक रक्कमेवर 75% इतकी मोठ्या प्रमाणावर सूट मिळणार आहे. तरी मालमत्ता कर थकबाकीदार नागरिकांनी या अंतिम मुदतवाढीच्या संधीचा लाभ घेऊन 28 फेब्रुवारी पर्यंत वाट न पाहता आजच नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या वेबसाईटला भेट देऊन दंडात्मक रक्कमेच्या सवलतीसह अभय योजनेचा लाभ घ्यावा व शहर विकासास हातभार लावावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई शहरातील उद्यानांचा ताबा मद्यापिंकडे ?