शेती उत्पादन वाढीसाठी विज्ञानाच्या आधाराची गरज -शरद पवार  

नवी मुंबई : अनेक आव्हाने आपल्यासमोर येतात, त्या आव्हानांवर मात करण्याची हिंमत आपण केली पाहिजे. आपला देश कृषी प्रधान आहे. मात्र, अलिकडच्या काळात देशात महामार्ग तयार करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. त्यामुळे शेतीवरचा बोजा वाढत चालला आहे. परिणामी, मर्यादित क्षेत्रावर शेती करण्याची वेळ आज शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे शेतीचे उत्पादन वाढवल पाहिजे. त्याकरिता विज्ञानाचा आधार घेऊन जागतिक बाजारपेठेची गरज ओळखली पाहिजे, असे प्रतिपादन ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गट'चे अध्यक्ष शरद पवार यांनी वाशी येथे केले.  

वाशी येथे विष्णुदास भावे नाट्यगृह येथे २२ ऑगस्ट रोजी ‘संभाजी ब्रिगेड'चे राज्यस्तरीय अधिवेशन भरवण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार शाहू महाराज, एमडी ग्रुपचे सतीश मगर, सह्याद्री फार्मचे विलास शिंदे, ‘संभाजी ब्रिगेड'चे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, आदि उपस्थित होते.

शहरे वाढतायेत, त्यामुळे शेती करणे अवघड होत आहे. शेतीचे तुकडे करायचे, ते विकायचे आणि त्यावर आयुष्य जगायचे, असे शहराजवळील शेतकऱ्यांचे विचार आहेत. त्याऐवजी शेतकरी एकत्र येऊन शहर उभारु शकतो असा विचार करणे आवश्यक झाले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुण्यातील मगरपट्टा सिटी. येथे उत्तम काम घडत आहे. त्यामुळे कामे मागणारी नाही तर कामे देणारी माणसे तयार करायची, असे पवार यावेळी म्हणाले.  

२१ व्या शतकात समाजाची पुर्नरचना करण्याची आवश्यकता भासली आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांनी खरे तर समाजाला नवी दिशा दिली आहे. देशात आणि राज्यात सतत संघर्ष सुरु आहे. तो संघर्ष वाढेल तेव्हा यातून आपण विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. समाजात मोठ्या प्रमाणात पसरलेली अंधश्रध्दा दूर करणे आवश्यक असल्याचे मत खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी याप्रसंगी व्यक्त केले.  

झेड प्लस सुरक्षा कशासाठी? मला माहिती आहे...
झेड प्लस सुरक्षा देण्यात आल्याबद्दल शरद पवार यांनी आपल्या सुरक्षा वाढीसंदर्भात काहीच माहिती नसल्याचे सांगितले. २१ ऑगस्ट माझ्याकडे केंद्रीय गृह खात्याचे अधिकारी आले होते. ३ लोकांसाठी झेड सिक्युरिटीचा निर्णय केंद्राने घेतलाय, असे ते म्हणाले. यामध्ये आरएसएस प्रमुख मोहन भागवत आणि देशाचे गृहमंत्री आणि तिसरे नाव माझे आहे, असे ते म्हणाले.  

ते कशासाठी, मला माहिती आहे. कदाचित निवडणुका आहेत म्हणून. एकंदरीत पाहिले तर ऑथेंटिक माहिती मिळवण्याची अशी व्यवस्था असून शकते? नक्की काय ते मला माहिती नाही. याबाबत गृह विभागाशी संवाद साधणार आहे, माहिती घेणार आहे. नंतर पुढे काय करायचे ते ठरवणार असल्याचेे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

नव्या पिढीला सांगा, निवडणुकीला उभे राहू नका...  
कुठल्याही क्षेत्रात जायचे असेल तर जगात कुठेही जायची तयारी ठेवा. मी एकदा टोकियोला गेलो होतो. तिथे बाळासाहेब देशमुख नावाचे गृहस्थ भेटले. त्यांचे तिथे रेस्टॉरंट आहे. मी तिथे गेलो तेव्हा त्यांना मी म्हणालो तुम्ही देशमुख, तुम्ही कसे काय हॉटेल व्यवसाय करताय. ते मुळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील होते.

१९८७ साली ते निवडणुकीला उभे राहिले, ते निवडणूक हरले. लोकांचे पैसे द्यायला नव्हते कारण कर्ज झाले होते. ते म्हणाले, मी नोकरीसाठी जपानला आलो. हळूहळू हॉटेल सुरू केले. आता मालकीची ८ रेस्टॉरंट आहेत. त्यांना मी विचारले नव्या पिढीला काय सांगू ते म्हणाले, नव्या पिढीला सांगा काहीही करा; पण निवडणुकीला उभे राहू नका. नाहीतर कर्जबाजारी व्हाल असे शरद पवारांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या जनसंवादात आ. गणेश नाईक यांचा गौरव