विरोधकांकडून होणारा अपप्रचार खोडून काढा

पनवेल : लोकसभा निवडणुकीप्रमाणे या विधानसभा निवडणुकीतही विरोधकांकडून स्वार्थापोटी खोटा प्रचार करुन जनतेची दिशाभूल करण्याबरोबरच समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे सदर खोटा प्रचार हाणून पाडण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सतर्क रहावे, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी येथे केले.

सेक्टर प्रमुख आणि सेक्टर प्रभारी यांची बैठक तसेच राज्यपाल नियुक्त आमदार विक्रांत पाटील यांचा सत्कार कार्यक्रम पार पडला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या कार्यक्रमाप्रसंगी आ. प्रशांत ठाकूर, आ. विक्रांत पाटील, ‘भाजपा'चे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ॲड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, दीपक बेहेरे, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक हरेश केणी, तालुका उपाध्यक्ष एस. के. नाईक, संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष ब्रिजेश पटेल, सुनील घरत, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, कर्जत अध्यक्ष राजेश भगत, ‘महिला मोर्चा'च्या तालुकाध्यक्षा कमला देशेकर, अध्यक्षा राजेश्री वावेकर, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह माजी नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सेक्टर प्रमुख आणि सेक्टर प्रभारी, पदाधिकारी उपस्थित होते.

लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला लागण्यासाठी आपण सर्व प्रकारच्या लढाई लढल्या आहेत. मोर्चे, आंदोलने, बैठका, पाठपुरावा केला आहे. त्या अनुषंगाने ‘दिबां'चे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला आणि  ‘दिबां'च्या व्यतिरिक्त इतर कोणाचेही नावाचा प्रस्ताव केंद्राकडे आला नसल्याचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आमचे सरकार ‘दिबां'च्या संघर्षाचा आणि आपल्या संघर्षांचा सन्मान करीत असल्याचे त्यांनी सांगून लवकरच ‘दिबां'चे नाव विमानतळाला जाहीर करण्याचे आश्वासनही केंद्र सरकारच्या वतीने त्यांनी दिले आहे. असे स्पष्ट असतानाही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला गेला. त्या अनुषंगाने स्वर्गीय रतन टाटा यांचे नाव देण्याच्या वावड्या उठवण्यात आल्या. त्यामुळे अशा प्रकारच्या अनेक बाबतीत विरोधाभास निर्माण करुन खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जाईल, त्यांच्या भूलथापांना जनता भुलणार नाही. मात्र, आपणही त्यांचा अपप्रचार खोडून काढला पाहिजे, असेही रामशेठ ठाकूर यांनी सांगितलेे.

‘भाजपा'च्या कार्यकर्त्याला संधी मिळते त्याचे उदाहरण आमदार विक्रांत पाटील आहेत. आपल्याला कधी काही मिळेल याची अपेक्षा कार्यकर्ता बाळगत नाही तर काम करत राहायचे असा भाजप कार्यकर्त्याचा पिंड आहे. बाळासाहेब पाटील यांनी गेली ४० वर्षे मेहनत आणि जिद्दीने काम केले, असे सांगतानाच विक्रांत पाटील यांनी केलेली मेहनत फळाला आली असल्याचे आ. प्रशांत ठाकूर यांनी गौरवोद्‌गार काढले. खारघर टोलमुक्ती करण्याच्या दृष्टिकोनातून आपण ‘भाजपा'त सहभागी झालो. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला टोल मुक्तीचा शब्द दिला होता आणि तो शब्द त्यांनी पूर्ण करुन दिल्याने त्या ऐतिहासिक निर्णयाचा फायदा वाहन चालकांना झाला, असे आमदार ठाकूर म्हणाले.

यावेळी आ. विक्रांत पाटील यांनी आपल्या जीवनातील राजकीय आढावा मांडला. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

कर्मचाऱ्याच्या मदतीसाठी धावली ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'