महापुरुषांच्या पुतळ्याचे संरचनात्मक लेखापरीक्षण करण्याची ‘युवा सेना'तर्फे मागणी
नवी मुंबईः दोन दिवसापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट, मालवण येथे निकृष्ट दर्जाच्या कामामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा २५ फुट उंच पुतळा कोसळला. या घटनेमुळे तमाम शिवभक्त आणि शिवप्रेमी यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
त्यामुळे ‘शिवसेना (उबाठा) युवा सेना'च्या वाशी मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निषेध व्यक्त करुन छत्रपतींच्या पवित्र मूर्तीस दुग्धाभिषेक केला. तसेच नवी मुंबईतील महापुरुषांचे पुतळे कोसळून पुन्हा कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी नवी मुंबई महापालिका आयुक्त यांची भेट घेऊन त्यांच्याकडे महापुरुषांच्या पुतळ्यांचे संरचनात्मक लेखा परीक्षण करण्याची मागणी केली. त्यावर आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच नवी मुंबई शहरातील महापुरुष पुतळ्यांचे संरचनात्मक लेखापरीक्षण करण्याची ग्वाही दिली.
याप्रसंगी शिवसेना महानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर, चेतन नाईक, विभागप्रमुख विशाल विचारे, निखील मांडवे, सिध्दाराम शिलवंत, राजेश मोरे, श्रीकांत भोईर, गीतेन पाटील, प्रल्हाद गायकवाड, सागर म्हात्रे, आदि उपस्थित होते.