नवी मुंबईतील महापालिका तसेच खासगी शाळांतील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याची मागणी
नवी मुंबई : बदलापूरच्या धर्तीवर नवी मुंबईतील शाळांमध्ये मुलींबाबत कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी दिघा ते बेलापुर दरम्यानच्या महापालिका तसेच खासगी शाळांतील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यानी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे.
बदलापुरमध्ये शाळेच्या आवारातच शालेय कर्मचाऱ्याकडून दोन अल्पवयीन चिमुरड्या बालिकांवर अत्याचार झाल्याचे व त्यातून बदलापुरवासियांचा उद्रेक झाल्याचे आपणास ठाऊक असेलच. अशा प्रकारची घटना नवी मुंबई शहरातील दिघा ते बेलापुर दरम्यानच्या खासगी व महापालिका शाळांमध्ये, शालेय परिसरामध्ये घडू नये यासाठी येथील खासगी व महापालिका शाळांतील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा युद्धपातळीवर घेणे आवश्यक आहे. त्यासाठीच आम्ही निवेदन सादर करत आहोत, असे सावंत यांनी नमूद केले आहे.
शालेय परिसरात सर्वच ठिकाणी सीसीटीव्ही असणे आवश्यक आहे. लहान बालिकांसोबत तसेच बालकांसोबतही शालेय महिला कर्मचारी शौचालयात घेवून जाण्याकरीता असणे आवश्यक आहे. (बालिकांवरच नाही तर बालकांवरही लैगिंक अत्याचार घडल्याच्या घटना घडल्या आहेत.) तसेच शालेय बसमध्येदेखील महिला कर्मचारी असणे आवश्यक आहे. नवी मुंबईतील शाळांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेताना शाळेमध्ये सर्वत्र सीसीटीव्ही आहेत का? व ते सीसीटीव्ही चालू आहेत का? शाळेचा कानाकोपरा सीसीटीव्हीच्या कार्यक्षेत्रात आहे का? याची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. शाळेत येणाऱ्या मुला-मुलींचा शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शिपाई, आया यांच्याशी जवळून संबंध येत आहे. शाळेत असणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचा, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा वर्तणूकीवर नजर ठेवताना प्रत्येकालाच ठराविक कालावधीनंतर वर्तणुकीबाबतचा पोलीसी अहवाल सादर करणे बंधनकारक करावा.
शालेय आवारात, शाळेच्या वर्गामध्ये, शाळेच्या गच्चीवर, शौचालयामध्ये शालेय बालकांवर. बालिकांवर लैगिंक अत्याचार होण्याच्या घटना अलिकडच्या काळात राज्यामध्ये वाढीस लागल्या आहेत. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला त्या भूषणावह नाहीत. विद्यादानाच्या ठिकाणी व्याभिचार, अत्याचार, लैगिंक शोषण घडावे ही लज्जास्पद बाब आहे. अशा घटना घडल्यावर जनतेचा उद्रेक होतो. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. मुलींना शाळेत जाण्यास भीती निर्माण होते, अभ्यासावरचे मन उडते. शालेय जीवन उद्धवस्त होते. पूर्ण कुटूंबाचीच वाताहत होते. कृत्य करणारा नराधम काही वर्षांनी तुरूंगाबाहेर येतो. पण ज्यांनी भोगले आहे, ते मात्र मेल्यासारखे जीवन जगत असतात. समस्येचे गांभीर्य आपण सर्वांनी वेळीच ओळखले पाहिजे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने व पोलिसांनी शाळेतील मुला-मुलींच्या सुरक्षेसाठी तसेच कामांध, वासनांध अपप्रवृत्तींना ठेचून काढण्यासाठी शालेय आवारातील व शाळा अंर्तगत भागातील सुरक्षाव्यवस्थेचा युद्धपातळीवर आढावा घ्यावा, विनंती रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त शिंदे यांना केली आहे.