ठाणे मधील विविध प्रकल्पांचे लोकार्पण-भूमीपुजन संपन्न

ठाणे : आजचा दिवस इतिहासात सूवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. एकाच इमारतीत १२ राज्यातील १२ समाजासाठी जागा दिली जात असून अशा प्रकारचे समाज भवन प्रथमच साकारले जात आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कासार वडवली येथील समाज भवनाच्या भूमीपुजन समारंभात केले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे महापालिका क्षेत्रातील, ओवळा-माजिवडा भागातील आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांनी साकारलेल्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपुजन संपन्न झाले. याप्रसंगी खासदार नरेश म्हस्के, आ. प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर अशोक वैती, माजी नगरसेवक राम रेपाळे, परिषा सरनाईक, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, आदि उपस्थित होते.

नागला बंदर येथे सर्वात मोठी चौपाटी विकसित झाली आहे. एका बाजुला डोंगर, मध्ये खाडी, त्या किनारी भागात अर्बन फॉरेस्ट असे सगळीकडे उपलब्ध होत नाही. ते ठाण्यात उपलब्ध आहे. ठाणेकरांना तणावमुक्त जीवन जगण्यासाठी, मनोरंजनासाठी सदर मोठी सुविधा विकसित झाली आहे. त्याचे उद्‌घाटन संपन्न झाले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमाराची प्रतिकृती तयार करण्याच्या प्रकल्पाचे भूमीपुजनही करण्यात आले. १२ समाजाचे मिळून समाज भवनाचेही भूमीपुजनही केले. ठाणे खरेच खूप बदलते असून शहराचा विकास झपाट्याने होत आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. 

मुंबई-ठाण्यात जागा मिळणे कठीण आहे. पण, आम्ही वचन दिल्याप्रमाणे सर्व समाजांसाठी भवन उभे राहणार आहे. प्रत्येक समाजाला ३ हजार फुटांची जागा मिळणार आहे. प्रत्येक मजल्यावर २ समाजांसाठी जागा असेल. त्याचे भाडे नाममात्र एक रुपया ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले आहेत. या तयार होणाऱ्या इमारतीची देखभाल करणे, ती उत्तम ठेवणे आणि सुविधा सर्व समाजाला उपलब्ध करून देणे, अशी सर्व समाजांची जबाबदारी आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांचे ठाणे बदलत असताना हरित ठाणे या अभियानात १ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे मुख्यमंत्री शिंदे यांनी अभिनंदन केले.

गायमुख ते फाऊंटन भुयारी मार्ग, ठाणे-बोरीवली भुयारी मार्ग, आनंदनगर-गायमुख बायपास यांचीही कामे होणार आहेत. ठाणे बदलत असल्याचे आपल्याला सगळीकडे दिसत आहे. या विकासाने ठाण्यात सोनेरी कळस गाठला आहे, असे खा. नरेश म्हस्के म्हणाले. तर तब्बल १२ समाजांना सामावून घेणारे समाज भवन अनोखी गोष्ट आहे. ती वचनपूर्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे शक्य झाल्याचे प्रतिपादन आमदार प्रताप सरनाईक यांनी केले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करा, अन्यथा योग्य धडा शिकवू