ठाकरे गटाला धक्का!

सरपंचपदी शिंदे गटाच्या प्रणाली म्हात्रे यांची निवड

उरण : उरण तालुक्यातील सर्वात श्रीमंत  समजली जाणारी जसखार ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ‘शिवसेना-ठाकरे गट'च्या काशिबाई ठाकूर कार्यरत होत्या. परंतु, सरपंच काशिबाई ठाकूर यांचे पद शासकीय जागेत केलेल्या अतिक्रमणामुळे कोकण विभागीय आयुवतांनी अपात्र ठरविले आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या काशिबाई ठाकूर यांना सरपंच पदावरुन पायउतार व्हावे लागले असून शिवसेना शिंदे गटाच्या प्रणाली किशोर म्हात्रे यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला आहे.

काशिबाई ठाकूर यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केल्याचे उघड होताच जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी १९ जुलै २०२४ रोजी अपात्र केले होते. परंतु, काशीबाई ठाकूर यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात कोकण आयुक्त यांच्याकडे अपील केले होते. या अपिलावरील पहिल्या सुनावणीच्या वेळी अतिरिक्त विभागीय आयुक्त विकास पानसरे यांनी २ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशावर स्थगिती दिली होती. परंतु, पुढील सुनावणीला सामनेवाला यांचे वकील ॲड. परेश देशमुख यांनी आपली बाजू मांडल्यानंतर अतिरिक्त आयुक्त विकास पानसरे यांनी २३ ऑगस्ट रोजी रोजी काशिबाई ठाकूर यांचे अपील फेटाळले आहे. तसेच जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडील (आदेश क्र. ग्रामपंचायत विवाद अर्ज क्र.०१/२०२३) १७.७.२०२४ रोजी दिलेला आदेश कायम केला आहे.

कोकण विभागीय अतिरिवत आयुवतांच्या या आदेशामुळे सातत्याने लक्ष घालून असलेल्या उरणचे माजी आमदार मनोहर भोईर आणि ठाकरे गटाला ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. आता पुन्हा एकदा सरपंच म्हणून  शिंदे गटाच्या प्रणाली म्हात्रे यांनी पदभार स्वीकारला आहे. प्रणाली म्हात्रे यांच्यावर आता अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

वाशीकरांना लवकरच २.२६ कोटी निधीतून बहुउद्देशीय इमारत