मोरबे धरण जलपूजन वादात
नवी मुंबई : महापालिका प्रशासनाच्या मोरवे धरण जलपूजन कार्यक्रमाचे भाजपाधार्जिणे राजकारण जाणिवपूर्वक केल्याचा काँग्रेसकडून महापालिका आयुक्तांकडे नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत व काँग्रेसचे ऐरोली विधानसभेतील युवा नेते व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली निषेध करण्यात आला व यावेळी पालिका आयुक्तांना काँग्रेसच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी पालिकेच्या पक्षपातीपणा विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाही दिल्या.
नवी मुंबईकरांना पाणी पुरविणाऱ्या मोरबे धरणाचा जलपूजन कार्यक्रम गुरुवारी पालिका प्रशासनाच्या वतीने पार पडला. संततधार पावसामुळे मोरबे धरण भरले आणि नवी मुंबईकरांची पाणीचिंता मिटली. मुंबईनंतर स्वमालकीचे धरण असणारी नवी मुंबई ही केवळ राज्यातील एकमेव महापालिका आहे. मोरबे भरल्याचा आनंद प्रत्येक नवी मुंबईकराला होणे स्वाभाविकच आहे. पाणीकपात, पाणीटंचाई आदी समस्या आता नवी मुंबईकरांपुढे निर्माण होणार नाहीत. परंतु नवी मुंबई महापालिका प्रशासनाने मोरबे धरणाच्या जलपूजनाच्या कार्यक्रमाला राजकीय रंग दिला. या कार्यक्रमास विरोधी पक्षाच्या नेत्यांना सदस्यांना, माजी नगरसेवकांना तसेच महापालिकेच्या माजी उपमहापौरांना निमंत्रित न करता केवळ भाजपाच्या आमदारांसह, भाजपाच्या माजी महापौरांना व भाजपाच्या माजी नगरसेवकांनाच निमंत्रित करुन या कार्यक्रमाला भाजपाधार्जिण्या राजकारणाचे स्वरुप आणले, त्याचा सर्वप्रथम काँग्रेस पक्षाच्या वतीने नवी मुंबई जिल्हा प्रवक्ता विंद्र सावंत यांनी महापालिकेचा निषेध केला.
या महापालिकेत काँग्रेस पक्षाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक, प्रदेश पदाधिकारी रमाकांत म्हात्रे, अविनाश लाड, सौ. मंदाकिनी रमाकांत म्हात्रे यांनी उपमहापौरपद भूषविले असून ते नवी मुंबईचे रहीवाशी आहे. पालिकेने जलपूजनाच्या कार्यक्रमात या माजी उपमहापौरांना डावलले. शिंदे गट शिवसेनेच्या लोकांनीही महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद सांभाळले आहे, त्यांनाही पालिका प्रशासनाने कार्यक्रमाचे निमत्रंण दिले नाही. म्हणजे पालिका प्रशासनाने भाजपा वगळता सर्वच विरोधी पक्षांना या निमत्रंण प्रक्रियेतून जाणिवपूर्वक डावलले असल्याचा आरोप करत रविंद्र सावंत यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास वस्तूस्थिती आणून दिली.
मोरबे धरण हे भाजपाचेच असल्याचे चित्र आपण या जलपूजनाच्या कार्यक्रमातून निर्माण केले आहे. धरण महापालिकेचे, धरण सर्व नवी मुंबईकरांचे असतानाही केवळ भाजपाच्या लोकांना पालिका प्रशासनाने निमंत्रित केले आहे. यातून पालिका प्रशासन नवी मुंबईकरांना काय संदेश देवू इच्छित आहे, त्याचा पालिका प्रशासनाने खुलासा करणे आवश्यक आहे. मोरबे धरण खरेदी व्यवहारात तसेच मोरबे धरण नवी मुंबई शहराला, नवी मुंबईकरांना मिळवून देण्यात भाजपाचे काडीमात्रही योगदान नाही, हे सर्वप्रथम आम्ही आपल्या निदर्शनास आणून देत आहोत. मोरवे धरणासाठी काँग्रेसने राज्य पातळीवर, मंत्रालयीन दरबारी पाठपुरावा केला होता. नवी मुंबईतील काँग्रेस नेत्यांनी मोरबे धरणाची किंमत कमी करण्यासाठी पाठपुरावा केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे योगदान नवी मुंबईकर विसरणार नाही. तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांची मोरबे धरण खरेदी प्रक्रियेत महत्वाची भूमिका होती. काँग्रेसच्या पाठपुराव्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मोरबे धरणाची खरेदी किंमत कमी झाली होती. अन्यथा त्यावेळी महागड्या दरातही मोरबे धरण खरेदी करण्याची काही राजकीय नेत्यांची मानसिकता असल्यामुळेच त्यांनी किंमत कमी करण्यासाठी काहीही प्रयत्न केले नव्हते. त्यावेळी केवळ काँग्रेसच्या अनिल कौशिक, संतोष शेट्टी, रमाकांत म्हात्रे, या स्थानिक मातब्बरांनीच पाठपुरावा केला होता, मंत्रालयात चपला झिजविल्या होत्या, याचे यानिमित्ताने महापालिका प्रशासनाला रविंद्र सावंत यांनी स्मरण करुन दिले.
गणेश विसर्जनाच्यावेळी महापालिका प्रशासन त्या त्या तलावांमध्ये तसेच कृत्रिम तलावांमध्ये गणेश भक्तांना फुले, हार वाहून देत नाही. विसर्जन स्थळी निर्माल्य कलश ठेवलेले असतात. मोरबे तर नवी मुंबईकरांसाठी महत्वाचे धरण आहे. मोरवेमुळे नवी मुंबईकरांना पाणी मिळते. मग त्याच मोरबे धरणात जलपुजनाच्या वेळी उपस्थितांना धरणमध्ये फुले वाहण्याचा प्रकार महापालिका आयुक्तांसमोर घडला. त्यांना फुले वाहण्याची परवानगी कोणी दिली? हे घडत असताना महापालिका आयुक्त व अन्य अधिकाऱ्यांनी केवळ बघ्याची भूमिका का घेतली? या गोष्टींचा महापालिका प्रशासनाकडून लेखी खुलासा होणे आवश्यक आहे. जलपूजनासारख्या कार्यक्रमाचे राजकीयकरण विशेषत: भाजपाधार्जिणे रंग देवून महापालिका प्रशासनाने नवी मुंबईकरांचा अपमान केला आहे. या गोष्टीचे आम्हाला कोणतेही राजकीय भांडवल करायचे नाही. सर्व प्रकार नवी मुंबईकरांनी पाहिलेला आहे. यापुढे जलपूजन करताना सर्वपक्षीयांना निमंत्रित करावे व नवी मुंबईकरांना पाणी पुरविणाऱ्या धरणामध्ये फुले टाकण्याची प्रथा बंद करावी. असे प्रकार पुन्हा घडल्यास काँग्रेस व इतर पक्षांच्या वतीने आपल्या दालनातच ठिय्या आंदोलन व महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन छेडले जाईल याची नोंद घ्यावी. जलपूजनासारख्या पवित्र कार्यक्रमाचे भाजपाधार्जिणे राजकारण करण्याच्या महापालिकेच्या प्रयत्नाचा रविंद्र सावंत यांनी पुन्हा एकवार निषेध केला.
यावेळी नवी मुंबई जिल्हा उपाद्यक्ष अंकुश सोनावणे, नवी मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदेश बनसोडे, नवी मुंबई जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष श्री मल्हार देशमुख,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव प्रणित शेलार, उपाध्यक्ष भीमराव भोसले व सुनील किंद्रे, सरचिटणीस इसाहक खान, बेलापूर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहिंदर म्हात्रे, सूर्या निवडुंगे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.