विचारक्रांती सभेत उपेक्षित भूमीपुत्र, जमीन मालकी हक्कांबाबत मंथन

नवी मुंबई : ‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था'तर्फे ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त विचार क्रांती या प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये करण्यात आले होते. नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार संदीप नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. याप्रसंगी ‘भाजपा'चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, महापालिकेचे माजी सभागृह नेते अनंत सुतार, माजी विरोधी पक्षनेते तथा ‘संस्था'चे संस्थापक-अध्यक्ष दशरथ भगत, पदाधिकारी निशांत भगत, माजी नगरसेवक प्रभाकर भोईर, अमित मेढकर, घनश्याम मढवी, ॲड. विकास पाटील, विजय वाळुंज, रामेश्वरलाल शर्मा, विजय पाटील, भरत नाईक, शितल भोईर, सुरेश पाटील, चाहू मढवी, शिवचंद्र पाटील, सुरेश वास्कर, प्रकाश पाटील, रघुनाथ पाटील, दुर्गाविजय पाल आदिंसह नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

शासनाच्या माध्यमातून ‘लोकनेते दि. बा. पाटील महामंडळ'ची स्थापना करण्यासंदर्भात आपण लवकरच शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे संदीप नाईक यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात लोकशाही बचाव यावर विचार मंथन मांडताना दशरथ भगत यांनी संविधानातील ७४ व्या घटना दुरुस्ती नुसार स्थानिक स्वराज्य संस्था यांना स्वयंम शासन करण्याचे हक्क बहाल केले आहेत. परंतु, गेल्या ४ वर्षांपासून निवडणुका घेणे बंद केले असून देशातील नागरिकांनी दिलेला हक्क लोकशाहीतील बहुमताच्या हुकुमशाहीने हिरावून घेतला गेलाय का? अशी भिती दशरथ भगत यांनी व्यक्त केली.

देशात एक राष्ट्र, एक निवडणूक झाली पाहिजे असे पंतप्रधान मोदी यांचे मत असताना महाराष्ट्र राज्यात एक राज्य एक निवडणूक अशा पध्दतीने आगामी काळात विधानसभा सोबत प्रलंबित असलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायला हव्यात. सत्ताधारी सोडा; पण विरोधी पक्ष देखील याबाबतीत चिडीचूप का आहे?असे परखड विचार दशरथ भगत यांनी यावेळी मांडले. तर राज्यातील आगरी, कोळी, कराडी आणि भंडारी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकनेते दि. बा. पाटील महामंडळ स्थापन झाले पाहिजे. सोबतच नवी मुंबई शहर वसविण्यासाठी शासनाने जमिनी घेतलेल्या जमिनीचा आज कोणत्या हेतुने नफेखोरीतून व्यावसायिक विकास होत आहे. सिडको आणि एमआयडीसी या प्राधिकरणांनी मूळ ग्रामस्थ आणि झोपडपट्टी धारकांच्या घराखालील जमिनींचे मालकी हक्क त्यांना प्रदान करावेत, यासाठी उठाव करावा लागेल का? असा सवाल निशांत भगत यांनी उपस्थित केला.

यावेळी उपेक्षित भूमीपुत्र आणि जमीन मालकी हक्क या विषयावर निशांत भगत यांनी तर लोकशाही बचाव यावर संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत यांनी मांडलेल्या लेखपत्रिकांचे विमोचन करण्यात आले.

सदर कार्यक्रमात आभार प्रदर्शन संयोजक संदिप भगत यांनी तर सूत्रसंचालन शैलेश घाग यांनी केले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 डम्पिंग ग्राऊंड बंद करा; मागणीसाठी शिवसेना ठाकरे, भाजपा तर्फे आंदोलन