डम्पिंग ग्राऊंड बंद करा; मागणीसाठी शिवसेना ठाकरे, भाजपा तर्फे आंदोलन

ठाणे : वागळे इस्टेट येथील डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याच्या मागणीसाठी शिवसेना (उबाठा) आणि भाजप या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. यावेळी वागळे इस्टेट परिसरातील नागरिकांना सदर डम्पिंग ग्राऊंडमुळे होणाऱ्या त्रासाचा विरोध दर्शवत कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली.

ठाणे महापालिका क्षेत्रातील सीपीतला परिसरात सुरु करण्यात आलेला डम्पिंग ग्राऊंडमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर विविध आजारांच्या समस्याला सामोरे जावे लागते. सदर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डम्पिंगच्या गाड्यांची रांग लागलेली असते. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूककाेंडी देखील होते. शिवाय उघड्यावरच कचऱ्याची वाहतूक येथून केली जाते. त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर कचऱ्याचा खच पडलेला दिसतो.

याठिकाणी उघड्यावर कचऱ्याची वाहतूक केली जात असल्यामुळे अनेकदा वाहनातील कचरा बाहेर पडत असल्याने त्यातील दुर्गंधीचा सामना देखील परिसरातील नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी डम्पिंग ग्राऊंड येथून हटवण्याची मागणी केली होती. याबाबत नागरिकांनी अनेकदा आंदोलन देखील केलेली आहेत. मात्र, ठाणे महापालिका प्रशासनाने डम्पिंग ग्राऊंड हटवण्याबाबत कागदावर आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात डम्पिंग ग्राऊंड सुरुच असल्याने ‘भाजपा'चे जिल्हा सचिव रजनीश त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी आंदोलन केले. यावेळी विजय नाडा, सुरेश कांबळे यांच्यासह इतर पदाधिकरी देखील उपस्थित होते. 

दुसरीकडे ‘शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे गट'च्या पदाधिकाऱ्यांनी देखील येथे आंदोलन केले. आंदोलना दरम्यान कार्यकर्त्यांनी डम्पिंग ग्राऊंडच्या गेटला टाळे ठोकुन आपला रोष व्यक्त केला.

डम्पिंग ग्राऊंडमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच स्थानिक नागरिकांच्या आरोग्याच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झाली असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला. ‘शिवसेना'च्या या मागणीला मोठ्या प्रमाणात साथ मिळत आहे. काही दिवसांपूर्वी आंदोलन केल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महापालिका अधिकाऱ्यांशी भेट घेतली होती. या भेटीदरम्यान सदरचे डम्पिंग ग्राऊंड तेथून हटवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मुदत उलटून गेली तरी डम्पिंग ग्राऊंड अद्याप न हटवल्यामुळे या ठिकाणी असलेल्या परिसरातील नागरिक तसेच आजुबाजुच्या इंडस्ट्रीयल एरिया मधील कर्मचारी आक्रमक झाले आहेत. महापालिका प्रशासनाने कागदावर खोटे आश्वासन दिल्याने स्थानिक नागरिक नाराज झाले आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि ‘भाजपा'च्या स्थानिक नेत्यांनी सदर आंदोलनाचे नेतृत्व केले. याठिकाणच्या रहिवाशांना डम्पिंग ग्राऊंडमुळे भेडसावणाऱ्या समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी महापालिका प्रशासनावर केला. डम्पिंग ग्राऊंड बंदीची मागणी लवकरच मान्य न झाल्यास, आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

दरम्यान, शिवसेना-ठाकरे गट, भाजपा पक्षाच्या आंदोलनानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थितीचा आढावा घेतला. तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याचे अधिकाऱ्यानी आश्वासन दिले. तर नागरिकांच्या प्रश्नांची लवकरात लवकर दखल न घेतल्यास या आंदोलनाचा पुढील टप्पा अधिक तीव्र होऊ शकतो, असा इशाराही कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 डोंबिवली येथे ‘नोकरी महोत्सव' संपन्न