सिडको सोडत धारकांकडून गजानन काळे यांचा नागरी सत्कार
नवी मुंबई : उलवे बामण डोंगरी येथील ८ हजार सिडको सोडत धारकांना ३५ लाखांचे घर २७ लाखात ‘सिडको'कडून मिळवून दिल्याबद्दल सोडत धारकांच्या हस्ते ‘मनसे'चे शहर अध्यक्ष गजानन काळे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. जवळपास दीड वर्ष सुरु असलेल्या या लढ्यात सिडको सोडत धारकांचे एकूण ६०० कोटी रुपये वाचवल्यामुळे गोरगरीब सोडत धारकांनी आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वाशी येथे नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी शेकडो सिडको सोडत धारक उपस्थित होते.
सिडको सोडत धारक म्हणजे माझे कुंटुंबच असल्याची भावना गजानन काळे यांनी व्यक्त केली. यावेळी सिडको सोडत धारकांच्या वतीने उज्वला गोगावले,माधुरी शिंगरे, अजय हेगडेकर, रामदास बावस्कर यांनी आपले विचार मांडले.
अवाजवी असणाऱ्या घरांच्या किंमती सिडको कडून कमी करण्यात याव्यात याकरिता सोडत धारकांनी गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली ‘सिडको'च्या विरोधात सीवूडस् येथे भीक मांगो आंदोलन केले होते. तसेच राज ठाकरे यांना भेटून सिडको सोडत धारकांच्या वतीने निवेदनही देण्यात आले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या बैठकीत सिडको सोडत धारकांचा प्रश्न ऐरणीवर आणला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ याची दखल घेऊन सिडको सोडत धारकांच्या घरांचे दर ३५ लाखावरुन २७ लाख केले. या सर्व लढ्यात गजानन काळे यांनी सिडको सोडत धारकांची खंबीरपणे साथ देऊन नेतृत्व केले. म्हणून सिडको सोडत धारकांच्या वतीने गजानन काळे यांचा मानपत्र देऊन भव्य नागरी सत्कार करण्यात आल्याचे डॉ. नितीन दिघे यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमात सिडको सोडत धारकांच्या यापुढील विविध मागण्यांकरिता ‘सिडको नागरिक हक्क संघर्ष समिती'ची स्थापना करण्यात आली. या पोस्टरचे अनावरण गजानन काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमात प्रास्ताविक ‘मनसेे'चे शहर सचिव सचिन कदम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनसे रस्ते आस्थापना विभागाचे शहर संघटक संदीप गलुगडे यांनी केले. याप्रसंगी सिडको सोडत धारकांसोबतच ‘मनसे'चे शहर सचिव विलास घोणे, बाळासाहेब शिंदे, संदेश डोंगरे, संप्रीत तुर्मेकर, आप्पासाहेब कोठुळे, आदि उपस्थित होते.