कर्मचाऱ्याच्या मदतीसाठी धावली ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'
नवी मुंबई : परिवहन सेवेत ऑनड्युटी असताना झालेल्या अपघातात जखमी झालेल्या चालकाच्या उपचाराचा खर्च महापालिका प्रशासनाने न केल्यास संबंधित कर्मचाऱ्याच्या उपचाराचा सर्व खर्च ‘युनियन' करणार असल्याची माहिती कामगार नेते तथा ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'चे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी दिली.
नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या आसुडगांव डेपो मधील चालक राजकुमार सोनकांबळे (चालक नंबर १५८६) १६ ऑक्टोबर २०२४ रोजी बस मार्गिका क्र.५९(एमएच ४३ बीजी ९८६२) वर नियोजित कामगिरी करत असताना आदई तलाव, पनवेल येथे ड्रायव्हर साईटचा बसचा दरवाजा अचानक उघडला गेला. त्यावेळी चालक राजकुमार सोनकांबळे यांनी तातडीने पुढील अपघात टाळण्यासाठी वेळेत सावधगिरी बाळगून दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. पण, या प्रयत्नामध्ये सोनकांबळे यांचा बाहेरच्या बाजुला तोल गेल्याने ते चालत्या बसमधून खाली पडले गेले. यात सोनकांबळे यांच्या डाव्या पायाला जबर मार लागला असून तपासणीअंती डॉक्टरांकडून ३ जागी फ्रॅक्चर सांगण्यात आले आहे. चालक सोनकांबळे यांच्या कमरेत तसेच हाताला मार लागला आहे. तसेच त्यांच्या पायात रॉड टाकण्यास डॉक्टरांकडून सांगण्यात आले असून ते वाशी मधील महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात उपचार घेत आहेत.
चालक सोनकांबळे यांच्या या अपघाताची माहिती मिळताच कामगार नेते रविंद्र सावंत परदेशातून परतताच मुंबई विमानतळावरुन घरी न जाता थेट वाशीतील प्रथम रुग्णालयात धाव घेत सोनकांबळे यांची भेट घेतली. तसेच डॉक्टरांकडून सोनकांबळे यांच्या प्रकृतीची माहिती जाणून घेतली. तत्पूर्वी ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'च्या पदाधिकाऱ्यांनी परिवहन व्यवस्थापक योगेश कडुस्कर यांची भेट घेतली आहे. तसेच ‘युनियन'तर्फे महापालिका आयुवत आणि परिवहन व्यवस्थापक यांना निवेदन दिले आहे. कर्मचाऱ्यांना मेडीक्लेम नाही, आरोग्य सुविधा नाही, उपचाराचा खर्च दिला जात नाही, उपचारासाठी गैरहजर राहिल्यास वेतनातून कपात केली जाते. वारंवार पाठपुरावा करुनही महापालिका प्रशासन कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत, उपचाराबाबत उदासिनता दाखवित असल्याचा संताप व्यक्त करत महापालिकेने कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप रविंद्र सावंत यांनी यावेळी केला.
तर रविंद्र सावंत यांनी परिवहन व्यवस्थापक कडुस्कर यांच्याशी चर्चा केल्यानंतर परिवहन उपक्रमाने चालक राजकुमार सोनकांबळे यांच्या वैद्यकीय उपचाराच्या खर्चाची जबाबदारी घेतली आहे. तरीही परिवहन उपक्रमाने सदर खर्चाची जबाबदारी न घेतल्यास ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन' जखमी चालक सोनकांबळे यांच्या उपचाराचा सर्व खर्च करेल, अशी माहिती रविंद्र सावंत यांनी दिली.
याप्रसंगी सावंत यांच्यासमवेत अशोक बिराजदार, नितीन गायकवाड, कांतीलाल चांदणे, गोविंद गायकवाड, हरी गायकवाड, चिंतामणी पाटील, ईजू राठोड, जितेश तांडेल, रमेश गायकवाड, राजू शेल्हाळकर, अकबर मुलानी, बाळू भालेराव, दादू भालेराव, संतोष पवार, अमित जाधव, रवी सोमवंशी, नरेश माघाडे, प्रकाश भोईर, शंकर सावंत, विकास कासार, संभाजी घोडके, गुरुनाथ सूर्यवंशी, निलेश कन्हैया, आदि पदाधिकारी उपस्थित होते.