गद्दारी बंडखोरीला ऊत

आता जागृत झालेल्या जनतेकडून मतदारांकडून अशा स्वार्थी, गद्दार, बंडखोर, दलबदलूंना जनता जनार्दन नक्कीच त्यांची जागा दाखवणार आहे. आता तरी धडा घ्या आणि आपली स्वार्थी मानसिकता बदला. संपूर्ण जगात महाराष्ट्राला जे बदनामीला सामोरे जावे लागते, त्यात या सर्व मंडळीचा मोठा सहभाग आहे.

  ‘नेमेची येतो पावसाळा' याप्रमाणे नव्या पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या जातीच्या आणि वेगवेगळ्या रंगाच्या बेडकांची डराव डराव' आपल्या कानी ऐकू येते, यामध्ये विविध रंगाचे बेडकं फुगून ओरडत आपले लक्ष त्यांच्याकडे वेधत असतात. अशावेळी बेडकांसह कावळे, बगळे, गाढवेही न चुकता आपले रंग प्रदर्शित करतात, नेमकं याच पद्धतीने कोणत्याही निवडणुकांमध्ये आयाराम गयाराम गद्दार व बंडखोरांना अपेक्षित पक्षांकडून तिकीट मिळाले नाही, तर आपली नाराजी व्यक्त करून अपक्ष फॉर्म भरीत असतात. परंतु तिकडून तिकडे पक्षामध्ये बेडूक उड्या मारताना मात्र मी कसा पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता, पदाधिकारी आहे, असे बेंबीच्या देठापासून सांगणारी मंडळी त्यांच्या स्वार्थ आणि अपेक्षेप्रमाणे तिकीट न मिळाल्यास नाराजी व्यक्त करून त्या त्या पक्षाशी गद्दारी आणि बंडखोरी करतात हे निष्ठावंत कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांचे लक्षण आहे काय? याची सर्वसामान्य मतदार जनता नागरिकांना नेहमीच प्रश्न पडलेला आहे. हा निव्वळ प्रश्न नसून जनतेला वेडे समजून नको त्या मुद्यांकडे लक्ष वेधून नागरिकांना उल्लू बनवण्याचं काम हे करीत असतात.

   परंतु या स्वार्थी, बंडखोरी करणाऱ्यांना त्यांची निव्वळ स्वार्थी व ठोकपणे खोटं बोलून करताना सत्तेच्या लालची लोकांची फसवी आणि नाठाळ वृत्ती जनतेने नेमकी ओळखलेली आहे याचं भान या सर्वांनी ठेवणे गरजेचे आहे. मतदार किंवा नागरिक हे शेवटी महत्त्वाचा दुवा जनता जनार्दन आहेत, आपले सर्व मनसुबे ते जाणत आहेत. याबाबत वर्तनात बदल न घडवल्यास हीच जनता जनार्दन आपणास योग्य वेळी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही याची या सर्व आयाराम-गयाराम गद्दार आणि बंडखोरी करणाऱ्या लोकांनी गांभीर्यपूर्वक नोंद घेणे आवश्यक आहे. जनता, मतदार यांना सर्व माहीत असतं, त्यामुळे ”ये पब्लिक है, यह सब जानती है  हे गाणं या मंडळींनी ऐकलेल्या दिसत नाही, त्याहीपेक्षा आत्मसातही केलेलं नाही, असे स्पष्ट चित्र सध्या महाराष्ट्रात दिसते. यांच्या या नाठाळ वृत्तीमुळे महाराष्ट्राचे प्रतिमा अत्यंत मलीन करण्याचं काम यांनी केले आहे.

    त्यामुळे आता भविष्यामध्ये जागृत झालेल्या जनतेकडून मतदारांकडून अशा स्वार्थी, गद्दार,  बंडखोरांना जनता जनार्दन नक्कीच त्यांची जागा दाखवणार आहे. आता तरी धडा घ्या आणि आपली स्वार्थी मानसिकता बदला. संपूर्ण जगात महाराष्ट्राला जे बदनामीला सामोरे जावे लागते, त्यात या सर्व मंडळीचा मोठा सहभाग आहे, हे कदापि येथील नागरिक मतदार सहन करणार नाही. आता तरी आपलं शहाणपण बाजूला ठेवून निःस्वार्थपणे जनतेची सेवा करण्यास सज्ज व्हा. यापूर्वी आपण प्रत्येक पक्षाच्या नावावर उपभोगलेल्या मोठमोठ्या पदांवर विराजमान होऊन,बरीच माया जमवून आपण मायावी झालेला आहात, त्याचं अपचन होण्याआधीच सावध व्हा. पोटातील जागेप्रमाणेच खा, हा मोठ्या प्रमाणात जडलेल्या भस्म्या रोगाला वेळीच आवर घाला, ”पचेल तेवढेच खावं आणि रुचेल तेवढेच बोलावं, त्याचं अपचन होऊ नये याची काळजी घ्या. अन्यथा आपल्या विनाशकाले विपरीत बुद्धीमुळे विनाश निश्चित आहे, याची जनाची ना मनाची लाज बाळगा. महाराष्ट्राचा प्रामाणिकपणे विकास साध्य करण्यासाठी निःस्वार्थीपणे कार्यरत राहावे. अन्यथा जनता, मतदार आपली जागा निश्चित करणार आहेत; नव्हे..ती केलेलीच आहे.  मानसिकतेत बदल न केल्यास आपलेच भविष्य अंधारमय होणार हे नवकी! पुष्कळ संधी उपलब्ध आहेत. एकमेकांवरील चिखलफेक आणि फुकटची पोपटपंची करणं, बोलाचीच कडी बोलाचा भात ही वृत्ती सोडून, संधीचा योग्य वापर करा, महाराष्ट्राचा विकास घडवा. शहाण्यास शब्दाचा मार. सुज्ञांस अधिक सांगणे नाही. मानसिकता बदला महाराष्ट्रसह देशही बदलेल. -सुनील धाऊ झळके 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

कुठे थांबायचे नक्की झालं तो संतुष्ट