पाणी, आरोग्य, सार्वजनिक स्वच्छताप्रश्‍नी पालिका प्रशासनाला धारेवर धरले 

आमदार गणेश नाईक यांचा अधिकाऱ्यांना  इशारा  

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील अनियमित पाणीपुरवठा, सार्वजनिक अस्वच्छता  आणि आरोग्याच्या विविध प्रश्नांवर  आमदार गणेश नाईक यांनी महापालिका प्रशासनाला  आज धारेवर धरले. शहराच्या विविध  समस्यांवर  आमदार नाईक यांची  महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्यासोबत महापालिका मुख्यालयात नियमित बैठक पार पडली.

महापालिका अधिकाऱ्यांनी  कोणाच्याही दबावाखाली न येता आपल्या कर्तव्यापासून दूर जाऊ नये  अन्यथा लोकशाही मार्गाने  त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देऊ, असा इशारा देखील  काही अधिकाऱ्यांना नाईक यांनी  दिला.

माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक,  माजी महापौर जयवंत सुतार,  यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.  आमदार नाईक यांनी केलेल्या विविध मागण्यांवर  सकारात्मक प्रतिसाद देत  कार्यवाही करण्याचे आश्वासन आयुक्त  शिंदे यांनी दिले. 

पाणीपुरवठा सुरळीत करा.....

शहरातील अनेक भागात आजही अनियमित पाणीपुरवठा होतो आहे, असे निदर्शनास आणून नाईक यांनी  पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. सार्वजनिक दहीहंडी उत्सव, गणेशोत्सव जवळ आले आहेत. या पार्श्वभूमीवर  मंडळांना लागणाऱ्या परवानग्या विनासायास, जलद गतीने देण्याची, रस्त्यांची डागडुजी करण्याची  सूचना त्यांनी केली.

साथ  रोगांचा फैलाव रोखण्यासाठी उपाययोजना करा...

डेंग्यू आणि मलेरिया सारख्या साथ रोगांचा  फैलाव रोखण्यासाठी शहरामध्ये नियमितपणे  औषध फवारणी करावी. राज्यामध्ये  लागन झालेल्या झिका रोगाविषयी खबरदारी घ्यावी. रुग्णालयांमधून  औषधे आणि उपचारांच्या आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून ठेवाव्यात.

सार्वजनिक स्वच्छतेकडे  लक्ष द्या...

शहरामध्ये हल्ली अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसते आहे. कचराकुंड्यांमध्ये  कचरा साठून राहिलेला आहे. शाळा परिसरामध्ये देखील अस्वच्छता दिसून येते. त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होतो आहे. पावसाळापूर्व  गटारांची सफाई योग्य पद्धतीने न झाल्याने गटारे तुंबल्याबद्दल  नाईक यांनी  संताप व्यक्त केला. 

मोरबे धरणाची उंची वाढवणार

भिरा पाणी प्रकल्पाला गती.....

नवी मुंबईतील वाढत्या लोकसंख्येला आवश्यक पाणीपुरवठ्याची तरतूद  करण्यासाठी लोकनेते आमदार नाईक यांनी 2000 एमएलडी क्षमतेचा भिरा पाणी प्रकल्प  सुचविला आहे. मोरबे धरणाची उंची वाढवण्याबरोबरच त्याचा एक भाग म्हणून भिरा  पाणी प्रकल्प राबविण्यासाठी आराखडा बनविण्याचे काम सुरू असल्याची माहिती  आयुक्त शिंदे यांनी आमदार नाईक यांना दिली.

मोरबे धरणाच्या सुरक्षेकडे लक्ष द्या...

संपूर्ण नवी मुंबईला  पाणीपुरवठा करणाऱ्या  मोरबे धरणाच्या सुरक्षेकडे गांभीर्याने  लक्ष देण्याची सूचना  नाईक यांनी  केली. धरण परिसरात भराव झाल्याचे दिसून आले आहे. धरण परिसराला कुंपण घालून धरणातले पाणी प्रदूषित होणार नाही, याची काळजी घ्या.

ऐरोली-काटई मार्गिकांसाठी  पालिकेने पुढाकार घ्यावा....

ऐरोली-काटई  उन्नत मार्गावर मुंबईच्या दिशेने  ऐरोलीत चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी  मार्गिका बांधण्याची मागणी  आमदार नाईक यांनी  लावून धरली आहे.  एमएमआरडीए तयार आहे मात्र  पालिकेचे अधिकारी पुढाकार घेत नसल्याचे दिसत असून पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली. नगर अभियंता  शिरीष आरदवाड यांनी  या अनुषंगाने  कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

एमआयडीसीने सुविधा भूखंड विकले कसे?

एमआयडीसीने महापालिकेला दिलेले  दिघा, रबाळे, पावणे, तुर्भे  येथील सुविधा भूखंड विकले. हा विषय बैठकीत उपस्थित झाला. सुविधा भूखंड परत मिळवण्यासाठी  संबंधित अधिकाऱ्यांनी काय प्रयत्न केले? सुविधा भूखंड परस्पर विकणारी एमआयडीसी कोण आहे? असे सवाल गणेश नाईक यांनी  विचारले.  या संदर्भात आम्ही कायदेशीर  सल्ला घेतल्याचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले असता  अनधिकृत काम झाल्याचे स्पष्ट असताना पालिकेला कायदेशीर सल्ला घेण्याची गरजच काय? असा सवाल विचारून   पालिका स्वतःच्या अधिकारात कारवाई करू शकते, असे स्पष्ट केले. किती प्रकरणांमध्ये पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर सल्ला घेतला आहे, याची माहिती  माहिती अधिकारात घेतली जाईल, असा इशारा देखील त्यांनी दिला.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 बदलापूरमध्ये २ मुलींवर अत्याचार