नवी मुंबईत भाजपला खिंडार
नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीला खिंडार पडले आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर पक्षनेतृत्वावर नाराज झालेल्या भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार संदीप नाईक यांनी कमळाचे फुल खाली ठेवून भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्याचवेळी निर्धार मेळाव्याचे आयोजन करुन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संदीप नाईक यांनी तुतारी फुंकली आहे. यावेळी संदीप नाईक यांच्यासमवेत माजी महापौर, माजी उपमहापौर, माजी स्थायी समिती सभापती, माजी विरोधी पक्षनेते, आदि २९ लोकप्रतिनिधी यांच्यासह भाजपा महिला जिल्हाध्यक्षा, इतर सेलचे पदाधिकारी आणि इतर पक्षीय पदाधिकारी यांनी देखील राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला.
दरम्यान, संदीप नाईक यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे आता बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या मंदाताई म्हात्रे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) संदीप नाईक यांच्यात थेट सामना होणार आहे.
वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे झालेल्या सदर पक्षप्रवेश कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादीच्या प्रदेश पदाधिकारी भावना घाणेकर, वंदना राजपूत, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सलुजा सुतार, माजी महापौर जयवंत सुतार, आदि उपस्थित होते.
ज्याप्रमाणे चंद्र कलेकलेने वाढतो, तसाच आपला राष्ट्रवादी पक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात चांगल्या गतीने वाढला आहे. आज महाराष्ट्रभर तुतारीचा आवाज गुंजत आहे. त्यामुळे राज्यामध्ये सत्ताधारी पक्षात असणारी नेतेमंडळी, कार्यकर्ते त्यांच्या पक्षात अस्वस्थ असून ते शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांना आपल्याकडे येण्याची उत्सुकता लागली आहे. त्यामुळे आपल्याला आता नुसतेच बेलापूर मध्येच तुतारी फुंकायची नसून संबंध महाराष्ट्रभर महाविकास आघाडीचे सरकार निवडून आणायचे आहे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी केले.
संदीप नाईक यांच्या पक्षप्रवेशाने आपले हरवलेले पुन्हा गवसले, त्याने आम्हाला आनंद झाल्याचे सांगत जयंत पाटील यांनी काम करणाऱ्या नेत्याच्या मागे कार्यकर्ते असल्याचा प्रत्यय आज पुन्हा आला. आता बेलापूर मध्ये परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास व्यवत केला. तसेच तुम्ही मनात आणले तर बेलापूरचा आमदार निवडून आणू शकता, अशी जयंत पाटील यांनी उपस्थितांना साद घातली.
२०१९ मध्ये अशी काही परिस्थिती निर्माण झाली की, त्यामुळे आम्हाला पक्ष बदलाचा निर्णय घ्यावा लागला होता. नवी मुंबईच्या विकासासाठी निर्णय घ्यावा लागला होता. मी दोन टर्म आमदार असताना देखील आम्हाला विकासासाठी थांबावे लागले. लगेचच निवडणुका लागल्या. यानंतर आम्ही आणि आमच्या कार्यकर्त्यांनी जोमाने काम करुन ऐरोली आणि बेलापूर मध्ये पक्षाचे आमदार निवडून आणले. यानंतर आम्ही बेलापूरमध्ये कायम अपमान सहन केला. पण, नवी मुंबईचा होणारा ऱ्हास आम्ही सहन करणार नाही, असे सांगत संदीप नाईक यांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टिका केली.
आम्हाला जो सन्मान मिळाला पाहिजे होता, तो सन्मान आम्हाला आजही मिळाला नाही. २०२४ ला सन्मान मिळून कार्यकर्त्यांना न्याय मिळेल, असे वाटले होते. मात्र, दुर्देवाने एकतर्फी निर्णय घेतला गेला. आमच्या कार्यकर्त्यांना अपमान करणारी वागणूक मिळाली. त्यामुळे नवी मुंबईतील नागरिकांसाठी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय मी घेतला आहे. माझी लढाई नवी मुंबईच्या हिताकरिता आहे. त्यामुळे येणारी लढाई स्वाभिमानीसाठी आहे, असे संदीप नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, शरद पवार यांनी नवी मुंबई शहर वसल्यानंतर साडेबारा टक्केच्या प्रश्नापासून नवी मुंबई महापालिका स्थापनेपर्यंत कशा प्रकारे विकास केला ते संदीप नाईक यांनी मांडले. नवी मुंबई महापालिकेसाठी पाण्याचा प्रश्न आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने आमच्या नेतृत्वाने (गणेश नाईक) सोडवला. पण, २०२१ पासून नवी मुबईकरांचे हवकाचे पाणी दुसरीकडे वळविण्यात येऊ लागल्याने आज शहरवासियंना पाण्याचा समस्येला सामोरे जावे लागले आहे. आर्थिक स्थिती चांगल्या असलेल्या महापालिकेच्या पैशांर वारेमाप खर्च होऊ लागले. त्यामुळे जेव्हा जेव्हा अन्याय झाला त्यावेळी आम्ही आवाज उठवला. पण, काही जणांनी भूमिका घेतली नाही, असा टोला संदीप नाईक यांनी यावेळी विरोधकांना लगावला.