अखेर लालपरीचा गव्हाण-न्हावा मार्ग वाहतुकीसाठी तयार

उरण : पनवेल तालुक्यातील गव्हाण, कोपर, जावळे, शिवाजीनगर, न्हावा, शेलघर, बामणडोंगरी या गावांचा गेल्या १०० वर्षापासून रहदारीसाठी असलेल्या गव्हाणफाटा-गव्हाण मार्ग ‘सिडको'ने नवीन शहराच्या नियोजनामधे पुसून टाकला. परंतु, स्थानिक गावकऱ्यांची, प्रकल्पग्रस्त शेतकरी, नागरिकांची आस्था असेलला सदर रस्ता सुरु रहावा, अशी भावना होती. त्यावर ‘सिडको'ने ५ किलोमीटरचा वळसा वहाळ, उलवा नोड मार्गे पर्याय सांगितला. त्यामुळे ग्रामस्थांमधे तीव्र संताप निर्माण झाला.

कामगार नेते महेंद्र घरत यांच्या माध्यमातून बैठका झाल्या; पण सिडको-एनएचएआय व्यवस्थापनाने सदर रस्ता सुरु करण्यास असमर्थता दर्शविली. परंतु, महेंद्र घरत यांनी सिडको, एनएचएआय व्यवस्थापनाचा पिच्छा पुरवला. शेवटी राष्ट्रीय महामार्गाला भुयार देऊन गव्हाणफाटा-गव्हाण रस्ता अबाधित ठेवण्याचे ठरले. यासाठी ७ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. सिडको आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दोन्ही व्यवस्थापन एकमेकांकडे चेंडू टोलवित होते. शेवटी महेंद्र घरत यांनी इशारा देताच दोन्ही व्यवस्थापनामार्फत निधी मंजूर करण्यात आला. अखेरीस आज २ वर्षानंतर सदरचा मार्ग पूर्ण करण्यात आला.

पनवेल तालुक्यातील न्हावा-गव्हाण-बामणडोंगरी-शेलघर-कोपर-जावळे -शिवाजीनगर एसटी प्रवाशांची गेली २ वर्ष होत असलेली ससेहोलपट बंद होणार असून लवकरच या मार्गावर लालपरी धावणार, असे पत्र कामगार नेते महेंद्र घरत यांनी पनवेल आगार प्रमुख चौरे यांची भेट घेवून दिले. त्यानुसार सर्वेक्षण करुन एसटी सुरु करण्याचे आश्वासन आगार प्रमुख चौरे यांनी घरत यांना दिले.

दरम्यान, राजकीय इच्छाशक्ती असेल तर जनतेचे प्रश्न मार्गी लागतात, हेच खऱ्या अर्थाने कामगार नेते महेंद्र घरत यांनी अशक्य ते शेक्य करुन दाखवून दिले आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास नागरिकांमध्ये वृध्दींगत करा