डोंबिवली येथे ‘नोकरी महोत्सव' संपन्न
डोंबिवली : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून डोंबिवलीमध्ये भव्य ‘नोकरी महोत्सव'चे ११ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले होते. डोंबिवली पूर्व मधील होरायझोन हॉल येथे आयोजित सदर ‘नोकरी महोत्सव'मध्ये १३० हुन अधिक नामांकित मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये हजारो बेरोजगार तरुण-तरुणींना नोकरीची संधी उपलब्ध झाली.
या ‘नोकरी महोत्सव'ला तरुण-तरुणीनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रत्येक कंपन्यांच्या स्टॉलवर तरुण-तरुणींनी आपल्या कागदपत्रासह मोठ्या संख्येने उपस्थित होतेे. विशेषतः डोंबिवली आणि कल्याण शहराच्या विविध भागातून हजारो तरुण-तरुणी यांची लक्षणीय उपस्थिती होती.
‘महोत्सव'मध्ये १०वी, १२वी, पदवीधारक, पदव्युत्तर पदवीधारक, आयटीआय, डिप्लोमा, डिग्री आदि शैक्षणिक पात्रतेच्या तरुण-तरुणींनी सहभाग घेतला होता. मॅन्युफॅक्चरिंग, फायनान्स, रिटेल, सेल्स अँड मार्केटिंग, हॉस्पिटलीटी, टेलिकॉम, बीपीओ, केपीओ, आयटी, फार्मा आदि क्षेत्रात या बेरोजगारांना रोजगार मिळाला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित सदर ‘नोकरी महोत्सव' रोजगार महोत्सवाचा लाभ कल्याण लोकसभा क्षेत्रातील हजारो बेरोजगारांनी घेतला असून त्यांना त्वरित नियुक्तीपत्र दिली असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी दिली.
याप्रसंगी यावेळी शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, कल्याण तालुकाप्रमुख महेश पाटील, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, उपशहरप्रमुख संतोष चव्हाण, गजानन व्यापारी, संजय पावशे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.