नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या जनसंवादात आ. गणेश नाईक यांचा गौरव 

नवी मुंबई :  नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने लोकनेते गणेश नाईक आणि माजी आमदार संदीप नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत  जनसंवाद उपक्रमाचे आयोजन वाशी येथे करण्यात आले होते. या जनसंवाद उपक्रमात  दशरथ भगत यांच्या अध्यक्षतेखाली गणेश नाईक यांचा जनगौरव करण्यात आला.

वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात मोठ्या संख्येने नागरिक आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी  उपस्थित होते. 

सुसंवादातून सुसंस्कृत विकास आणि सन्मान या शीर्षकाअंतर्गत  पार पडलेल्या या कार्यक्रमामध्ये वाशी येथील 65, 77 आणि 78  या तिन्ही प्रभागांमधील नागरिकांनी विविध प्रलंबित कामे याविषयीची तसेच विविध सामाजिक संघटनांनी   निवेदने सादर केली.ही निवेदने संबंधित विभागाकडे पाठवून  त्याची निश्चितपणे सोडवणूक करण्याची ग्वाही आमदार नाईक यांनी दिली. 

विकसित नवी मुंबई घडविणारे  आ. गणेश नाईक यांचा जनतेच्या वतीने भव्य नागरी सत्कार यावेळी पार पडला. या कार्यक्रमास नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजक, नवी मुंबई  पुनर्वसन सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, युवा नेते निशांत भगत, समाजसेवक संदीप भगत, माजी नगरसेविका  फशीबाई भगत, अंजली वाळुंज, माजी नगरसेवक घनश्याम मढवी,  राजेश शिंदे, भरत नाईक आणि 20 पेक्षा अधिक सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठांचा सन्मान  करण्यात आला व त्यांस सन्मानपूर्वक छत्र्यांची भेट देण्यात आली.

कार्यक्रमाची प्रस्तावना करताना  युवा नेते निशांत भगत यांनी  आमदार नाईक नवी मुंबईची काळजी वाहणारे  एकमेव नेतृत्व असल्याचे सांगितले. तर संदीप नाईक यांचे नेतृत्व भविष्यवेधी असून  शिक्षण व्हिजन, आरोग्य व्हिजन, उद्यान व्हिजन, तलाव व्हिजन यासारख्या धोरणाअंतर्गत  त्यांनी विकास कामे  उभी केल्याचे नमूद केले.   

नवी मुंबई शहर शांत, सुरक्षित कसे राहील याला  गणेश नाईक यांनी प्राधान्य दिले आहे. भविष्यात देखील गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली  शहराचा विकास होत असताना जल, जंगल आणि जमीन यामुळे विस्थापित झालेल्याना न्याय मिळून त्यांचे पुनर्वसन होण्यासाठी आपणास गणेश नाईक यांच्या नेतृत्वा खाली चळवळ उभी करायची असल्याचे दशरथ भगत यांनी सांगितले. स्थानिक, प्रकल्पग्रस्त, मच्छिमार यांच्या जमिनी सिडकोने संपादित केल्या. या घटकांसाठी गृह योजनांमधून तसेच भूखंड योजनांमध्ये  50 टक्के घरे राखीव ठेवण्याची मागणी दशरथ भगत यांनी यावेळी केली. 

संदीप नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना  स्थानिक, प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र, मच्छीमार अशा सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देणाऱ्या नवी मुंबई सामाजिक पुनर्वसन  संस्थेच्या कार्याचा गौरव केला. 

नवी मुंबई शहराची प्रगती एका रात्रीत किंवा काही वर्षांमध्ये झालेली नसून  गेल्या अनेक वर्षात आमदार गणेश नाईक यांच्या व्हिजनरी  नेतृत्वाचे  हे फलित असल्याचे त्यांनी सांगितले. शहर विकासाचा कोणताही भार  त्यांनी जनतेवर पडू दिलेला नाही. नवी मुंबईतील संसाधनांचे त्यांनी रक्षण केले.  नाईक यांनी सदैव नवी मुंबई आणि नवी मुंबईकरांच्या  हिताचाच विचार केला असल्याचे  त्यांनी  नमूद केले. 

सत्काराला उत्तर देताना  आमदार गणेश नाईक यांनी  नवी मुंबईच्या विकासाचे श्रेय  येथील सुजान जनतेला  देत  आपण मात्र निमित्त  असल्याचे  सांगितले. नवी मुंबईच्या आजवरच्या  विकासाचा आढावा घेत त्यांनी  मागील 25 वर्षे  एका नेतृत्वाच्या  हाती जनता जनार्दनाने  सत्ता दिल्याचे नवी मुंबई एकमेव उदाहरण आहे. मागील 20 वर्षे  नवी मुंबईमध्ये  मालमत्ता कर आणि पाणीपट्टी मध्ये  वाढ होऊ दिली नाही. पुढील 20 वर्षे देखील  कोणतीही करवाढ होऊ देणार नाही असा शब्द त्यांनी दिला. महापालिकेच्या माध्यमातून  मोरबे धरण विकत घेण्याचे धाडस केल्याने आज नवी मुंबई जलसंपन्न आहे.  नर्सरी ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतचे इंग्रजी शिक्षण मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची करून महापालिकेच्या माध्यमातून देण्यात येईल. परिवहन सेवेमधून  ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सुविधा सुरूच राहील. 500 चौरस फुटापर्यंतच्या  निवासी घरांना संपूर्ण मालमत्ता करमाफी सरकारकडून आदेशित करून घेतली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी  प्रत्येक नोड मध्ये शाळा आणि ईटीसी  केंद्र  सुरू करण्यात येईल.  स्वर्गीय दि बा पाटील  विकास मंडळ शासनाच्या माध्यमातून मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करू, असे जाहीर करून बीएमटीसी कामगारांना नुकसान भरपाईची योजना जाहीर झाल्याची माहिती त्यांनी दिली. 

प्रकल्पग्रस्तांची, एलआयजीची  आजपर्यंतची सर्व  गरजेपोटीची  बांधकामे मालकी हक्कासह नियमित करावीत. झोपडीधारकांची आजपर्यंतची सर्व घरे मालकी हक्काने नियमित करावीत. या घटकांना त्यांच्या इच्छेनुसार हवी असलेली योजना राबवावी, अशी भूमिका असल्याचेही लोकनेते गणेश नाईक यांनी स्पष्ट केले. 

जनसंवाद कार्यक्रमात निशांत भगत यांनी प्रस्तावना, तर संदिप भगत यांनी आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन शैलेश घाग आणि ऍड. सचिन शिंदे यांनी केले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

भाजपा कार्यकर्त्यांद्वारे महिलांच्या सुरक्षिततेची, सबलीकरणाची प्रतिज्ञा